
मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी उद्धव ठाकरेंनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यात कलम 144 लागू करण्यात आले असून 5 पेक्षा अधिक जण एकत्र आल्यास त्यांना ताब्यात घेण्यात येणार असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. तर, मुंबईतील लोकल सेवाही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. त्यानंतर, आता राज्यातील बससेवाही 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती परिवहनमंत्री अनिल परब यांनी दिली.
सर्वसामान्य प्रवासासाठी एस.टी. सेवा बंद ठेवण्यात येणार आहे. 31 मार्चपर्यंत एस.टी. महामंडळाकडून एकही बस सोडली जाणार नाही. केवळ, अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बस सोडली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली. त्यामुळे, रेल्वे सेवेनंतर आता महाराष्ट्र परिवहन महामंडळाची बससेवाही बंद करण्यात आली आहे.