Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 30
आंतरराष्ट्रीय सीमेवर दहा चौक्या उद्ध्वस्त 5जम्मू, दि. 19 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी रेंजर्सकडून बुधवारपासून सुरू असलेल्या गोळीबार आणि उखळी तोफांच्या मार्‍याला सीमा सुरक्षा दलाचे जवान जबरदस्त प्रत्युत्तर देत आहेत. सीमा सुरक्षा दलाने गुरुवारी आणि शुक्रवारी पाकिस्तानी रेंजर्सला जबर तडाखा देऊन त्यांची मोठ्या प्रमाणात जीवितहानी केल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले. बीएसएफच्या मार्‍यात पाकचे किमान 20 ते 25 रेंजर्स मारले गेले आहेत. या जीवितहानीचा नक्की आकडा समजू शकला नसला तरी तरी पाकच्या सीमावर्ती भागात अनेक रुग्णवाहिका मृतदेह उचलून नेताना दिसल्या. त्यावरून ही संख्या किमान 25 असावी, असे बीएसएफच्या अधिकार्‍यांनी सांगितले. दरम्यान, पाक रेंजर्सच्या मार्‍यात बुधवारी बीएसएफचा एक जवान शहीद झाल्यानंतर गुरुवारी रात्रीही हवालदार ए. सुरेश यांना वीरमरण आले. त्याचबरोबर पाक रेंजर्सनी नागरी वस्त्यांनाही लक्ष्य केले असून गोळीबारात गुरुवारी रात्रीपासून दोन स्थानिक नागरिक ठार तर 11 हून अधिक जखमी झाले आहेत.
Saturday, January 20, 2018 AT 08:42 PM (IST)
न्या. लोया मृत्यू प्रकरणी महाराष्ट्र सरकारला आदेश 5नवी दिल्ली, दि. 16 (वृत्तसंस्था) : सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश बी. एच. लोया यांच्या गूढ मृत्यू प्रकरणातील वैद्यकीय अहवालासह सर्व कागदपत्रे याचिकाकर्त्यांना उपलब्ध करून देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला मंगळवारी दिले. याचिकाकर्त्यांना सर्व वस्तुस्थिती समजली पाहिजे आणि त्यांना सर्व कागदपत्रे तपासता आली पाहिजेत, असे न्यायालयाने सांगितले. यासाठी राज्य सरकारला एक आठवडा मुदत देण्यात आली आहे. सोहराबुद्दीन शेख चकमक प्रकरणाची सुनावणी करणारे सीबीआयचे विशेष न्यायाधीश लोया यांच्या मृत्यूचा स्वतंत्र तपास करण्यात यावा, अशी मागणी करणार्‍या याचिका पत्रकार बी. एस. लोणे आणि राजकीय कार्यकर्त्या तहसीन पूनावाला यांनी दाखल सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्या आहेत. त्यावर न्या. अरुण मिश्रा व न्या. एम. एम. शांतनगौडर यांच्या खंडपीठासमोर मंगळवारी सुनावणी झाली. या प्रकरणात याचिकाकर्त्यांना सर्व काही समजले पाहिजे, असे खंडपीठाने सांगितले. महाराष्ट्र सरकारच्यावतीने ज्येष्ठ विधिज्ञ हरीश साळवे यांनी बाजू मांडली.
Wednesday, January 17, 2018 AT 08:51 PM (IST)
बिन्यामिन नेतान्याहू यांची स्तुतिसुमने 5नवी दिल्ली, दि. 15 (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे क्रांतिकारी नेते असून त्यांनी भारतात क्रांती घडवली, अशा शब्दांत इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी सोमवारी मोदींचे कौतुक केले. ‘माझे मित्र नरेंद्र’ असा एकेरी उल्लेख करत नेतान्याहू यांनी मोदींबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांची पोचपावती दिली. मोदींनीही नेतान्याहू यांचा ‘बिबी’ असा उल्लेख केला. नेतान्याहू यांना इस्रायलमध्ये प्रेमाने ‘बिबी’ असे संबोधले जाते. इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेतान्याहू यांनी आपल्या सहा दिवसांच्या भारत दौर्‍यात सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेनंतर दोन्ही देशांच्या प्रतिनिधींनी नऊ करारांवर स्वाक्षर्‍या केल्या. सायबर सहकार्य, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रांमधील करारांचा यामध्ये समावेश आहे. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेची सुरुवात मोदींनी हिब्रू भाषेतून केली. दोन्ही देशांमध्ये चित्रपट, स्टार्ट अप इंडिया, संरक्षण आणि गुंतवणुकीबाबत सहमती झाली आहे.
Tuesday, January 16, 2018 AT 08:53 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : दिल्लीच्या जामा मशीद परिसरात तीन संशयित दहशतवादी घुसल्याचे उघडकीस आल्यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्‍वभूमीवर दिल्लीसह देशातील काही प्रमुख शहरांमध्ये अतिसतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. पोलिसांना सतर्क राहण्याचे निर्देश गुप्तचर यंत्रणांनी दिले आहेत. जामा मशीद परिसरातील हॉटेलमध्ये तीन दहशतवादी लपल्याची खबर दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी या हॉटेलची झाडाझडती घेतली होती. मात्र, तेथे दहशतवादी आढळले नव्हते. त्यातच काही दहशतवाद्यांच्या संभाषणाचे रेकॉर्डिंगही मिळाले आहे. हे तिघेही ‘पश्तो’ भाषेत संभाषण करत असल्याचे उघड झाले आहे. या दहशतवाद्यांचे अफगाणिस्तानशी ‘कनेक्शन’ असल्याचा पोलिसांना संशय आहे. पाकिस्तानमध्ये या तिघांनी प्रशिक्षण घेतले असून काश्मीर खोर्‍यातील पुलवामामधून त्यांना भारतात घातपात घडविण्याच्या सूचना दिल्या जात आहेत. त्यामुळे गुप्तचर यंत्रणेने एका सांकेतिक कॉलच्या आधारे अतिसतर्कतेचा इशारा जारी केला आहे.
Monday, January 15, 2018 AT 09:00 PM (IST)
टांकसाळींमध्ये नाण्यांचे उत्पादन थांबवले 5नवी दिल्ली, दि. 10 (वृत्तसंस्था) :भ्रष्टाचार, काळे धन आणि दहशतवाद्यांना मिळणारी आर्थिक रसद रोखण्याच्या उद्देशाने 2016 मध्ये नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय घेणार्‍या केंद्रातील मोदी सरकारने आता देशात नाण्यांचे उत्पादन 8 जानेवारीपासून बंद केले आहे. त्यामुळे सरकारने नोटाबंदीनंतर आता ‘नाणेबंदी’ केल्याची चर्चा सुरू झाली आहे. चार वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करणार्‍या नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणा घडवून आणण्यासाठी नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय घेतला. आता सरकारने नाणेबंदीचे पाऊल उचलल्याचे सूत्रांनी सांगितले. देशात नोएडा, मुंबई, कोलकाता आणि हैद्राबाद येथील टांकसाळींमध्ये नाण्यांचे उत्पादन केले जाते. मात्र, या चारही टांकसाळींमध्ये मंगळवारपासून नाण्यांचे उत्पादन बंद करण्यात आले आहे. नोटाबंदीनंतर मोठ्या प्रमाणावर नाणी चलनात आणण्यात आली होती. त्यामुळे नाण्यांचे प्रचंड उत्पादन करण्यात आल्याने रिझर्व्ह बँकेच्या गोदामांमध्ये नाण्यांचा भरमसाट अतिरिक्त साठा झाला आहे. त्याचबरोबर कोट्यवधी रुपयांची नाणी अद्याप रिझर्व्ह बँकेने घेतलेली नाहीत.
Thursday, January 11, 2018 AT 08:47 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: