Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 54
‘इस्रो’च्या मोहिमेत सातारच्या शास्त्रज्ञाचे योगदान 5श्रीहरिकोटा, दि. 14 (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने ‘जीसॅट-29’ या साडेतीन टन वजनाच्या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘जीएसएलव्ही-एमके3-डी2’ या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडण्यात आला. दरम्यान, या मोहिमेत मूळचे सातारचे असलेले शास्त्रज्ञ पंकज दामोदर किल्लेदार यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, ‘जीसॅट-29’ या आतापर्यंतच्या सर्वात वजनदार भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून इस्राने स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन असलेल्या ‘जीएसएलव्ही-एमके3-डी2’ या प्रक्षेपकाचीही दुसरी यशस्वी चाचणी घेतली आहे. पुढील चार वर्षांत होणार्‍या ‘चांद्रयान-2’ आणि मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे मनोबल उंचावणारी ही घटना आहे. ‘जीसॅट-29’चे वजन 3,423 किलोग्रॅम असून हा उपग्रह जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दळणवळणाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Thursday, November 15, 2018 AT 08:44 PM (IST)
पाक घुसखोरांचा समावेश मोठा शस्त्रसाठा जप्त 5जम्मू, दि. 13 (वृत्तसंस्था) : जम्मूतील अखनूर आणि काश्मीर खोर्‍यातील कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी मंगळवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये एका पाकिस्तानी घुसखोराचा समावेश असून त्याच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी दहशतवादी आज दुपारी 1.50 च्या सुमारास भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय लष्कराच्या जवानांनी त्याला आव्हान दिले. त्यावर त्या दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पाकिस्तानी घुसखोराला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले. त्याच्याकडून तीन पिस्तुले, हातबाँब, अनेक जिवंत काडतुसे, एके-47 बंदुकांची मॅगझीन्स असा मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा भारतीय जवानांनी जप्त केला. लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार परिसरात अजूनही काही दहशतवादी लपल्याचा संशय असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
Wednesday, November 14, 2018 AT 08:33 PM (IST)
5रायपूर, दि. 12 (वृत्तसंस्था) : छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील 18 जागांसाठी आज एकूण 70.08 टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली. हे सर्व मतदारसंघ नक्षलग्रस्त भागातील असून नक्षलवाद्यांनी या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे आवाहन केले होते. त्याचबरोबर मतदान करणार्‍यांवर हल्ले करण्याची धमकीही दिली होती. हे सर्व धुडकावून नागरिकांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत लोकशाहीवरील आपला विश्‍वास दाखवून दिला. बिजापूर जिल्ह्यात आज दोन ठिकाणी झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. त्याचबरोबर नक्षलवाद्यांनी पेरलेल्या भूसुरुंगाच्या स्फोटात आणि एका चकमकीत छत्तीसगड पोलिसांच्या ‘कोब्रा’ पथकातील पाच जवान जखमी झाले. हे अपवाद वगळता सर्वत्र शांततेत मतदान झाले. या मतदान प्रक्रियेसाठी लष्कर, निमलष्करी दले आणि छत्तीसगड पोलिसांचे सव्वा लाख सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले होते. या प्रचंड बंदोबस्तामुळे फारशा हिंसक घटना न घडता मतदान प्रक्रिया पार पाडता आली. विधानसभेच्या 18 जागांसाठी आज मतदान झाले. त्यात आठ नक्षलग्रस्त जिल्हे आहेत.
Tuesday, November 13, 2018 AT 09:14 PM (IST)
5बेंगळुरू, दि. 11 (वृत्तसंस्था) : गुंतवणुकीच्या बाबतीत कर्नाटक राज्याने गुजरात आणि महाराष्ट्र या दोन्ही राज्यांना मागे टाकले आहे. 2018 च्या पहिल्या तीन तिमाहित सर्वाधिक गुंतवणुकीचे प्रस्ताव कर्नाटकात आले आहेत. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार कर्नाटकात सुमारे 83,236 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. हे प्रमाण भारतातल्या एकूण गुंतवणुकीच्या 25 टक्के आहे. भारतासाठी एकूण 3 लाख 38 हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. मात्र प्रस्तावित प्रकल्पांपैकी केवळ 6 टक्के प्रकल्प कर्नाटकातले आहेत. 9 महिन्यात भारताला 1,486 प्रस्ताव मिळाले. त्यापैकी कर्नाटकात 96 प्रकल्प होणार आहेत.      गुजरातमध्ये कर्नाटकपेक्षा चार पट अधिक 347 तर महाराष्ट्रात 275 प्रकल्प प्रस्तावित आहेत. पण प्रकल्पांचे मूल्य पाहता गुजरातमध्ये 59,089 कोटी रुपये तर महाराष्ट्रात 46,428 कोटी रुपयांचे प्रकल्प प्रस्तावित आहेत. गेल्या दोन महिन्यात कर्नाटकला एअरोस्पेस, आयर्न अँड स्टील, फार्मास्युटिकल, ऑटोमोबाईल, टेक्स्टाईल, आयटीसारख्या क्षेत्रांमधील 23 प्रस्ताव मिळाले आहेत.
Monday, November 12, 2018 AT 09:15 PM (IST)
5केरळ, दि. 6 (वृत्तसेवा) : शबरीमाला मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवल्यानंतरही मंगळवारी सकाळी हिंसक आंदोलन झाले. या हिंसक आंदोलनादरम्यान एक 52 वर्षीय महिला जखमी झाली. यावेळी काही पत्रकारांना लक्ष्य करण्यात आले. 10 ते 50 वयोगटातील महिला अयप्पा मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत असल्याचे समजल्यानंतर नादापांडाल येथे गोळा झालेल्या भक्तांनी जोरदार घोषणाबाजी केली. महिलांना मंदिरात शिरण्यास जोरदार प्रतिबंध करण्यात आल्यामुळे या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भक्तांनी केलेल्या हल्ल्यात स्थानिक वृत्तवाहिनीचा चालक आणि कॅमेरामन, असे दोघे जखमी झाले आहेत तर हल्ल्यात जखमी झालेल्या 52 वर्षीय महिलेचे नाव ललिता आहे.  ती थ्रिसूर येथील रहिवासी आहे. ही महिला 10 ते 50 वयोगटातील नसून ती आपल्या कुटुंबासह दर्शनासाठी आली होती. पोलीस संरक्षणात नंतर या महिलेला मंदिरात जाण्याची परवानगी देण्यात आली.      या मंदिरात सर्वच वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे.
Wednesday, November 07, 2018 AT 08:27 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: