Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 65
दोन लाख कर्मचार्‍यांना लाभ मिळणार 5मुंबई, दि. 13 (प्रतिनिधी) : राज्यातील अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वरून 65 वर्षे करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. अंगणवाडी केंद्रात काम करण्यास शारीरिकदृष्ट्या सक्षम असलेल्या कर्मचार्‍यांना या निर्णयाचा लाभ होणार आहे. सुमारे दोन लाख कर्मचारी अंगणवाडी सेवेत कार्यरत आहेत. अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीसंदर्भात त्यांच्या संघटनेसोबत झालेल्या चर्चेच्या वेळी सेविकांच्या सेवासमाप्तीचे वय 60 वर्षे करण्याबाबत विचारविनिमय झाला होता. त्यानुसार अंगणवाडी सेविका, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस या मानधनी कर्मचार्‍यांचे सेवासमाप्तीचे वय 60 वर्षे करणे, मानधनात वाढ करणे याबाबतचा शासन निर्णय 23 फेब्रुवारी 2018 रोजी काढण्यात आला. मात्र, त्यांच्या सेवासमाप्तीचे वय 65 वर्षे करण्याबाबत विधिमंडळाच्या मार्चच्या अधिवेशनात सदस्यांनी मागणी केली होती. त्यानुसार काही अटींच्या अधीन राहून कार्यरत असलेल्या सेविकांचे सेवासमाप्तीचे वय 65 वर्षे ठेवण्याबाबत विचार करण्यात येईल, असे आश्‍वासन सभागृहास देण्यात आले होते.
Wednesday, November 14, 2018 AT 08:43 PM (IST)
5मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यावर्षी ऊस दराच्या मागणीवरून केलेल्या आंदोलनावर आणि नंतर घेतलेल्या माघारीच्या भूमिकेवर कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी जोरदार टीका केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यावर्षीचे ऊस दराचे आंदोलन ही निव्वळ स्टंटबाजी होती. लोकसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन ही आंदोलने करण्यात आली. या ऊस आंदोलनात दम नव्हता. रयत क्रांती संघटनेच्या ऊस परिषदेत मुख्यमंत्र्यांनी एफआरपीचा पै ना पै वसूल करून ऊस उत्पादक शेतकर्‍यांना देऊ, अशी घोषणा केली होती. यासाठी वेळ पडली तर सरकार कारखानदारांच्या मागे खंबीरपणे उभे राहील, असे स्पष्ट केले होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हे आश्‍वासन देऊन देखील 2-3 दिवस हे आंदोलनाचे नाटक कुणासाठी आणि कशासाठी केले  याचे उत्तर महाराष्ट्रतील ऊस उत्पादक शेतकर्‍यांना मिळायला हवे, असे ना. खोत यांनी सांगितले. पण या नाटकी आंदोलनातून ढोंगी शेतकरी नेत्याचा चेहरा उघडा पडला आहे, असे म्हणत खोत यांनी राजू शेट्टींवर टीकास्त्र सोडले.
Monday, November 12, 2018 AT 09:12 PM (IST)
5उस्मानाबाद, दि. 11 (वृत्तसंस्था) : चंद्रकांत पाटील यांना आपला राग येणे साहजिकच आहे. ज्या काळात दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत आपण बंद खोलीत महत्त्वाची खलबते करायचो तेव्हा चंद्रकांत पाटील दारात किंवा बाहेर उभे असायचे. त्यामुळे त्यांच्या मनात आजही ती सल तशीच कायम आहे म्हणूनच ते आपल्याबाबत नेहमी आकांडतांडव करत असल्याचा घणाघाती आरोप खा. राजू शेट्टी यांनी केला. यावेळी सदाभाऊ खोत यांच्यावर निशाणा साधताना खोत म्हणजे अर्धा-कच्चा पैलावन, असा टोला लगावला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ऊस आंदोलन मागे घेतल्यानंतर ते उस्मानाबाद येथे मराठवाड्यातील आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी उस्मानाबाद येथे आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील आणि जुने सहकारी सदाभाऊ खोत यांच्यावर शेट्टी यांनी शेलक्या शब्दात टीका केली. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कारखानदारांना चंद्रकांत पाटील फूस लावत होते.
Monday, November 12, 2018 AT 08:54 PM (IST)
सुधा भारद्वाज, अरुण फरेरा, वरनॉन गोन्साल्वीसना 14 दिवसांची कोठडी 5पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) : भीमा-कोरेगाव हिंसाचार प्रकरणी अटकेत असलेले संशयित अरुण फरेरा यांनी आपल्याला पोलीस कोठडीत चौकशी दरम्यान मारहाण झाल्याचा आरोप न्यायालयासमोर जबाब देताना मंगळवारी केला. या मारहाणीनंतर आपल्याला रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले आहे. दरम्यान, सुधा भारद्वाज, अरुण फरेरा आणि वर्नन गोन्साल्वीस या तिघांना मंगळवारी पुणे सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. तत्पूर्वी त्यांना पोलीस कोठडीत ठेवण्यात आले होते. आज त्यांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी न्यायालयासमोर साक्ष देताना परेरा म्हणाले, 4 नोव्हेंबर रोजी पुणे पोलिसांच्या कोठडीत चौकशी दरम्यान पोलिसांनी आपल्या 8-10 वेळा कानशिलात लगावल्या. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 5 नोव्हेंबर रोजी मला रुग्णालयात दाखल करण्यात आले.
Wednesday, November 07, 2018 AT 08:44 PM (IST)
5उस्मानाबाद, दि. 6 (वृत्तसंस्था) : राज्यातील दुष्काळग्रस्त भागाला दिलासा देण्याकरता केंद्र सरकारकडे 7 हजार कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. लवकरच केंद्राचे पथक राज्याच्या दुष्काळ पाहणी दौर्‍यावर येणार आहे. कृष्णा मराठवाडा प्रकल्पाकरता राज्य सरकारने नाबार्डकडे 2 हजार 200 कोटी रुपयांच्या कर्ज मागणीचा प्रस्ताव सादर केला असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात दुष्काळ आणि कायदा सुव्यवस्था आढावा बैठकीनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते. दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी आणि नागरिकांना दिलासा देण्याकरता आपण युद्धपातळीवर प्रयत्न करत आहोत. संभाव्य परिस्थितीला सामोरे जाण्याकरता तसेच पाणीटंचाई, चार्‍याचा प्रश्‍न यासह विविध अनुदानांसाठी केंद्राकडे आपण 7 हजार कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे. आपल्या मागणीनंतर त्याची छाननी केली जाईल आणि राज्यात केंद्र सरकारच्यावतीने आपण केलेल्या तपासणीची खात्री करण्याकरता किती पथक पाठवायचे याचा निर्णय होईल. त्यानंतर आपल्या मागणीप्रमाणे केंद्राकडून नक्की मदत मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
Wednesday, November 07, 2018 AT 08:26 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: