Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 67
5पुणे, दि. 17 : हिंदकेसरी पैलवान गणपतराव आंदळकर यांचे सोमवारी पुणे येथील रुग्णालयात हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्‍वास घेतला. आंदळकर यांच्या निधनाने भारतीय कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. हिंदकेसरी गणपतराव आंदळकर यांची प्रकृती वयोमानामुळे गेल्या काही काळापासून खालावली होती. त्यांना नियमित तपासणीसाठी रुग्णालयात नेले जायचे. मात्र, आज अचानक आलेल्या हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. त्यांचे पार्थिव कोल्हापूरला उद्या नेण्यात येणार असून तेथे अंत्यसंस्कार होणार आहेत. गणपतराव आंदळकर यांचा जन्म सामान्य शेतकरी कुटुंबात झाला. ते 1950 मध्ये खास कुस्तीसाठी कोल्हापुरात आले. कोल्हापूर संस्थानच्या दरबारातील मल्ल बाबासाहेब वीर हे त्यांना वस्ताद म्हणून लाभले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आंदळकर यांनी कुस्तीचे धडे गिरवायला सुरुवात केली. कोल्हापूरच्या राजर्षी छत्रपती शाहू स्मारक ट्रस्टचा शाहू पुरस्कार जाहीर झाला तेव्हा अर्जुन पुरस्कारापेक्षा अधिक आनंद झाल्याचे गणपतरावांनी जाहीर सांगितले होते.
Tuesday, September 18, 2018 AT 11:43 PM (IST)
मार्चनंतर पुन्हा बसणार वीज दरवाढीचा ‘शॉक’ 5मुंबई, दि. 14 (प्रतिनिधी) : राज्य वीज नियामक आयोगाने महावितरणला तुर्तास केवळ पाच टक्के वीज दरवाढ करण्यास परवानगी दिली असली तरी 20 हजार कोटींची अतिरिक्त महसुलाची मागणी मान्य केली असल्याने काही महिन्यांनी आणखी सात ते आठ टक्के वीज दरवाढ अटळ आहे. दरम्यान, वाढत्या महागाईच्या तुलनेत विजेची दरवाढ अत्यल्प असल्याचे समर्थन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने बुधवारी महावितरण व अन्य खाजगी वीज वितरण कंपन्यांच्या दरवाढीच्या प्रस्तावावर आपला निर्णय जाहीर केला होता. महावितरणने तब्बल 34 हजार 646 कोटी रुपयांच्या दरवाढीचा प्रस्ताव सादर केला होता. यातील 14 हजार कोटींचा अतिरिक्त खर्च आयोगाने अमान्य केला असून 20 हजार 651 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे. त्यातील 8268 कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी दरवाढीची परवानगी देताना उर्वरित 12 हजार 382 कोटींच्या दरवाढीबाबत नंतर निर्णय घेतला जाईल, असे सांगितले आहे. त्यामुळे मार्चनंतर विजेचे दर आणखी सात ते आठ टक्क्यांनी वाढणार आहेत.
Saturday, September 15, 2018 AT 08:17 PM (IST)
5मुंबई, दि. 11 (वृत्तसंस्था) : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेले रुपयाचे अवमूल्यन लवकर थांबण्याची लक्षणे दिसत नाहीत. रुपयाने आज पुन्हा नवा नीचांक गाठला तर सेन्सेक्स आणि निफ्टीने नवी आपटी खाल्ली. दुसरीकडे इंधनाच्या दरांनी नवा उच्चांक गाठला. दिल्लीत मंगळवारी पेट्रोल 80.87 रुपये तर मुंबईत 86.26 प्रतिलिटर झाले होते. डिझेल अनुक्रमे 72.97 आणि 77.47 रुपये झाले होते. रुपयाने डॉलरच्या तुलनेत 72.73 अशी नवी नीचांकी पातळी नोंदवली. परिणामी सेन्सेक्सचा निर्देशांक 509.4 अंशांनी तर निफ्टी 150.60 अशांनी घसरला. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्सने तब्बल 1 हजार अंशांनी आपटी खाल्ली आहे. ही पडझड अजून काही दिवस सुरू राहील, असे तज्ज्ञांचे म्हणणे असून या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे लाखो कोटी रुपयांचे नुकसान होत आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण आणि अमेरिका-चीन यांच्यातील व्यापार युद्धामुळे शेअर बाजार सलग दुसर्‍या दिवशी कोसळला. डॉलरच्या तुलनेत रुपया हे आशियातील सर्वाधिक कमकुवत चलन बनले आहे.  सेन्सेक्स 37,413.13 अंशांवर तर निफ्टी 11,287.50 अंशांवर बंद झाला. सोमवारीही सेन्सेक्सने 467.65 अंशांची गंटागळी खाल्ली होती.
Wednesday, September 12, 2018 AT 08:34 PM (IST)
म्हणतात, माफी मागितली, विषय संपला 5मुंबई, दि. 7 (प्रतिनिधी) : बेताल वक्तव्यामुळे अडचणीत आलेल्या आणि पक्षाच्या तमाम नेत्यांनी हात झटकल्याने एकाकी पडलेल्या आ. राम कदम यांच्या मदतीला अखेर सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील धावून आले. भाजप प्रवक्ते असलेल्या राम कदम यांना ‘क्लीन चिट’ देताना त्यांनी माफी मागितल्याने हा विषय आता संपायला हवा, असे सांगत पाटील यांनी त्यांची पाठराखण केली. प्रसारमाध्यमांनी एखाद्या वक्तव्यावर टीका करताना त्यामागील हेतू लक्षात घेतला पाहिजे, असा सल्ला देताना या वादाचे खापर त्यांनी प्रसारमाध्यमांवर फोडले. दरम्यान, बेताल वक्तव्यांबद्दल राम कदम यांच्या विरुद्ध घाटकोपर व बार्शी पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. घाटकोपर येथे झालेल्या दहीहंडी उत्सवात तरुणांशी संवाद साधताना राम कदम यांनी वादग्रस्त वक्तव्य केले होते. एखाद्या मुलीला तुम्ही प्रपोज केले आणि तिने नकार दिला तर माझ्याकडे या, तिला पळवून आणून तुमच्याकडे देतो, असे वक्तव्य राम कदम यांनी केल्यावर त्याची राज्यात तीव्र प्रतिक्रिया उमटली. मात्र, भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याबाबत मौन बाळगणे पसंत केले होते.
Saturday, September 08, 2018 AT 08:49 PM (IST)
दाभोळकर, पानसरे कुटुंबीयांनाही फटकारले 5मुंबई/पुणे, दि. 6 (प्रतिनिधी) : महाराष्ट्र अंनिसचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत या हत्येसंबंधी सतत माध्यमांसमोर येऊन माहिती उघड करणार्‍या तपास यंत्रणांची न्यायालयाने चांगलीच कानउघाडणी केली. या प्रकरणी माध्यमांसमोर येऊन वक्तव्ये करणार्‍या दाभोळकर व पानसरे कुटुंबीयांनाही न्यायालयाने फटकारले. दरम्यान, गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि दाभोळकर, पानसरे, कलबुर्गी यांच्या हत्यांमधील मास्टर माईंड असलेल्या अमोल काळे याला पुणे न्यायालयाने 14 सप्टेंबरपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. डॉ. दाभोळकर, कॉ. पानसरे हत्या प्रकरणी आज उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायालयाने तपास यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी केली. एटीएसच्या अधिकार्‍यांनी माध्यमांसमोर जाऊन वारंवार पुरावे उघड करणे आम्हाला पसंत नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने त्यांना फटकारले.
Friday, September 07, 2018 AT 08:09 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: