Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 90
सर्वोच्च न्यायालयाने निकाल राखून ठेवला 5नवी दिल्ली, दि. 14 (वृत्तसंस्था) : ‘राफेल’ खरेदी करारातील कथित कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करण्याची मागणी करणार्‍या याचिकांवरील निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज राखून ठेवला. सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायमूर्तींच्या खंडपीठाने तब्बल चार तासांच्या सुनावणीत सर्व पक्षकारांची बाजू ऐकून घेतली. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत राफेल लढाऊ विमानांच्या किमतीचा तपशील याचिकाकर्त्यांना देण्यात येणार नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. दसाँ या फ्रेंच कंपनीकडून भारतीय हवाई दलासाठी 36 राफेल लढाऊ विमानांची खरेदी करण्याच्या करारात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाला असून त्याची सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली चौकशी करावी. या प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवाल (एफआयआर) नोंदवावा, अशी मागणी करणार्‍या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. याचिकाकर्त्यांमध्ये माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा, अरुण शौरी आणि ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा समावेश आहे.
Thursday, November 15, 2018 AT 08:46 PM (IST)
‘इस्रो’च्या मोहिमेत सातारच्या शास्त्रज्ञाचे योगदान 5श्रीहरिकोटा, दि. 14 (वृत्तसंस्था) : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात ‘इस्रो’ने ‘जीसॅट-29’ या साडेतीन टन वजनाच्या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘जीएसएलव्ही-एमके3-डी2’ या स्वदेशी बनावटीच्या अत्याधुनिक प्रक्षेपकाद्वारे हा उपग्रह पृथ्वीभोवतीच्या कक्षेत सोडण्यात आला. दरम्यान, या मोहिमेत मूळचे सातारचे असलेले शास्त्रज्ञ पंकज दामोदर किल्लेदार यांचा मोलाचा वाटा आहे. दरम्यान, ‘जीसॅट-29’ या आतापर्यंतच्या सर्वात वजनदार भारतीय उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण करून इस्राने स्वदेशी बनावटीचे क्रायोजेनिक इंजिन असलेल्या ‘जीएसएलव्ही-एमके3-डी2’ या प्रक्षेपकाचीही दुसरी यशस्वी चाचणी घेतली आहे. पुढील चार वर्षांत होणार्‍या ‘चांद्रयान-2’ आणि मानवी अंतराळ मोहिमेसाठी ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांचे मनोबल उंचावणारी ही घटना आहे. ‘जीसॅट-29’चे वजन 3,423 किलोग्रॅम असून हा उपग्रह जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील दळणवळणाच्या विकासासाठी उपयुक्त ठरणार आहे.
Thursday, November 15, 2018 AT 08:44 PM (IST)
काँग्रेसच्या आरोपांना ‘दसाँ’च्या सीईओचे उत्तर 5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : राफेल लढाऊ विमानांच्या निर्मितीसाठी ऑफसेट पार्टनर म्हणून आम्हीच अनिल अंबानींच्या रिलायन्स कंपनीची निवड केली होती. अंबानींबरोबरच अन्य 30 कंपन्यांशीही आमचा करार झाला आहे, असे ‘दसाँ’ या फ्रेंच लढाऊ विमान निर्मिती कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एरिक त्रपिए यांनी स्पष्ट केले आहे. मी खोटे बोलत नाही. तशी माझी ख्याती नाही आणि माझ्यासारख्या पदावर बसलेल्या माणसाला तसे करता येता नाही, अशा शब्दांत त्यांनी काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिले आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी केलेल्या चर्चेनंतर या विमानांच्या किमती 9 टक्क्यांनी कमी करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला. मोदी सरकारने फ्रान्सबरोबर नव्याने केलेल्या राफेल लढाऊ विमान खरेदी करारावरून काँग्रेसकडून जोरदार आरोप केले जात आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही या करारात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 30 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. ‘दसाँ’ कंपनीचे अधिकारी खोटे बोलत असल्याचाही त्यांचा आरोप आहे.
Wednesday, November 14, 2018 AT 08:36 PM (IST)
5नवी दिल्ली, दि. 13 (वृत्तसंस्था) : केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेशाची परवानगी देण्याच्या निर्णयावर स्थगिती देण्यास नकार देतानाच सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या 48 फेरविचार याचिकांवर पुढील वर्षी 22 जानेवारीला सुनावणी घेण्यास मान्यता दिली. ही सुनावणी खुल्या न्यायालयात होणार आहे. शबरीमाला मंदिरात सर्व महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाविरोधात दाखल झालेल्या पुनर्विचार याचिकांची सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. आर. एफ. नरिमन, न्या. ए. एम. खानविलकर, न्या. धनंजय चंद्रचूड आणि न्या. इंदू मल्होत्रा यांच्या खंडपीठाने आपल्या चेंबरमध्ये तपासणी केली. अशा प्रकारच्या सुनावणीत वकिलांना उपस्थित राहू दिले जात नाही. खंडपीठाचे सर्व न्यायाधीश पुनर्विचार याचिकांची तपासणी करतात. पुनर्विचार याचिकांवर सुनावणी घेण्यास मान्यता देतानाच शबरीमाला मंदिरातील महिलांच्या प्रवेशाबाबतच्या आधीच्या निर्णयाला मात्र न्यायालयाने स्थगिती दिली नाही. सर्व फेरविचार याचिकांवर आणि अन्य अर्जांवर 22 जानेवारी 2019 रोजी खुल्या न्यायालयात सुनावणी होईल.
Wednesday, November 14, 2018 AT 08:34 PM (IST)
पाक घुसखोरांचा समावेश मोठा शस्त्रसाठा जप्त 5जम्मू, दि. 13 (वृत्तसंस्था) : जम्मूतील अखनूर आणि काश्मीर खोर्‍यातील कुपवाडा जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या जवानांनी मंगळवारी तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. यामध्ये एका पाकिस्तानी घुसखोराचा समावेश असून त्याच्याकडील मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. या कारवाईनंतर लष्कराने परिसरात शोधमोहीम सुरू केली आहे. जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये एक पाकिस्तानी दहशतवादी आज दुपारी 1.50 च्या सुमारास भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असताना भारतीय लष्कराच्या जवानांनी त्याला आव्हान दिले. त्यावर त्या दहशतवाद्याने गोळीबार सुरू केला. त्याला भारतीय जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले. या चकमकीत पाकिस्तानी घुसखोराला ठार करण्यात भारतीय जवानांना यश आले. त्याच्याकडून तीन पिस्तुले, हातबाँब, अनेक जिवंत काडतुसे, एके-47 बंदुकांची मॅगझीन्स असा मोठ्या प्रमाणातील शस्त्रसाठा भारतीय जवानांनी जप्त केला. लष्कराच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार परिसरात अजूनही काही दहशतवादी लपल्याचा संशय असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
Wednesday, November 14, 2018 AT 08:33 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: