Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
Search Tag:     From Date:     To Date:     Section:    
Total Results: 239
5पुणे, दि. 22 (प्रतिनिधी) : उसाच्या रास्त आणि किफायतशीर दराची (एफआरपी) रक्कम न देणार्‍या किसनवीर-खंडाळा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील वारणा या दोन साखर कारखान्याच्या विरोधात काढण्यात आलेल्या जप्तीच्या नोटिसीला सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्थगिती दिली आहे. अन्य तीन कारखान्यांची त्यांच्यासमोर सुनावणी सुरू आहे.  उसाची एफआरपी आणि दूध प्रश्‍नासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गेल्या महिन्यात साखर आयुक्तालयावर मोर्चा काढला होता. त्यावेळी साखर आयुक्तांनी उसाची थकीत रक्कम वसूल करण्यास 21 जुलैपर्यंत अवधी मागितला होता. रक्कम वसूल न झाल्यास रक्कम न देणार्‍या कारखान्यांचे जप्ती आदेश घेऊनच आम्ही जाऊ, असे खा. शेट्टी यांनी सांगितले होते. कारखान्यांकडे 29 जून रोजी 1900 कोटींची रक्कम थकीत होती. त्यानंतर 15 जुलैपर्यंत थकीत रक्कम 848 कोटी आणि त्यानंतर 21 जुलै रोजी 761 कोटी रुपये थकित होती. साखर आयुक्तांनी थकबाकी न देणार्‍या 13 कारखान्यांच्या जप्तीचे आदेश दिले होते. त्यावेळी 640 कोटी रुपयांची रक्कम थकीत होती. नोटीशीनंतर 246 कोटींची वसुली झाली. जप्तीचे आदेश दिलेल्या कारखान्याकडे 761 कोटी रुपये थकीत आहेत.
Monday, July 23, 2018 AT 08:44 PM (IST)
5जालना, दि. 22 (वृत्तसंस्था) : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकारवर निशाणा साधला. आरक्षणाच्या भूमिकेवर सरकार वेळकाढूपणा करत आहे. याबाबत कोणताच राजकीय पक्ष खरी स्थिती सांगत नसल्याचा आरोप त्यांनी केला. नोकर भरतीत 16 टक्के आरक्षण मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगतात. पण ते आरक्षण मिळेलच याची खात्री काय? मराठा आरक्षणावरून पंढरपुरात निर्माण झालेल्या स्थितीबाबत बोलताना ते म्हणाले, संपूर्ण राज्यभरातून वारकरी आले आहेत. महाराष्ट्राच्या श्रद्धेचा हा विषय आहे. त्यामुळे त्याला गालबोट लागता कामा नये. मराठवाड्याच्या  दौर्‍यावर असलेले राज ठाकरे आज जालना येथे आले होते. त्यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्री फडणवीस सातत्याने खोटे बोलतात. 1 लाख 20 हजार विहिरी बांधल्याचा दावा ते करतात. मराठवाड्यातील स्थिती पाहा काय झाली आहे. जालना शहराला 15 दिवसातून एकदा पाणी येते. मग कुठे गेल्या या विहिरी? महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाल्याचा दावाही फडणवीस करतात. पण वस्तुस्थिती तशी नसल्याचेही त्यांनी सांगितले.
Monday, July 23, 2018 AT 08:39 PM (IST)
5सोलापूर, दि. 22 (प्रतिनिधी) : मराठा आरक्षणावरुन तीव्र पवित्रा घेतलेल्या मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन सोमवारी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात होणार्‍या विठ्ठलाच्या शासकीय महापूजेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार नसल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या अनुपस्थितीत शासकीय पूजेचा मान वारकरीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पूजेला सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि जिल्हाधिकारी उपस्थित राहणार आहेत. ना. महाजन म्हणाले, आषाढी एकादशीनिमित्त सुमारे 15 लाख भाविक पंढरपुरात दाखल झाले आहेत. त्यामुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये, अशी मुख्यमंत्र्यांची इच्छा आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरुन सध्या मराठा समाजात तीव्र भावना आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना आषाढी पूजा करू न देण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यांच्या भावना लक्षात घेत कुठलाही अनुचित प्रकार येथे घडू नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापूजेला न जाण्याचा निर्णय घेतला आहे.
Monday, July 23, 2018 AT 08:36 PM (IST)
5मुंबई, दि. 22 (प्रतिनिधी) : आषाढी वारी ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा आहे. जनतेच्यावतीने विठ्ठलाचा सेवक म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला येथे मुख्य शासकीय पूजेचा मान दिला जातो. या वारीला आणि भागवत धर्माला छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील संरक्षण दिले होते. मात्र, आता काही लोक यात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे मला महापूजेसाठी पंढरपुरात जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे नाहीत, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्री म्हणाले, आषाढी एकादशीची शासकीय पूजा मुख्यमंत्र्यांनी करावी, अशी परंपरा आहे. मात्र, यावर्षी काही संघटनांनी मी पूजा करायला जाऊ नये, अशी भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांची ही भूमिका चुकीची आहे. वारकर्‍यांना वेठीस धरुन अशा मागण्या करणे योग्य नाही. विठ्ठलाची पूजा करण्यापासून मला कोणीही रोखू शकत नाही. मात्र, 10 लाख लोकांच्या जीवाला धोका असल्याने मी न जाण्याचा निर्णय घेतला आहे. आषाढीच्या दिवशी वारकर्‍यांमध्ये काही लोक घुसून चेंगराचेंगरी घडवण्याचा डाव असल्याचे पोलिसांकडून माहिती मिळत आहे.
Monday, July 23, 2018 AT 08:35 PM (IST)
5नागपूर, दि. 20 (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत प्रती कुटुंब दीड लाखाच्या मर्यादेत कर्जमाफीची अट टाकण्यात आली होती. मात्र ही अट शिथिल करून प्रत्येक कर्जदारास वैयक्तिकरित्या दीड लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ देण्यात येईल, अशी घोषणा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. कर्जमाफीची घोषणा करताना कुटुंब हा घटक गृहीत धरून दीड लाखापर्यंतचे कर्ज माफ करण्यात येईल, अशी अट घालण्यात आली होती. कुटुंबातील एकत्रित थकबाकीची रक्कम दीड लाखापेक्षा जास्त असल्यास त्यांना केवळ ओटीएस प्रमाणे लाभ मिळणार होता. दीड लाखावरील रक्कम आगाऊ भरल्यानंतर शासनातर्फे दीड लाख कर्जमाफीचा लाभ देण्याचा निकष होता. मात्र यात बदल करून कुटुंबाची अट शिथील करण्यात आली आहे.            प्रत्येक कर्जदारास दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. या योजनेंतर्गत कुटुंबातील पती/पत्नी व मुले यांना प्रत्येकी दीड लाखापर्यंत कर्जमाफीचा लाभ मिळेल. एकरकमी परतफेड योजनेतील पात्र शेतकर्‍यांना कर्जमाफीची भरावी लागणारी रक्कम कमी होणार आहे.
Saturday, July 21, 2018 AT 09:00 PM (IST)
1 2 3 4 5 ...
 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: