
नवी दिल्ली, 8 (वृत्तसंस्था) : "स्पॉट फिक्सिंग'च्या आरोपांमुळे अडचणीत आलेला पाकचा वेगवान गोलंदाज मोहम्मदअसिफवर त्याची मैत्रीण व पाकिस्तानी अभिनेत्री वीणा मलिकने नवा बॉंबगोळा टाकला आहे. असिफचे मॉडेल्स, बार डान्सर्स, दुय्यम दर्जाच्या अभिनेत्री आणि कॉलगर्ल्सशीही संबंध असल्याचा आरोप तिने केला आहे.
असिफ मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचे पुरावे आपल्याकडे आहेत, असे सांगणाऱ्या वीणाने आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटकडे हे पुरावे नुकतेच सोपवले. आता तिने असिफवर नवे आरोप केले आहेत. या संबंधांच्या संशयामुळे आपण असिफवर नजर ठेवण्यासाठी एक प्रायव्हेट डिटेक्टिव्ह नेमला होता. त्याच्याकडूनच असिफच्या मॅच फिक्सिंगबद्दल आपल्याला माहिती मिळाल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, आमचे डेटिंग सुरू असतानाही असिफ वेगवेगळ्या महिलांशी संबंध ठेवत असल्याचा मला संशय होता. तो नेहमी पार्ट्यांमध्ये गुंग असायचा आणि मुलींसमवेत सहली काढायचा. त्याला वारंवार टेक्स्ट मेसेज पाठवणाऱ्या एका व्यक्तीबद्दल मला संशय होता. तो मला फसवत आहे, असेही मला वाटायचे. त्यामुळे मी एक डिटेक्टिव्ह नेमला.
या डिटेक्टिव्हने सांगितलेली माहिती धक्कादायक होती. असिफ परदेश दौऱ्यावर असताना नेहमी उगवत्या अभिनेत्री, मॉडेल्स यांच्यासमवेत बराच काळ घालवायचा. खेळाडूंपर्यंत माहिती पोहोचवण्यासाठी व संदेश देण्यासाठी बुकीही मुलींचा वापर करत हे मला डिटेक्टिव्हने सांगितले. असिफ ज्यांच्यासमवेत बराच वेळ घालवत असे अशा 7 महिलांचे फोटो, मोबाईल नंबर आणि अन्य तपशील या डिटेक्टिव्हनेच मला दिले. या महिला बहुतांशी दुय्यम दर्जाच्या अभिनेत्री, मॉडेल्स, बार डान्सर्स व कॉलगर्ल्सही होत्या. त्यामुळे मला धक्काच बसला. या डिटेक्टिव्हने दिलेला एक नंबर बॉलीवूड अभिनेत्री नीतू चंद्राचा आहे, असे वीणाने एका भारतीय वृत्तपत्राशी बोलताना सांगितले.