सर्वव्यापी देव
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 11:40 PM (IST)
हिंदुस्थानात "रामा'बरोबर एका घरी एक मुलगा रहात असे. रामाच्या समागमात राहणारा हा मुलगा एके दिवशी छपरावर जाऊन "अहं ब्रह्मास्मि' असे मोठ्याने ओरडू लागला.ते ऐकून काही शेजारचे गृहस्थ त्याला म्हणाले की, बेट्या, तू काय बडबड चालविली आहेस? मी ईश्वर आहे असे तू म्हणतोस काय? तू ईश्वर आहेस तर मार पाहू छपरावरुन उडी. तुला काही इजा झाली नाही, तर तुझे ईश्वरत्व आम्ही कबूल करू. पण, जर काही तुला दुखापत झाली, तर आम्ही तुला मारू आणि तुझा छळ करू. अशी अधर्म्य किंवा पागंडी भाषा तू वापरू नको.
ईश्वरी प्रेमाने भारुन गेलेला तो मुलगा त्यांना म्हणाला, हे माझ्या आत्म्यांनो, मी उडी मारण्याला तयार आहे. सांगाल त्या खळग्यात आणि दाखवाल त्या समुद्रात उडी ठोकण्याची माझी तयारी आहे. पण, मी जेथे नाही असे एखादे स्थल आधी मला दाखवा. कारण, मी जेथे नाही तेथेच मला उडी मारता येईल. मी नाही अशी जागाच कोठे नाही. मी देवाचा देव आहे. सर्व ठिकाणी जो व्यापून राहिला आहे तो उडी कोठे व कशी मारणार? जो येथे आहे आणि तेथे नाही असा मर्यादित मनुष्यच उडी घेऊ शकेल. मुलाचे हे उत्तर ऐकून त्यापैकी एक गृहस्थ म्हणाला, अरे, तू असा (सर्वव्यापी) देव आहेस काय? छे, तू तर हा देह आहेस. मुलगा म्हणाला, मी देह नाही. हा देह तुमच्या कल्पनेने बनविला आहे. तुमचे प्रश्न व आक्षेप हे माझ्या आत्म्यापर्यंत पोहोचत नाहीत. ते सर्व तुमच्या कल्पनाच आहेत. मी सर्वत्र आहे. मी नाही असे कोणतेही स्थळ नाही. याप्रमाणे मी एका देहात असतो आणि दुसऱ्या देहातही नसतो तर ईश्वरत्व स्थापन करण्यासाठी मला चमत्कार करुन दाखवावे लागले असते. सर्व देह माझेच आहेत, सर्व देह आयते माझे झाले नाहीत. मला फक्त त्यांच्यावर ताबा मिळविला पाहिजे. याशिवाय मला दुसरे काही करावयाचे नाही.