Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
झारखंडमध्ये भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी मुंडा
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 01:37 AM (IST)
Tags: news

रांची, दि. 7 (वृत्तसंस्था) : झारखंडचे माजी मुख्यमंत्री अर्जुन मुंडा यांची मंगळवारी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली. भाजपने झारखंड मुक्ती मोर्चा आणि ऑल झारखंड स्टुडंटस युनियन यांच्या साथीने झारखंडमध्ये सत्तास्थापनेचा दावा करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजपने पाठिंबा काढून घेतल्याने गेल्या काही दिवसांपासून सरकार बनविण्यावरून झारखंडमध्ये सुरू असलेल्या वादावर यामुळे पडदा पडण्याची शक्यता आहे. सध्या झारखंडमध्ये राष्ट्रपती राजवट लागू आहे. मुख्यमंत्री शिबू सोरेन यांनी राजीनामा दिल्यानंतर झारखंडमधील तीन प्रमुख राजकीय पक्ष नव्याने सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरले होते. त्यामुळे राष्ट्रपती राजवट जारी करण्यात आली होती. भाजपचे वरिष्ठ नेते अजय मारू म्हणाले, की आम्ही नवीन सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.   
भाजपचे आमदार नवीन मुख्यमंत्र्यांची निवड करतील तसेच त्याबाबतचा दावा करण्यासाठी लवकरच राज्यपालांची भेट घेतील. भाजप आणि झारखंड मुक्ती मोर्चाने एकत्रित येऊन झारखंडमध्ये सरकार स्थापन केले होते मात्र, नंतर शिबू सोरेन सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा निर्णय भाजपने तडकाफडकी घेतला होता. माओवाद्यांना उघड पाठिंबा देणाऱ्या सोरेन यांच्याबरोबर मांडलेला संसार भाजपने अवघ्या चार महिन्यांतच विस्कटण्यामागे सोरेन यांनी कपात सूचनांवेळी कॉंग्रेसला केलेल्या मतदानाचे निमित्त पुढे केले होते.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: