Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  विशेष लेख  >>  बातम्या

डॉक्टरांच्या संपाने 62 रुग्णांचा मृत्यू
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 11:36 PM (IST)
Tags: vishesh lekh
राजस्थान
 जोधपूर मधल्या मथुरदास माथूर रुग्णालयातल्या डॉक्टरना, रुग्णांच्या  नातेवाईकांनी आणि पोलिसांनी केलेल्या मारहाणीच्या निषेधार्थ राजस्थान राज्यातल्या सरकारी रुग्णालयातील डॉक्टरांनी केलेल्या संपामुळे राज्यभरात 63 रुग्णांचे मृत्यू झाले. मंगळवारी उशिरा डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला असला, तरी सरकारने डॉक्टरांना पूर्णपणे संरक्षण देण्याची हमी दिली पाहिजे, अशी मागणी केली आहे. मथुरदास रुग्णालयातल्या पॉलिट्रामा विभागात रुग्णांच्या नातेवाईकांनी घुसून वैद्यकीय उपकरणांची मोडतोड केली. तिथल्या डॉक्टरांनाही चोपून काढले. ही घटना समजताच रुग्णालयातील सर्व डॉक्टर एकत्र आले आणि त्यांनी संघटितपणे या मारहाणीचा निषेध केला. रुग्णालयात आलेल्या पोलिसांनी निदर्शने करणाऱ्या डॉक्टर्सवर लाठीमार केल्यामुळे परिस्थिती अधिकच चिघळली. या रुग्णालयासह राज्यातील जयपूर, बिकानेर, कोटा आणि अन्य  जिल्हा रुग्णालयातील निवासी डॉक्टर बेमुदत संपात उतरले. परिणामी राज्यातील सर्व रुग्ण सेवा पूर्णपणे ठप्प झाली. रुग्णालयातील हजारो रुग्णांना औषधेही मिळाली नाहीत आणि त्यांच्यावर उपचारही बंद झाले. अत्यावश्यक शस्त्रक्रिया होवू शकल्या नाहीत. औषधोपचारा-अभावी सात बालकांसह 63 जणांचा मृत्यू झाला. डॉक्टरना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर आणि संबंधित रुग्णाच्या नाते-वाईकांवर कारवाई झाल्याशिवाय संप मागे घेणार नाही, यावर निवासी डॉक्टरांची संघटना ठाम राहिली. त्यामुळे राज्यातील वैद्यकीय व्यवस्था अवघ्या तीन दिवसात पूर्णपणे विस्कळीत झाली.
उपचारासाठी आलेल्या रुग्णांच्या लांबच लांब रांगा सर्व रुग्णालयाबाहेर होत्या. वरिष्ठ डॉक्टरनी निषेध नोंदवत बाह्योपचार विभागात रुग्णांवर उपचार केले. पण, रुग्णालयातील रुग्णांचे हाल मात्र झाले. निवासी डॉक्टरनी काळ्या पट्ट्या बांधून सोमवारी रुग्णालयाबाहेर रुग्णांना वैद्यकीय सेवा दिली. पण, संप मागे घ्यायला त्यांनी नकार दिला. राज्यातल्या खाजगी डॉक्टरांनीही या संपाला पाठिंबा दिल्यामुळे, डॉक्टरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न  ऐरणीवर आला.
मंगळवारी दिवसभर जोधपूरच्या अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी स्नेहलता पवार आणि जिल्हा पोलीस अधिक्षक राजेश सिंह यांनी संपकरी डॉक्टरांशी प्रदीर्घ काळ चर्चा केली. चौकशीत दोषी ठरवणाऱ्या पोलिसांवर  कडक कारवाई करायची ग्वाही त्यांनी दिल्यावर रात्री उशिरा राज्यातील सर्व डॉक्टरांचा संप मिटला आणि रुग्णांवर औषधोपचार सुरु झाले. रुग्णांच्या नातेवाईकांनी आणि पोलिसांनी डॉक्टरांना मारहाण केल्याच्या या प्रकरणाचा त्रास मात्र राज्यातल्या सर्व जनतेला सोसावा लागला. मुख्यमंत्री अशोक गेहलोट यांनी तातडीने हस्तक्षेप करून हा संप मिटवला असता तर रुग्णांचे बळी गेले नसते आणि संपही राज्यव्यापी झाला नसता.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: