कोण हे दादाभाई नौरोजी?
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 01:05 AM (IST)
तीस वर्षांपूर्वी विधान परिषदेत धरणग्रस्तांच्या समस्यांवर चर्चा सुरु असताना, मुळशी धरणाला विरोध करायसाठी झालेल्या लढ्याचे नेतृत्व सेनापती बापट यांनी केल्याचे, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितले. सेनापती बापट यांनी त्या धरणाला ज्यासाठी विरोध केला, त्या समस्या स्वातंत्र्यानंतरही कायम असल्याचे, विरोधी पक्षांच्या सदस्यांनी जोरदारपणे सांगत सरकारवर हल्ले चढवले. त्या चर्चेला उत्तर देताना सत्ताधारी कॉंग्रेस सरकारच्या पुनर्वसन मंत्र्यांनी, पहिल्याच वाक्यात विरोधकांना गारद केले. ते म्हणाले, हे सेनापती बापट कोण? सेनापतींचा आणि धरणग्रस्तांचा संबंध काय? मंत्र्यांची ही अक्कल पाहून सारे सभागृह थक्क झाले आणि विधानपरिषदेचे तेव्हाचे सभापती जयंतराव टिळक या उत्तराने संतप्त झाले. सेनापती बापट कोण? हे तुम्हा कॉंग्रेसवाल्यांना माहिती नाही, कारण सत्तेच्या राजकारणाशी सेनापतींचा काही संबंध नव्हता. ते देशाच्या स्वातंत्र्यासाठी, दीन दुबळ्यांसाठी, मराठी माणसांच्या हक्कासाठी आयुष्यभर झुंजले. तुम्ही फक्त सत्तेसाठी राजकारणात आला आहात. तुमची सामान्य जनतेशी, तळागाळातल्या माणसाशी नाळ केव्हाच तुटली आहे. तुम्हाला फक्त मतांचे राजकारण कळते. सेनापती बापट कोण? हे माहिती करून घ्या आणि नंतरच सभागृहात उत्तर द्या. अशा शब्दात खडसावल्यावर मंत्री महाशय ताळ्यावर आले. पण, अशा नेत्यांची आणि मंत्र्यांची सत्ताधारी कॉंग्रेस पक्षात सतत चलतीच आहे. पक्षाच्या सध्याच्या नेतृत्वासमोर मुजरे ठोकायचे प्रसंगी नेत्यांच्या चपला उचलायच्या, हुजरेगिरी करायची, जाहीर सभासमारंभातून नेतृत्वाचा जयघोष करायचा आणि पक्षातले आपले स्थान टिकवून ठेवायचे, हा कॉंग्रेसमधल्या सत्तेच्या दलालांचा धंदा झाला आहे. त्यामुळेच उगवत्या सूर्याला नमस्कार करण्यात कुशल-तरबेज असलेल्या या मंडळींना स्वातंत्र्य संग्रामात त्याग केलेल्या, निर्मोहीपणे पक्षकार्य केलेल्या नेत्यांची काही माहिती नाही आणि ती करून घ्यावी अशी गरजही त्यांना वाटत नाही. श्रीमती इंदिरा गांधी या पक्षाध्यक्ष झाल्या, तेव्हापासून कॉंग्रेस पक्षात व्यक्तिपूजेचे स्तोम प्रचंड वाढले. तीच परंपरा माजी अध्यक्ष राजीव गांधी, पी. व्ही. नरसिंह राव आणि आता सोनिया गांधींच्या कारकिर्दीतही कायम राहिली. पक्षाध्यक्षापेक्षा पक्षात कुणीही मोठे नाही, त्यांना खूष ठेवले, त्यांची प्रचंड स्तुती केली, त्यांची मर्जी संपादन केली की अन्य कशाचाही विचार करायचे कारण नाही, ही सत्तेची गुरुकिल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंतच्या कॉंग्रेसवाल्यांनी हस्तगत केली आहे. त्यामुळेच कॉंग्रेस पक्षाचा इतिहास आणि परंपरा, पक्षाच्या जुन्या नेत्यांचीही त्यांना आठवण राहात नाही.
हे सारे सांगायचे कारण म्हणजे 125 वर्षांची परंपरा असलेल्या कॉंग्रेस पक्षाचे दुसरे अध्यक्ष दादाभाई नौराजी यांच्या 185 व्या जयंतीची आठवण पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापासून ते पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यापर्यंत सर्व कॉंग्रेसवाल्यांना नव्हती. सनदशीर मार्गाने ब्रिटिश सरकारकडे भारतीयांची गाऱ्हाणी मांडून, भारतीय स्वातंत्र्याच्या चळवळीचा प्रारंभ करणाऱ्या पितामह नौरोजी यांची जयंती संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये साजरी झाली. लोकसभेच्या सभापती श्रीमती मीराकुमार, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी हे दोनच नेते या समारंभाला होते. संसदेतले अधिकारी आणि सेवकांनीही स्वातंत्र्य लढ्याच्या या पितामहांना आदरांजली वाहिली. केंद्रात सत्तेवर असलेल्या कॉंग्रेस पक्षाच्या एकाही नेत्याला, मंत्र्यांना या समारंभाला उपस्थित राहून, ज्यांच्या त्यागामुळे आपल्याला सत्ता मिळाली, त्यांना श्रध्दांजली वहावी, असे वाटले नाही. कॉंग्रेस पक्षाध्यक्षपदी चौथ्यांदा बिनविरोध निवड झालेल्या सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी मात्र त्यांचे अभिनंदन करायला कॉंग्रेसच्या नेत्यांची झुंबड उडाली होती. नौरोजी यांना आदरांजली वाहण्यापेक्षा "मॅडम'ची कृपा आपल्यावर सतत राहावी यासाठी त्यांचे अभिनंदन करणे या सत्ताबाज नेत्यांना महत्वाचे वाटले. सत्तेसाठी ज्येष्ठ नेत्यांची मर्जी कायम राखायची, हीच परंपरा असलेल्या कॉंग्रेस-वाल्यांना दादाभाईंची स्मृती ठेवायचे कारण तरी काय? कॉंग्रेसवाल्यांना दादाभाई नौरोजी यांच्या जयंती समारंभाला का आला नाहीत किंवा त्यांची जयंती साजरी का केली नाही, असे विचारल्यास, कोण हे दादाभाई! असा प्रश्न ते नक्कीच
विचारतील, इतकेच!
- वासुदेव कुलकर्णी