Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

देह नसून आत्मा
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 01:09 AM (IST)
Tags: vachnamrut

क्षुद्र लोकांनी आपले स्वातंत्र्य विकावे, तुम्ही तसे करु नये. आम्ही स्वतंत्र आहो असे या देशातील लोक म्हणतात. कदाचित त्यांना राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झाले असेल पण, सामाजिक आणि धार्मिकदृष्ट्या ते दास्यत्वात आहेत! "राम' तुमच्यासमोर विचारस्वातंत्र्य, आचारस्वातंत्र्य, सर्व तऱ्हेचे स्वातंत्र्य मांडत आहे. जो धर्म "राम' तुम्हाला सांगत आहे त्याला काही लोक वेदांत असे टोपण नाव देतात. पण, त्याला थट्टेचे किंवा निंदाव्यंजक असे कोणतेही नाव देऊ नये. खरा वेदांत वेदांमध्ये साठवून ठेवलेला नाही. तो तुमच्या अंत:करणातही आहे. म्हणून "राम' तुम्हाला एकदाच असे बजावून ठेवतो की, "राम' केवळ हिंदी नाही, तो अमेरिकनही आहे. राम हिंदू आहे असे समजू नका, तो ख्रिस्तीही आहे. तो अमुक एका पंथाचा किंवा मताचा दास आहे असे मानू नका. राम तुमचा आत्मा, केवळ स्वातंत्र्य आहे.
दुसरा एक जण रामाला म्हणू लागला की, अहो जर तुम्ही ईश्वर आहा, ख्रिस्तासारखे महात्मे आहा, तर ख्रिस्तासारखे काही थोडेसे चमत्कार करुन दाखवा म्हणजे आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवू. रामाने उत्तर दिले, हे बंधो, ख्रिस्ताने चमत्कार करुन दाखविले, तरी तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला नाही. त्याचा तुम्ही छळ केला आणि त्याला तुम्ही शेवटी सुळावर चढविले. तुम्हाला चमत्कार श्रध्दावान करु शकतील काय? चमत्काराने तुमच्यामध्ये श्रध्दा उत्पन्न होईल काय? कधीही नाही.
पुन्हा चमत्कार करुन दाखविणे म्हणजे काय? या जगातील सर्व चमत्कार या देहाने केले तरी त्यांच्या योगाने माझ्या ईश्वरत्वात यत्किंचितही भर पडणार नाही. मी हा देह नसून तुमचा आत्मा आहे. या देहाकडून चमत्कार झाले तर तुम्ही त्याचे स्तोम माजवाल. तुम्ही असे स्तोम माजवू नये, कारण ते फार वाईट आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: