बिहार
ऐक्य समूह
Wednesday, September 08, 2010 AT 01:06 AM (IST)
नक्षलवाद्यांनी पळवून नेऊन ओलीस ठेवलेल्या दोन पोलीस अधिकारी आणि एका कॉन्स्टेबलला नक्षलवाद्यांनी सोडून दिल्याने, मुख्यमंत्री नितीशकुमार हे एका संकटातून मुक्त झाले आहेत. दिनांक 28 ऑगस्ट रोजी लखीसराय जंगलातल्या कजरा पोलीस ठाण्याच्या परिसरातील शितलकोरानी जंगलात वीस जवान आणि नक्षलवाद्यांत पाच तास सशस्त्र चकमक झाली. गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या तुकडीला तीनशे नक्षलवाद्यांनी घेरून अचानक गोळीबार केला. पाच तासांच्या धुमश्चक्रीत पोलिसांचा दारुगोळा संपला. आठ जवान या चकमकीत ठार झाले. आठ जण जखमी झाले. उरलेल्या चौघांना नक्षलवाद्यांनी पळवून नेले होते. या चारही जणांची सुटका करायसाठी त्यांनी, तुरुंगातल्या आठ नक्षलवाद्यांना विनाअट मुक्त करायची मागणी केली होती. नक्षलवाद्यांशी याबाबत चर्चा करायला आपण तयार आहोत, असे नितीशकुमार यांनी जाहीर करूनही, नक्षलवाद्यांच्या टोळीशी संपर्क झाला नव्हता. आपली मागणी मान्य झाली नाही तर, चारही जवानांना ठार करायच्या धमक्या नक्षलवादी सतत देत होते. तुरुंगातल्या नक्षलवाद्यांना मुक्त करायसाठी त्यांनी सरकारला दिलेली पहिली मुदत संपली. त्यानंतर त्यांनी पुन्हा आठ तासांची मुदत दिली. नक्षलवाद्यांनी लुकास टेटे या पोलिसाला ठार मारून, त्याचा छिन्नविछिन्न झालेला पार्थिव देह जंगलाच्या बाहेर फेकून दहशत निर्माण केली. पळवून नेलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांनी नितीशकुमार यांच्या पाटणा येथील निवासस्थानासमोर धरणे धरून त्यांना साकडेही घातले होते. या घटनेला माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी राजकीय रंग फासला आणि राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बोऱ्या वाजल्याचा आरोपही केला.
ओलीस ठेवलेल्या पोलिसांच्या जीविताबद्दल राज्यभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असताना, नितीशकुमार यांनी मात्र शितलकोरानीच्या जंगलाला वेढा घालायचे आदेश पोलीस खात्याला दिले होते. हजारो पोलिसांनी या जंगलातून पळून जायच्या नक्षलवाद्यांच्या वाटा पूर्णपणे बंद केल्या. छापासत्र घालून एका एरिया कमांडरसह आठ नक्षलवाद्यांना अटक करून, या टोळीवर दबावही आणला. नक्षलवाद्यांनी आपल्या ताब्यातल्या तीन जवानांना सुखरूप सोडायचे आवाहनही त्यांनी केले होते. रविवारी सकाळी पोलीस उपनिरीक्षक अभय प्रसाद यादव, रुपेश कुमार सिन्हा आणि कॉन्स्टेबल एहसान खान या तिघांनाही नक्षलवाद्यांनी जंगलाच्या बाहेर सुखरुप सोडून दिले. प्राथमिक तपासणी करून पोलिसांनी त्यांच्या घरी पाठवले.
नक्षलवाद्यांनी चार पोलीस अधिकारी आणि जवानांना पळवून नेल्यामुळे नक्षलवाद्यांविरुध्द मोहिमेत सहभागी झालेल्या पोलिसात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. चकमकीत वाचलेल्या पोलिसांनी आपल्याला वेळेत मदत मिळाली नसल्याची तक्रारही नितीशकुमार यांच्याकडे केली होती. त्यामुळे हे प्रकरण गेल्या आठवडाभर राज्यभर गाजत होते. या तीन जवानांना सोडण्या-साठी नक्षलवाद्यांशी कोणतीही तडजोड केली नसल्याचे नितीशकुमार यांनी जाहीर केले आणि विरोधकांच्या अपप्रचाराला काटशह दिला.