मी म्हणजेच ब्रह्म
ऐक्य समूह
Tuesday, September 07, 2010 AT 01:17 AM (IST)
मी जर ईश्वर आहे, तर प्रत्येक वस्तूचे ज्ञान मला का नाही? असा एकाने प्रश्न केला. तुम्ही ईश्वर आहा, देव आहा असे राम नेहमी सांगत असतो. हे ऐकून एका मनुष्याने विचारले की, मी जर ईश्वर आहे तर मला सर्वाचे ज्ञान का नाही? रामाने त्याला विचारले, तू ईश्वर नाहीस तर कोण आहेस? तो म्हणाला मी देह आहे. राम म्हणाला, ठीक आहे. तू देह आहेस, तर मग हे डोके तुझेच आहे, त्यावर केस किती आहेत हे सांग पाहू. तसेच देहात हाडे, स्नायू किती आहेत? आज पहाटे सेवन केलेले अन्न जठरात, आतड्यात, फुफ्फुसात, मूत्रपिंडात, दुसरीकडे कोठे आहे ते सांग पाहू. याचे उत्तर त्याला काही देता येईना. केस, हाडे, स्नायू हे जरी तुम्हाला सांगता येत नाहीत तरी ते तुमचे आहेत. खाल्लेले अन्न कोठे गेले किंवा कोठे आहे हे जरी तुम्हाला सांगता आले किंवा न आले तरी ते तुमच्याशिवाय दुसरे कोणीही खाल्ले नाही, आणि त्या अन्नावर पुष्ठ झालेला देह तुमचा आहे हे खास. याप्रमाणे, आकाशात तारे किती आहेत हे जरी तुमच्या बुद्धीला सांगता न आले तरी ते तुमचेच आहेत. इंग्लंड देशात किंवा बुध ग्रहावर यावेळी काय प्रकार चालला आहे, हे जरी तुमच्या बुध्दीला सांगता आले नाही तरी ते प्रदेश तुमचेच आहेत. या गोष्टी तुम्हाला सांगता आल्या नाहीत तरी तेवढ्याने त्या तुमच्या नव्हेत, असे सिध्द होत नाही. हे सर्व कोणी सांगावयाचे? मर्यादितांचे किंवा सान्ताचे हे काम. या भिंतीवरील चित्र कोणाचे आहे हे तुम्ही सांगाल, कारण, ते चित्र आपण नाही, चित्र दृश्य आहे, आपण द्रष्टा आहो ते तुम्ही जाणत आहा. चित्र तुमच्याहून भिन्न असल्यामुळे ते कोणाचे हे तुम्ही सांगता. येथे तुम्ही याचा संकुचित अर्थ म्हणजे तुमचा अहंकार असा आहे. पण, जर ते चित्र तुम्ही आहा, सर्व काही तुम्ही आहा, तुमच्याशिवाय दुसरे काही नाही.