श्री बालाजीच्या संपत्तीचा विमा
ऐक्य समूह
Tuesday, September 07, 2010 AT 01:13 AM (IST)
तिरुपती श्री बालाजी हे जगातले सर्वात श्रीमंत देवस्थान! या देवस्थानची नेमकी मालमत्ता आणि संपत्ती किती आहे, याची मोजदादही करता येत नाही. दहा अब्ज डॉलर्सपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या, बालाजी संस्थानच्या मालकीचे सोनेच वीस मेट्रिक टनाच्यावर आहे. त्यात अमूल्य रत्ने, माणके, जवाहिर आणि रत्नजडीत दागिन्यांचाही समावेश आहे. गेली सातशे वर्षे श्री बालाजीला सोन्या-चांदीचे दागिने भक्तांच्याकडून अर्पण केले जातात. राजा कृष्णदेवरायासह अनेक राजांनी श्री बालाजीला अमूल्य दागिने अर्पण केले होते. शतकानुशतके आणि दररोज बालाजीच्या या सोन्याच्या साठ्यात वाढ होते आहेच. हे सारे सोने मंदिराच्या परिसरात खजिन्यातच साठवले आहे. प्राचीन दागिन्यांची नेमकी किंमत किती? याचा अंदाज काही देवस्थानलाही करता येणारा नाही. कारण, जागतिक बाजारात सोन्याच्या आणि रत्नांच्या सध्याच्या किंमतीपेक्षा त्याचे मूल्य हजारो पटीने अधिक आहे.
गेल्या काही वर्षात बालाजीच्या दागिन्यांच्या खजिन्यातील काही अमूल्य दागिने इथल्या कर्मचाऱ्यांनी आणि पुजाऱ्यांनी पळवले. लंपास केले. मुळ सोन्याच्या दागिन्यांच्या ठिकाणी नकली दागिने ठेवले. हे प्रकरण उघडकीस आल्यावर संस्थानने चौकशी सुरू केली. तेव्हा, एका कर्मचाऱ्याने आत्महत्याही केली. हजारो कोटी रुपयांच्या दागिन्यांची चोरी झाली असावी, असा अंदाज आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यावर बालाजी देवस्थानचे व्यवस्थापन करणाऱ्या संस्थानने बालाजीच्या सर्व दागिन्यांचा विमा उतरवायचा निर्णय घेतला. त्यासाठी सर्वसाधारण विमा कंपन्यांना बोलावूनही घेतले. 52 हजार कोटी रुपयांच्या रत्नजडित दागिन्यांचा विमा पहिल्या टप्प्यात उतरवला जावा, असे देवस्थानला वाटते. परंतु एवढ्या मोठ्या रकमेचा विमा उतरवायला कोणतीही एक विमा कंपनी तयार नाही. प्राचीन दागिन्यांची सध्याची किंमतच अब्जावधी रुपयांत असेल आणि ती ठरवणार कोण? असाही प्रश्न समितीसमोर आहे. अनेक प्राचीन दागिन्यांची कागदपत्रेही व्यवस्था-पनाकडे नाहीत. श्री बालाजीच्या या अफाट संपत्तीची पूर्णपणे मोजदाद करायसाठी जागतिक दर्जाच्या कंपनीलाच बोलावून घ्यावे लागेल, असे पुरातत्व खात्याच्या तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
श्री बालाजी तिरुमला-तिरुपती देवस्थान व्यवस्थापन समिती दरवर्षी सामाजिक आणि लोककल्याणकारी कार्यासाठी शेकडो कोटी रुपयांचा खर्च करते. भक्तांच्या सुविधां-साठीही सतत खर्च केला जातो. पण, कुबेराला लाजविल अशी संपत्ती असलेल्या श्री बालाजीची संपत्तीची ही गंगाजळी दरवर्षी शेकडो कोटी रुपयांनी वाढतेच आहे. श्री बालाजीच्या दर्शनासाठी दररोज 70 हजार ते 1 लाख भाविक येतात. ते हुंडीत लक्षावधी रुपये अर्पण करतात. सोन्याचे दागिनेही अर्पण करतात. आंध्रप्रदेशातल्या एका भक्ताने 42 कोटी रुपयांचा सोन्याचा रत्नजडित मुकुट श्री बालाजीला अर्पण केला होता. अशा श्रीमंत भक्तांची संख्याही वाढत असल्यामुळे या संपत्तीचे संरक्षण ही व्यवस्थापना-समोर मोठी समस्या आहे.