Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

वसुंधराबाई पटवर्धन
ऐक्य समूह
Tuesday, September 07, 2010 AT 01:12 AM (IST)
Tags: lolak

भारतीय रुढी- परंपरांच्या साखळदंडात अडकून पडलेल्या, पिचलेल्या स्त्रियांचं भावविश्व वसुंधरा पटवर्धन यांनी कथेच्या रुपानं मराठी साहित्यात प्रथम आणलं आणि स्त्रियांच्या दु:खाला वाचा फोडली. त्यांनी कथा लेखन सुरु करण्यापूर्वी मराठी साहित्यातील स्त्री लेखिकांचं विश्व हे विशिष्ट चाकोरीतच अडकून पडलेलं होतं. ते बंदिस्त झालं होतं. वसुंधराबाईंनी मात्र ही चौकट आपल्या प्रतिभेनं मोडून टाकली आणि स्त्रियांच्या व्यथा वेदनांचा हुंकार, त्यांनी लिहिलेल्या कथांमुळे वाचकापर्यंत पोहोचला. वसुंधरा बाईंची निरीक्षण शक्ती अत्यंत सूक्ष्म होती. स्त्रियांच्या मानसिक घुसमटीचाही विचार त्या करीत असत. सामाजिक प्रथांच्या साखळदंडात अडकल्यामुळे स्त्रियांच्या इच्छा आणि आकांक्षांचा कोंडमारा कसा होतो, त्यांच्या समस्या मूक कशा राहतात, याचेही यथार्थ दर्शन त्यांनी घडवलं. 1951 मध्ये त्यांचा  "संसार शोभा' हा पहिला कथा संग्रह प्रसिध्द झाला आणि वसुंधराबाईंच्या स्वतंत्र शैलीच्या साहित्य लेखनाची प्रशंसा झाली. या यशानंतर त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. अखंड चाळीस वर्षे त्यांनी प्रामुख्याने कथा लेखन केले. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील आधुनिक बदलांना सामोरं जाणाऱ्या, धीट आणि  निर्भय महिलांचं भावविश्वही त्यांनी आपल्या कथाद्वारे साहित्यात आणलं. त्यांनी भारतीय संस्कृती आणि मूल्याशी मात्र साहित्य लेखन करताना कधीही तडजोड मात्र केली नाही. त्यामुळंच देवघरातल्या नंदादीपाप्रमाणं त्यांचं साहित्यिक जीवन, मंद प्रकाश देत राहिलं.
18 एप्रिल 1917 रोजी जन्मलेल्या वसुंधराबाईंच्या वडिलांनी त्यांना शाळेत घातलं. सातवीपर्यंत त्यांचं शिक्षण झालं. माहेरी असतानाच वडिलांनी त्याला त्या काळातील साहित्य आणि धार्मिक ग्रंथही वाचायला लावले. त्यांचे विचार असे बालपणीच प्रगल्भ झाले. वयाच्या पंधराव्या वर्षी कृष्णाजी पटवर्धन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. संसार सुरु झाल्यावर, भारतीय संसारिक महिलांच्या व्यथा, वेदना त्यांनी अधिक डोळसपणे टिपल्या. त्यांनी लिहिलेल्या कथांची भाषाही अत्यंत साधी, सोपी आणि परस्पराशी संवादात्मक हितगुज करणारी होती. त्यामुळंच त्यांच्या कथा वाचकप्रिय झाल्या. कथा लिहिताना त्यांनी मनोरंजनासाठी अलंकार आणि उत्प्रेक्षकांचा वापर मात्र करायचे प्रकर्षाने टाळले. सामान्य माणसं अलंकारिक कधी बोलत नाहीत. ती आपली दु:खही साध्या भाषेतच व्यक्त करतात. कथेतही त्यांच्या भावभावना त्यांच्याच भाषेत व्यक्त व्हायला हव्यात, असं त्या सागंत असत. त्यांनी कथा लेखन सुरु केलं, त्या काळात वि. स. खांडेकर, ग. त्र्यं. माडखोलकर, ना. सी. फडके यांच्या अलंकारिक भाषेचा प्रभाव मराठी साहित्यावर होता, पण वसुंधराबाईंनी मात्र निर्धाराने ही चौकट मोडली.
परित्यक्ता, नोकरी करणाऱ्या महिला, सर्वसामान्य मजूर महिला, यांचंही भावविश्व त्यांनी आपल्या कथांद्वारे वाचकांसमोर आणलं. स्त्रियांची विविध रुपं रेखाटतानाच "अंधार', ही वादळी कथाही लिहायचं धैर्यही त्यांनी दाखवलं. व्रतस्थपणे साहित्य सेवा करणाऱ्या वसुंधराबाईंच्या कथा लेखनावर पु. भा. भावे यांच्या शैलीची छाप स्वच्छपणे जाणवते. पण त्यामुळे त्यांच्या स्वतंत्र कथा लेखनाच्या बाजाला मात्र बाधा आलेली नाही.
पैठणी, पिपाणी, शोध, आंतरपाठ, संघर्ष, उपासना असे त्यांचे तीस कथासंग्रह प्रसिध्द झाले. त्यातल्या काहींना राज्य सरकारचे पुरस्कारही मिळाले. मो. ग. रांगणेकर यांच्यासाठी त्यांनी आपल्याच कथेवरून "हिरकणी' हे नाटकही लिहिलं होतं. त्या नाटकाला राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता. 2002 मध्ये महाराष्ट्र साहित्य परिषदेनं शरदबाबू पुरस्काराने त्यांना गौरविले होते. महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाने 1994 मध्ये गौरववृत्ती देऊन त्यांचा सन्मान केला होता. पु. भा. भावे साहित्य स्मृती समितीनेही त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव केला होता.
प्रीतीची हाक आणि नेत्रा या दोन कादंबऱ्या, हाय हे अमेरिकन सामाजिक विश्वाचे दर्शन घडवणारे प्रवास वर्णनही त्यांनी लिहिले आहे. "मधुची आई'या कथेवरून निघालेला "एकटी' हा चित्रपटही लोकप्रिय झाला होता. जीवनच्या उत्तरार्धात वसुंधरा बाईंनी अध्यात्माचा वेधही घेतला होता. अध्यात्मिक अनुभवही त्यांनी लिहून
ठेवले आहेत.
अलिकडे धिट लिहिण्याच्या नावाखाली ओंगळवाण्या प्रसंग आणि शब्दांचा आश्रय घेणाऱ्या तथाकथित बोल्ड कथा लेखिकाही आहेत. पण, सवंग लोकप्रियतेसाठी वसुंधराबाईंनी हे असले लेखन कधीही केले नाही, हे त्यांचे वैशिष्ट्य!
- वासुदेव कुलकर्णी

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: