वेदांताचा उपदेश
ऐक्य समूह
Sunday, September 05, 2010 AT 01:09 AM (IST)
जेथे "मी' या शब्दाने "शरीर किंवा मन' असा अर्थ समजला जातो, त्या देशात वेदांताचा उपदेश करणे फार कठीण आहे. "मला आत्मा आहे,' असे येथील लोक म्हणतात आणि मी म्हणजे शरीर, मन किंवा जीव असे समजतात. वेदांती "मी'चा अर्थ असा केव्हाही घेत नाही. शरीर, मन इत्यादी मी नाही. मी जर काही असेन, तर मी ईश्वर आहे असे तो म्हणतो.
"मी ईश्वर आहे' हे विधान "मी राजा आहे,' "मी स्वामी आहे', "मी गरीब आहे', "मी अमेरिकन आहे', "मी हिंदू आहे' इत्यादी विधानांसारखे नाही. ते त्याहून निराळे आहे. राजा, स्वामी, गरीब वगैरे माझ्या उपाध्या, पदव्या अथवा गुणधर्म आहेत. त्याप्रमाणे ईश्वरत्व माझा गुणधर्म नाही. "मी ईश्वर आहे,' हे विधान "रज्जु भुजंग आहे' या विधानासारखे आहे. "भुजंग काळा आहे' या वाक्यात काळेपणा हा भुजंगाचा गुण आहे. पण "रज्जु भुजंग आहे' या विधानात रज्जु किंवा भुजंग हा गुण नाही. भुजंग काळा आहे, रज्जु भुजंग आहे या दोन्ही वाक्यातील भेद लक्षात ठेवा. याप्रमाणे, "मी पवित्र आहे, मी देवदूत आहे' हे एक तऱ्हेचे विधान आहे. "अहं ब्रह्मस्मि' असे हिंदू जेव्हा म्हणतो, तेव्हा "मी' याचा अर्थ हे शरीर नव्हे, तुम्ही चुकीने असे समजता. मी हाड, मांस, अस्थी, स्नायू यांचा गोळा नव्हे, औट हात देह नव्हे, मन नव्हे, बुध्दी नव्हे, तर मी सर्वांचे उगमस्थान, खरी शक्ती, सद्वस्तू, ईश्वर आहे. या व्यतिरिक्त मी म्हणजे दुसरे काही नाही.
तसेच "देवा, अमुक कर, तमुक कर' असे लोक म्हणतात, जणू काय देव य:कश्चित मनुष्य आहे आणि त्याला आपल्या न्यायासनासमोर खेचून आणून उभा करता येईल आणि त्याचा जाब घेता येईल.