Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
एकतर्फी प्रेमातून मामेबहिणीचा निर्घृण खून
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:56 AM (IST)
Tags: news

पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) : एकतर्फीप्रेमातून संगणक अभियांत्रिकीच्या दुसऱ्या वर्गात शिकणाऱ्या मामेबहिणीचा आतेभावाने चॉपर व सत्तूराने वार करुण तिचा निर्घृण खून केल्याची खळबळजनक घटना शुक्रवारी सकाळी पिंपरीतील वाल्हेकरवाडी येथे घडली. या हल्ल्यात या तरुणीची मैत्रीणही जखमी झाली आहे. या हल्ल्यानंतर या माथेफिरू तरुणाने स्वत:वर वार करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही तरुणी मूळची नाशिकची आहे.
ज्योत्स्ना काभारी बागूल (वय 20, रा. वाल्हेकरवाडी, मूळची रा. नाशिक) असे बळी पडलेल्या तरुणीचे नाव आहे तर साधना जगन्नाथ बोरसे (वय 20, रा.  वाल्हेकरवाडी मूळची मुंबई असे तिच्या मैत्रिणीचे नाव असून, या हल्ल्यात ती जखमी झाली आहे. तिच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी ज्योत्स्नाचा आतेभाऊ योगेश बच्छाव (वय 25, रा. तळेगाव दाभाडे) याच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यालाही निगडीतील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ज्योत्स्नाचे वडील कारभारी बागुल हे प्राथमिक शिक्षक आहेत, तर आई गृहिणी आहे. ज्योत्स्नाही त्यांची एकुलती एक मुलगी होती. तिला एक भाऊ आहे. घरात ती सर्वांची लाडकी होती. तिच्या निधनामुळे तिच्या वडिलांना जबर मानसिक धक्का बसला. ज्योत्स्नाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात आणण्यात आला असताना तिच्या वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्याने माझ्या मुलीला त्रास दिला. लग्नासाठी नातेवाईकांना 80-80 एसएमएस केले. याबाबत पोलिसांकडे तीन वेळा तक्रार नोंदवली पण, नुसत्या एसएमएसवरून काही करता येणार नाही, असा पवित्रा पोलिसांनी घेतला. त्यामुळे कारवाई झाली नाही. वेळीच कारवाई झाली असती तर माझ्या मुलीचा असा बळी गेला नसता, आता पोलीस त्याच्यावर काय कारवाई करणार, माझ्या मुलीला परत आणून देणार का असा आक्रोश करीत हंबरडा त्यांनी फोडला. या प्रश्नाने पोलीसही क्षणभर सुन्न झाले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: