लाल बहाद्दूर शास्त्री
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:01 AM (IST)
बनारसला हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये शिकत असताना लाल बहाद्दूर शास्त्रींना खरे गुरु भेटले. त्यांचे नाव निष्कामेश्वरजी मिश्रा होय. मिश्राजी शाळेत अभ्यासक्रमाबरोबर ऐतिहासिक नेत्यांच्या गोष्टी सांगत असत. त्यातून राष्ट्रीय चळवळीची माहिती मुलांना मिळत असे. अशा गोष्टीतून मुलांचे राष्ट्रावरील प्रेम दृढ होत होते. याच काळात लालबहाद्दुरांना लोकमान्य व महात्मा गांधींची भाषणे ऐकावयास मिळाली. त्याचा चांगला परिणाम दिसू लागला.टिळकांचे भाषण ऐकण्यासाठी बनारसला जायचे होते परंतु जवळ पैसा नव्हता. उसने मागण्याची सवय नव्हती. नाईलाजाने त्यांनी मित्राकडून रेल्वे प्रवासासाठी पैसे घेतले वे ते बनारसला गेले. "स्वराज्य हा माझा जन्मसिध्द हक्क आहे आणि तो मी मिळवणारच,' ही टिळकांची गर्जना ऐकून लाल बहाद्दुरांचे मन पेटून निघाल्यास नवल नाही. त्याच सुमारास जालियानवाला बाग हत्याकांडामुळे संपूर्ण देश ढवळून निघाला होता. सर्वांबरोबर लालबहाद्दूर यांनीही परीक्षेवर बहिष्कार टाकला. तेव्हा त्यांच्यावर कठोर टीका झाली. परंतु त्यांनी आपला हट्ट कायम ठेवला. बनारसला येवून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली. वयाच्या 17 व्या वर्षी प्रथम अटक झाली. पुढे त्यांनी आपले सारे आयुष्य देशाला अर्पण केले. त्याचबरोबर काशी विद्यापीठाची तत्वज्ञान या विषयातील "शास्त्री' ही पदवी घेतली. तेव्हापासून ते लाल बहाद्दूर शास्त्री म्हणून प्रसिध्द झाले. तात्पर्य : नि:स्वार्थीपणे देशासाठी सर्वस्व अर्पण करुन जीवन सार्थक बनते.