शरद जोशी
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 12:57 AM (IST)
देशातल्या शेतकऱ्यांना न्याय हक्क आणि अधिकार मिळवून द्यायसाठी गेली 26 वर्षे अखंड संघर्ष करणारे शेतकऱ्यांचे लाडके नेते खा. शरद जोशी यांनी शुक्रवारी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केले. शेतकरी संघटनेची स्थापना त्यांनी केली, तेव्हा बरोबर असलेले त्यांचे काही सहकारी संघटना सोडून गेले. त्यांनी स्वतंत्र शेतकरी संघटना स्थापन केल्या. पण, शरद जोशी यांनीच शेतकऱ्यांतला स्वाभिमान जागृत करुन, त्यांना सरकारविरुध्द लढाईसाठी रणांगणात आणले, हे श्रेय सर्वस्वी जोशींचेच, त्यांचे हे जुने सहकारीही नाकारीत नाहीत.
अर्थशास्त्राचे गाढे व्यासंगी अभ्यासक असलेले जोशी संयुक्त राष्ट्रसंघात उच्च पदावर नोकरीत होते. त्यांना पगारही भरपूर होता. पण, 1976 मध्ये ते नोकरी सोडून मायदेशी परतले आणि पुण्याजवळच्या आंबेठाण गावात कोरडवाहू जमीन विकत घेवून शेती करु लागले. अर्थशास्त्राचे पुरेपूर ज्ञान असलेल्या जोशींना, शेती का परवडत नाही, याचा उलगडा स्वत:च शेती केल्यामुळे झाला. दरम्यान याच काळात पुण्यात कांद्याचे भाव मातीमोल झाले. कांद्याला उत्पादन खर्चाशी सांगड घालून भाव मिळावा, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व त्यांनी केले. या यशस्वी लढ्यातूनच शेतकरी संघटनेचा जन्म झाला. त्यानंतर नाशिकमध्ये उसकरी शेतकऱ्यांचे आंदोलन आणि त्यापाठोपाठ निपाणी परिसरातील तंबाखू शेतकऱ्यांचे आंदोलन त्यांनी केले. शेतकऱ्यांचे आंदोलन करणारे जोशी सदैव शेतकऱ्यांच्या बरोबरच राहिले. पोलिसांच्या लाठ्याही त्यांनी खाल्ल्या. तुरुंगवासही सोसला. शेतकऱ्यांच्या सुख दु:खाशी पूर्णपणे एकरुप आणि समरस झालेला हा आपला नेता असल्याची खात्री त्यामुळेच शेतकऱ्यांना झाली.
भारत स्वतंत्र झाला, तरी शेतकऱ्यांना त्यांचे न्याय हक्क मिळवून न देणारे राज्यकर्ते हे परकीय सत्ताधीशांचे वारसदार म्हणजेच इंडियावाले आहेत, हे त्यांनी शेतकऱ्यांना समजावून दिले. इंडिया विरुध्द भारत असा दुसऱ्या स्वातंत्र्याचा लढा त्यांच्याच नेतृत्वाखाली सुरु झाला. शेतकरी-कष्टकरी महिलांनाही त्यांनीच आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरायचे आवाहन केले आणि 1986 मध्ये नाशिक जिल्ह्यातल्या चांदवड येथे झालेल्या शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या अधिवेशनाला लाखो महिला उपस्थित राहिल्या. शेतकरी महिला वर्गात त्यांनी निर्माण केलेली ही जागृती, म्हणजे शेतकरी संघटनेच्या आंदोलनाचे नवे पर्व ठरले.
जोशी यांच्या नेतृत्वाखाली ऊस, दूध आणि अन्य आंदोलने झाली. त्यातली काही अयशस्वी झाली. पण शेतीमालाला उत्पादन खर्चाशी सांगड घालून योग्य भाव मिळालाच पाहिजे, हे त्यांनी मांडलेले सूत्र देशातल्या कोट्यवधी शेतकऱ्यांच्या काळजात भिनले, हेच त्यांच्या अथक परिश्रम आणि लढ्याचे हेच खरे यश होय!
जोशी यांनी शेतकऱ्यांची आंदोलने सुरु करण्यापूर्वी राजकीय नेतेच, राजकीय हितलाभासाठी शेतकरी मेळावे घेत असत. शेतकऱ्यांच्या हिताच्या नावाने गळा काढून रडत असत. जोशी यांनी मात्र शेतकऱ्यांना जागे केले. त्यांच्या चळवळीने आणि विचाराने शेतकरी योध्दा झाला. शेतकरी महिलाही लढ्यासाठी रणांगणात उतरायला लागल्या. ते स्वत: अर्थशास्त्रज्ञ असल्यामुळेच, शेतीच्या त्यांनी मांडलेल्या समस्या चुकीच्या आहेत, असे सांगायचे धाडस राजकारणी आणि सत्ताधाऱ्यांना होत नाही. जनतेचे हे लाडके नाना आणि शेतकरी महिलांचे भाऊ, शतायु होवोत!