Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहिवडी पेट्रोल पंप दरोड्याचा गुन्हा ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान उघडकीस
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:58 AM (IST)
Tags: news

सातारा, दि. 3 ः स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, सातारच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ऑपरेशन ऑल आऊट दरम्यान दहिवडी येथील पेट्रोल पंप दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणला.
स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी गुन्हा घडल्यापासून 7 दिवसांच्या आत गुन्हा उघडकीस आणून पाच संशयित आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे. तसेच या संशयित आरोपींकडून इतर काही महत्वाचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
दहिवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहिवडी येथे शिंगणापूर रस्त्यालगत असलेल्या बालाजी ऑटो पेट्रोल पंप येथे दि. 26 ऑगस्ट रोजी रात्री 10.15 वाजण्याच्या सुमारास 6 अनोळखी संशयित आरोपींनी दुचाकीवरून येवून पेट्रोल पंपावर असलेल्या कामगारांना दहशत निर्माण करून 32 हजार 300 रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. त्यामध्ये रोख रक्कम 27 हजार 650, अडीच ग्रॅम सोन्याची अंगठी, दोन मोबाईल हॅंडसेट असा माल चोरून नेला होता.
पोलीस अधीक्षक विठ्ठल जाधव, अप्पर पोलीस अधीक्षक सदानंद वायसे-पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गस्त घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एम. मोरे, सहाय्यक फौजदार वाकडे, हवालदार काटकर, नाळे, घोरपडे, यादव, मुंगसे, शिंदे, कदम असे ऑल आऊट ऑपरेशन करताना कोरेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेकॉर्डवरील गुन्हेगार व संशयित वाहने चेक करत असताना बातमीदारामार्फत माहिती मिळाली, की काही इसम कोरेगाव-पुसेगाव रस्त्यावर रामोशीवाडी ते वर्धनगड दरम्यानच्या घाटात दुचाकीवरून फिरत आहेत. 
अशी माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता दोन दुचाकीवरून काही इसम चालले होते. त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाऊ लागले. त्यानंतर जीपने ओव्हरटेक करून त्यांना रस्त्याच्याकडेला उभे राहण्यास भाग पाडले. पो. नि. एस. एम. मोरे व स्टाफच्या मदतीने संशयितांना पकडून त्यांचा नाव पत्ता विचारला असता किसन उर्फ तात्या सदाशिव मदने (वय 25), रा. रामोशीवाडी, ता. कोरेगव, संभाजी भानुदास बुधावले (वय 20), रा. बुधावलेवाडी, ता. खटाव, अनिल रमेश बुधावले (वय 20), रामोशीवाडी, ता. कोरेगाव, अंकुश महादेव मदने (वय 19), रा. रामोशीवाडी, सोमनाथ आप्पा बुधावले (वय 19), रा. बुधावले अशी त्यांनी नावे सांगितली. त्यांच्याकडील दोन दुचाकी व 4 मोबाईल हॅंडसेट जप्त करून त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता प्रथम त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सात दिवसांपूर्वी दहिवडी गावच्या हद्दीत दहिवडी-शिंगणापूर जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या बालाजी ऑटो पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना धाक दाखवून रोख रक्कम, मोबाईल असा ऐवज चोरून नेेला असल्याचे सांगितले. दहिवडी पोलीस ठाण्यात याबाबतच्या गुन्ह्याची नोंद झाली होती. संशयित आरोपींनी वरील गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने रात्री 3 वाजता त्यांना अटक करण्यात आली आहे. दहिवडी पोलीस ठाण्याचे सपोनि माने तपास करत आहेत, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: