Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

फिक्सर खेळाडूंवर आयसीसीची निलंबनाची कुऱ्हाड
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:10 AM (IST)
Tags: news


लंडन, दि. 3 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानी खेळाडूंवर असलेल्या "स्पॉट फिक्सिंग'च्या आरोपांमुळे क्रिकेटची प्रतिष्ठा धोक्यात आली असताना ती टिकवण्यासाठी आयसीसीने सलमान बट्ट, मोहम्मद असिफ व मोहम्मद आमेर यांना तात्पुरते निलंबित करण्याची अभूतपूर्व कारवाई केली आहे. अँटी करप्शन कोडनुसार आयसीसीने खेळाडूंना निलंबित करण्याची कारवाई क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच घडत आहे.
दरम्यान, स्पॉट फिक्सिंगच्या तपासात स्कॉटलंड यार्ड पोलिसांच्या ताब्यात असलेल्या नोटा पाकचा कर्णधार सलमान बट्टच्या हॉटेलच्या खोलीतून व लॉकरमध्ये आढळल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. क्रिकेट जगत ढवळून काढणाऱ्या स्पॉट फिक्सिंग प्रकरणाचा अधिक तपशील जाहीर करण्याचा इशारा "न्यूज ऑफ वर्ल्ड' या टॅब्लॉईडने दिला आहे.
या तीन खेळाडूंनी केलेल्या गुन्ह्याची अधिकृत खबर मिळाल्याने त्यांना सर्व प्रकारचे क्रिकेट व क्रिकेटशी संबंधित गोष्टींमध्ये सहभागी होण्यावर तत्काळ निलंबित करण्यात आले आहे. हे निलंबन या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत राहील, असे आयसीसीने म्हटले आहे. दरम्यान, पाकिस्तानने मात्र आपल्या खेळाडूंचा बचाव करणे सुरूच ठेवले आहे. पाकचे इंग्लंडमधील उच्चायुक्त हसन म्हणाले, मला हे तिन्ही खेळाडू पूर्णपणे निष्पाप असल्याचे आढळले आहे. ते या प्रकरणात सहभागी नाहीत. त्यांना फसवण्यात आले असून एजंट मजहर माजिद हा खरा गुन्हेगार आहे. त्याने काही आशियाई बुकींना गंडा घातला आहे.
ब्रिटिश प्रसारमाध्यमांनी आशियाई बुकी असे म्हटले आहे. मात्र ते जर पाकिस्तानातील असते तर माध्यमांनी बुकी पाकिस्तानी आहेत, असे म्हटले असते. त्याचा अर्थ असा होतो, की या प्रकरणात काही भारतीय बुकी सहभागी असावेत. या माजिदने भारतीय बुकींना ठकवल्याचे आरोप आहेत. त्यामुळे त्यांच्या स्रोतांनी दिलेल्या माहितीवरुन हे स्टिंग ऑपरेशन झाले असावे.
आयसीसीने या खेळाडूंना निलंबित केले असले तरी आपल्याविरुध्द केलेल्या या कारवाईला आव्हान देण्यासाठी स्वतंत्र लवादाकडे दाद मागता येईल. त्याशिवाय आपल्यावर असलेल्या आरोपांबाबत लाच-लुचपत प्रतिबंधक युनिटच्या स्वतंत्र लवादासमोर आपला पक्षही मांडता येईल, असे आयसीसीने स्पष्ट केले आहे. खेळाडूंना दोषारोपपत्र मिळाल्यापासून 14 दिवसांच्या आत सुनावणीसंदर्भात आपले म्हणणे देता येईल, असेही आयसीसीने म्हटले आहे.
दरम्यान, स्पॉट फिक्सिंग प्रकरणात स्कॉटलंड यार्डने हस्तगत केलेल्या रकमेतील खुणा केलेल्या नोटा हॉटेलमधील सलमान बट्टची खोली व लॉर्डस्‌ मैदानातील लॉकर-मध्ये आढळल्याचे समजते. डेली मेल या वृत्तपत्राने यासंबंधीचे वृत्त दिले आहे.
यूज ऑफ द वर्ल्ड या टॅब्लॉईडच्या गुप्त बातमीदाराने संशयित एजंट मजहर माजिदला स्पॉट फिक्सिंगसाठी दिलेल्या दीड लाख पौंड रकमेपैकी या नोटा आहेत. या नोटांवर विशिष्ट खुणा केल्या होत्या, जेणेकरुन पोलिसांना त्या शोधणे सोपे होईल, असे या वृत्तात म्हटले आहे. या नोटा न्यूज ऑफ द वर्ल्डच्या स्टिंग ऑपरेशनमधूनच आल्या आहेत का याची पडताळणी करण्यासाठी त्यांची फॉरेन्सिक प्रयोगशाळेत तपासणी करण्यात आली. या स्टिंगद्वारे देण्यात आलेल्या नोटा बट्टच्या कब्जातून पोलिसांनी जप्त केल्याचे सकृतदर्शनी दिसते. त्यामुळे हे प्रकरण खरे असण्याचे मानायला कारणे आहेत, असेही वृत्तात नमूद आहे.
दरम्यान, पाकचे लंडनमधील उच्चायुक्त पाक क्रिकेटपटूंची पाठराखण करण्यास पुढे आल्याने स्पॉट फिक्सिंग प्रकरणातील आणखी तपशील उघड करण्याचा इशारा टॅब्लॉईडने दिला आहे. इंडिपेंडंट या वृत्तपत्राने न्यूज ऑफ द वर्ल्ड या टॅब्लॉईडशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी हा इशारा दिला.
पाक क्रिकेटपटूंविरुध्द षडयंत्र रचण्यात आले आहे. या खेळाडूंची माध्यमांनी बदनामी केली असून ते माध्यमांच्या चारित्र्यहनन मोहिमेचे बळी आहेत, असे पाकचे राजदूत वाजिद एस. हसन यांनी सीएनएन या वाहिनीला सांगितले. हसन यांनी न्यूज ऑफ द वर्ल्डने केलेल्या स्टिंग ऑपरेशनच्या ध्वनिचित्रफितीच्या सत्यतेवरच संशय व्यक्त केल्याने या टॅब्लॉईडने स्पॉट फिक्सिंगमधील आणखी तपशील उघड करण्याचा इशारा दिला.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: