Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  वचनामृत  >>  बातम्या

संस्कारभेद
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:00 AM (IST)
Tags: vachnamrut

कर्मतत्त्वाप्रमाणे हल्लीच्या परिस्थितीत विषमता आमच्या पूर्वकर्मांनी उत्पन्न केली आहे. यावरुन असे दिसते की, आमच्या पूर्वजन्मातही कर्मे, वासना, इच्छा यातील वैचित्र्य असले पाहिजे. काहीजण पूर्वजन्मी रोगी, कित्येकजण दरिद्री तर काही श्रीमंत असले पाहिजेत. हे भेद कशाने झाले? याचे उत्तर असे आहे की, त्याही पूर्वीच्या जन्मातील संस्कारभेदाने. तिसऱ्या जन्मातील विषमता त्याही पूर्वीच्या म्हणजे चौथ्या जन्मातील संस्कारभेदाने. याप्रमाणे पाहता कर्मतत्त्वामुळे, वरील प्रश्न न सुटता तो अधिक बिकट होत जातो. कालाच्या आरंभीही - कालाला आरंभ असेल तर या तत्त्वाप्रमाणे - विषमता आणि विरोध आहेच. आता या प्रश्नाचे स्वरुप असे आहे की, ईश्वराने अनादिकालापासून ही विषमता का ठेवली? अनादिकालापासून ईश्वराने एके ठिकाणी श्रीमंत किंवा निरोगी आणि दुसरे ठिकाणी दरिद्री किंवा रोगी का ठेवले असावे? हे किती अवास्तव आणि अयोग्य दिसते बरे! या विषमतेचे समर्थन कसे करावयाचे? वेदांत सांगतो की, या प्रश्नाचे उत्तर तुम्ही दिले पाहिजे. उत्तर देण्याची जबाबदारी वेदांतावर नाही. "एकमेवाद्वितीयम्‌'  किंवा अद्वैत तत्त्वावर वेदांताचा विश्वास आहे आणि जगात दिसून येणाऱ्या वैचित्र्याचा, विषमतेचा खुलासाही तो करतो.
ईश्वर आपल्याहून फार दूर-भिन्न आहे असे वेदांत कधीही म्हणत नाही, आपले डोळे मिटून आत पहा म्हणजे त्याचे (ईश्वराचे) दर्शन तुम्हाला घडेल.
आता असे पहा की, एखादा धनी एकदा बागेत, दुसऱ्या खेपेस राजवाड्यात, एखाद्या वेळी बंदिखान्यात, तर दुसऱ्यांदा स्नानगृहात गेला किंवा स्वत:च एका मोठ्या ओझ्याखाली दडपला गेला, तर त्याला तुम्ही काय म्हणाल? तो अन्यायी आहे असे तुम्हाला म्हणता येईल काय?
 
 

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: