Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वसुंधरा पटवर्धन यांचे निधन
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:49 AM (IST)
Tags: news

पुणे, दि. 3 (प्रतिनिधी) : जुन्या पिढीतील लेखिका वसुंधरा कृष्णाजी पटवर्धन (वय 93) यांचे वृध्दापकाळाने शुक्रवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या मागे एक मुलगा, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. पटवर्धन यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
वसुंधरा पटवर्धन या पूर्वाश्रमीच्या वसुधा खानविलकर. 18 एप्रिल 1917 रोजी त्यांचा जन्म झाला. इंग्रजी चौथीपर्यंत शिक्षण झाल्यानंतर त्यांचा बडोद्याचे शास्त्री असलेल्या कृष्णाजी पटवर्धन यांच्याशी विवाह झाला.   
"शोध' हा त्यांचा कथासंग्रह 1955 मध्ये प्रकाशित झाला. कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन असे विविध वाङमयप्रकार हाताळणाऱ्या पटवर्धन यांच्या नावावर चाळीसहून अधिक पुस्तके आहेत. त्यांच्या "नेत्रा', "प्रीतीची हाक' या कांदबऱ्या आणि "ऋणानुबंध, "संघर्ष', "भोवरा', "उपासना', "अक्षता', "अदभूत' हे कथासंग्रह प्रसिध्द आहेत. अमेरिका वारीविषयी त्यांनी प्रवासवर्णनपर लेखन केले होते. पटवर्धन यांच्या "मधूची आई' या कथेवर आधारीत "एकटी' चित्रपटाच्या कथेसाठी आणि "हिरकणी' या नाटकासाठी त्यांना राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे. राज्य साहित्य संस्कृती मंडळातर्फे त्यांना 1994 मध्ये गौरववृत्ती प्रदान करण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे ज्योत्स्ना देवधर पुरस्कार "शरदाबू पुरस्कारा'ने  त्यांना 2002 मध्ये गौरविण्यात आले होते. 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: