Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आयसीसीने दोषी खेळाडूंवर कारवाई करावी : सचिन
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:16 AM (IST)
Tags: news
नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : क्रिकेटचा खेळच संकटात टाकणाऱ्या "स्पॉट फिक्सिंग' प्रकरणाची आयसीसीने मुळापासून चौकशी करावी आणि दोषी खेळाडूंवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने केली आहे.
दरम्यान, आपल्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत एकाही भारतीय क्रिकेटपटूला बुकींनी आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचे ऐकिवात नाही, असे त्याने सांगितले.
तो म्हणाला, आयसीसीने स्पॉट फिक्सिंग स्कॅंडलची सखोल चौकशी करुन दोषी आढळणाऱ्या खेळाडूंवर योग्य कारवाई करावी. हे आरोप खरे असतील तर त्यामुळे क्रिकेटची प्रतिमा मलीन होईल.
एका  ब्रिटिश टॅब्लॉईडने मजहर माजिद या बुकीचे स्टिंग ऑपरेशन करुन या स्कॅंडलचा पर्दाफाश केला आहे. या बुकीने पाकचा कर्णधार सलमान बट्ट, मोहम्मद असिफ व मोहम्मद आमेर यांची नावे स्पॉट फिक्सिंगमध्ये घेतल्याने क्रिकेट जगत ढवळून निघाले आहे. या खेळाडूंची स्कॉटलंड यार्ड व आयसीसीच्या अँटी करप्शन युनिटकडून चौकशीही सुरू आहे. सचिन म्हणाला, क्रिकेट जगतातील अनेक खेळाडू आता आपल्याला बुकींनी गाठले होते, असे सांगण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र एकाही भारतीय क्रिकेटपटूशी बुकींनी संपर्क केल्याची घटना आपल्या कारकिर्दीत घडलेली नाही.
माझ्या 21 वर्षांच्या कारकिर्दीत भारतीय खेळाडूला बुकीने गाठल्याचे अजिबात ऐकिवात नाही, असे त्याने स्पष्ट केले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: