पर्यटनवृध्दीसाठी "राजकीय इच्छाशक्ती हवी
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 12:58 AM (IST)
कोल्हापूर वार्तापत्र
राजीव वाबळे
देशातील पर्यटन क्षेत्रात आघाडीवर असलेल्या केसरी टूर्सच्या कार्यकारी संचालिका वीणा पाटील यांनी कोल्हापूर भेटीचेवेळी प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी आणि पर्यटनप्रेमी यांच्या बरोबर मनमोकळेपणाने, दिलखुलास संवाद साधला. मलेशियासारखा महाराष्ट्राच्या आकारमानाचा देश पर्यटन क्षेत्रात मोठी मजल, उंची गाठू शकतो. मात्र भारतामध्ये पर्यटन वृध्दीसाठी मुख्यत्वे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव आहे. तो दूर झाल्यास यंदाच्या पर्यटन वर्षामध्ये आपला देशही भरीव पावले टाकू शकेल, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यंदाचे वर्ष "पर्यटन वर्ष' असल्याची घोषणा मुख्यमंत्री ना. अशोक चव्हाण यांनी केली आहे, ही चांगली बाब आहे. या वर्षामध्ये आगामी केवळ पाच वर्षांचा विचार न करता पुढील पन्नास वर्षांचा पर्यटन विकासाचा आराखडा निश्चित करुन त्यादृष्टीने कृतिशील पावले टाकली पाहिजेत. धरसोड वृत्ती सोडून, निश्चयाचे संकल्प आराखडा परिपूर्तीसाठी झटले पाहिजे. असंख्य पर्यटनस्थळे सध्या उपलब्ध आहेत. पण त्यांचा विकास झालेला नाही. तो प्राधान्याने करुन तेथे पर्यटकांना मूलभूत, पायाभूत सोई, सुविधा पुरवल्या पाहिजेत तरच महाराष्ट्राचा पर्यटनदृष्ट्या विकास साध्य होऊ शकेल असे आग्रही मत प्रख्यात केसरी टूर्सच्या कार्यकारी संचालिका वीणा पाटील यांनी पत्रकार आणि पर्यटनप्रेमींशी संवाद साधताना व्यक्त केले.
मुळात पर्यटन विकासाच्यादृष्टीने आपल्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा मोठा अभाव असल्याने नैसर्गिक, ऐतिहासिक पर्यटन स्थळे मुबलक असूनही त्यांचा विकास होवू शकलेला नाही, ही सूर्य प्रकाशाइतकी स्वच्छ व सत्य गोष्ट आहे. पर्यटकांना स्वच्छ वातावरण, शुध्द पाणी, चांगले रस्ते व स्वच्छता गृहे या पायाभूत सुविधा अत्यावश्यक असतात. पण आपण अद्याप त्या देवू शकलेलो नाही. त्यामुळे, पर्यटनदृष्ट्या राज्याचा विकासच होवू शकलेला नाही. मलेशियासारख्या आकारमानाने महाराष्ट्र राज्याएवढ्या देशाने अवघ्या दहा वर्षामध्ये जागतिक पर्यटनाच्या नकाशावर आपले स्थान निर्माण केले आहे. परिश्रमपूर्वक सर्व बाबींचा विकास घडवून आणल्याने या देशाचे पर्यटनापासून प्रधान उत्पन्न निर्माण झाले. केसरी टूर्ससह अग्रणी पर्यटन संस्था यापूर्वी सिंगापूर, बॅंकॉक, पटाया अशा सहली आयोजित करत होत्या. मात्र आता त्यामध्ये मलेशिया देशाचा समावेश केल्याशिवाय या सहली पूर्ण होऊ शकत नाहीत, पर्यटकांना आकर्षित करू शकत नाहीत, ही
वस्तुस्थिती आहे.
कृतिशील सुधारणा हवी
महाराष्ट्र राज्याएवढा मलेशिया देश वेगाने, चौफेर प्रगती करत पर्यटनदृष्ट्या अढळ स्थान मिळवू शकतो, लाखो पर्यटकांना आकर्षित करु शकतो आणि आपल्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात भर पाडू शकतो ही बाब अचंबित करणारी अशी आहे. निश्चित ध्येय, आराखडा तयार करुन त्याच्या परिपूर्तीचा ध्यास घेतल्यानेच ही गोष्ट साध्य होवू शकलेली आहे. मग आपला भारत आणि महाराष्ट्र राज्य पर्यटनदृष्ट्या पिछाडीवर का? याचा गांभीर्याने, साकल्याने विचार केला पाहिजे आणि त्यादृष्टीने कृतिशील निश्चित आखणी केली पाहिजे.
दरवर्षी भारतामध्ये तीस लाखांवर पर्यटक येथे येतात अशी आकडेवारी सांगितली जाते ती मुळात संशयास्पद आहे. कारण काही जण शिक्षण, उद्योग, व्यापार यांच्या वृध्दीसाठी, काही जण नातेवाईक व मित्र परिवाराच्या भेटीसाठी, काही जण आरोग्य विषयक उपचार व सुधारणांसाठी येत असतात. अशा विविध करणांसाठी भारतामध्ये आलेल्या परदेशी नागरिकांना "पर्यटक' असे कसे म्हणता येईल? भारतासारखा प्रचंड खंडप्राय देश. येथील पर्यटन स्थळांची विपुलता बघता येथे पर्यटकांचे प्रमाण खूपच कमी आहे. छोट्या, छोट्या परदेशांमध्ये पर्यटकांची आकडेवारीची कोट्यवधींची संख्या प्रयत्नपूर्वक गाठलेली आहे आणि पर्यटन व्यवसायात चालना देवून, भरीव प्रगती साधून केवळ पर्यटनाद्वारे प्रधान उत्पन्न मिळवण्यात यश मिळवले आहे. आपला भारत देश पर्यटन स्थळांच्यादृष्टीने सुदैवी आहे. निसर्गाने येथे मुलबक पर्यटनस्थळे दिलेली आहेत. मात्र त्यांची माहिती सर्वदूर अद्यापही झालेली नाही. दुबई, मलेशिया, सिंगापूर, थायलंड, अमेरिका यासारखे अनेक देश पर्यटनदृष्ट्या विकसित होवून आपल्यापेक्षा खूपच पुढे गेले आहेत.
पर्यटनाची प्रसिध्दी
भारतामध्ये येणारा पर्यटक प्रामुख्याने केरळ, राजस्थान, काशी, गोवा यासारख्या मोजक्याच राज्यांमध्ये जातो. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महानगरामध्ये अग्रक्रमाने येतो. पण सरासरी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ थांबत नाही, ही परिस्थिती सुधारण्याची नितांत आवश्यकता आहे. आपला देश पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यासाठी प्रामुख्याने राजकीय इच्छाशक्ती असली पाहिजे. सर्व बाबी एकटे शासन करु शकणार नाही. मात्र त्यांनी स्वारस्य दाखवल्यास या कामासाठी प्रायव्हेट सेक्टरला उद्युक्त करण्यास प्रचंड प्रमाणात वाव आहे. पर्यटकांना मूलभूत सोई सुविधा, फसवणुकीचे प्रकार टाळणे, जनतेचा पर्यटन आणि शासन यंत्रणेवर विश्वास निर्माण होणे तसेच अन्य देशांमध्ये भारताची प्रतिमा चांगली होण्यासाठी विशेष प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे. स्वाईन फ्ल्यू सारख्या साथीच्या रोगाचा जगभर फैलाव झाला पण "भारतातील या साथीच्या रोगाची माहिती देवून भारतात जाणे टाळा' असे संदेश परदेशी संकेतस्थळावर झळकतात तसेच अतिरेकी कारवाया, स्फोट, हल्ले यांचे भारत आगर असल्याचे भासवले जाते. जगात सर्वत्र या कारवायांचा हैदोस सुरु असताना एकट्या भारत देशाबद्दल विकृत अवास्तव, वेडीवाकडी माहिती परदेशी वेबसाईट, ई-मेलसारख्या साधनांद्वारे पर्यटकांच्यापर्यंत पोहोचवून त्यांची दिशाभूल केली जाते. ती रोखण्याची आवश्यकता आहे.
सहलींचे वैविध्य
प्रामाणिकणा, विश्वसनीयता आणि पर्यटकांचा आनंद या त्रिसूत्रीचा जाणीवपूर्वक अवलंब करत देशातील आणि परदेशातील पर्यटकांमध्ये केसरी टूर्सने अग्रस्थान मिळवले. नावीन्यपूर्ण संकल्पना आणि पर्यटनाभिमुख सेवा हे केसरीचे खास वैशिष्ट्य. दि. 8 जून 1984 रोजी, केसरीभाऊ पाटील या शेतकरी आणि शिक्षकाची पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीने फारसे आर्थिक पाठबळ नसताना, केवळ कुटुंबियांच्या मदतीने पर्यटन व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर "केसरी टुर्सची' स्थापना केली. अचूक नियोजन, परिपूर्ण संयोजन आणि व्यावहारिक काटेकोरपणाला "आपलेपणाचा स्पर्श' यांमुळे केसरी टूर्सने सुमारे तीन लाखांहून अधिक पर्यटकांची मने जिंकली. तोच तोच साचेबध्दपणा न ठेवता संतत नवनवीन संकल्पना राबवल्याने प्रतिवर्षी सुमारे चार कोटी रुपयांहून अधिक व्यवसायाचा चढता आलेख केसरीने प्रयत्नपूर्वक गाठला, राखला, टिकवला. सध्या भारतामधील शंभर व परदेशातील एक हजार ठिकाणच्या सहलींचे पर्याय त्यांचेकडे उपलब्ध आहेत. नवोदित तरुण जोडप्यांसाठी "हनिमून टूर' आकर्षण बनली आहे. कुटुंबामधील मुलांसाठी परदेशी ऍम्युझमेंट पार्क्समधील "फंटुश सहली' आणि सिंगापूर सायन्स सेंटर, नासा स्पेस सेंटर अशा ठिकाणच्या "ऍपल पाय टूर्स' चे आयोजन महत्वाचे ठरले आहे. शेतकऱ्यांना पर्यटनाच्या माध्यमातून नवीन संशोधन व कृषी विषयक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी यासाठी केसरीने ऍग्रो टूर्स सुरु केल्या आहेत. चारधाम, कैलास मानसरोवर, अमरनाथ, वैष्णोदेवी, सौराष्ट्र पलिताना, दक्षिण भारत मंदिरे, श्रीकृष्ण चरित्र यात्रा आदी तीर्थक्षेत्रांच्या "मेरी गोल्ड' सहली सर्वांनाच आवडल्या आहेत. आवडत आहेत. आजवर विविध प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी केसरीचा सन्मान झालेला आहे. संस्थापक केसरीभाऊ पाटील यांना बर्ड वर्ल्ड एक्स्प्रेसतर्फे जीवन गौरव पुरस्काराने तर कार्यकारी संचालिका वीणा पाटील यांना फाय फौंडेशन पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. "केसरी' ची सहल गेली नाही अशी जगभरातील एकही जागा नसेल' अशी वीणा पाटील यांची जिद्द, महत्वाकांक्षी व प्रयत्नांची पराकाष्ठा आहे.