हजारमाचीच्या आणखी दोन महिलांना "त्या' लखोबाकडून दीड लाखाचा गंडा
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:43 AM (IST)
कराड, दि. 3 : नोकरी व व्यवसायाचे आमिष दाखवून लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या सांगलीतील लखोबा लोखंडेने हजारमाची, ता. कराड येथील आणखी दोन महिलांकडून सुमारे दीड लाखाची रक्कम घेवून फसवणूक केल्याचे शुक्रवारी उघड झाले आहे.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात रात्री उशिरा दोन फिर्यादी दाखल झाल्या आहेत. दरम्यान त्यास कराड पोलिसांनी ताब्यात घेतले असून सध्या तो पोलीस कोठडीची हवा खात आहे. या बाबतची सविस्तर माहिती अशी, की सांगली, मिरज परिसरात नोकरी व व्यवसायाचे आमिष दाखवून अनेकांना लाखो रुपयांचा गंडा घालणाऱ्या लखोबाने प्रत्येक ठिकाणी आपले बनावट नाव सांगून फसवणूक केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या लखोबाने गेल्या दोन वर्षांपूर्वी विद्यानगर (सैदापूर), ता. कराड येथील युवकास एअर इंडियामध्येनोकरी लावतो, असे सांगून दोन लाख रुपये घेवून पोबारा केला होता. त्यावेळी त्याने दिलीप शंकर साळुंखे असे आपले नाव असल्याचे सांगितले होते. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद झाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बनसोडे यांनी त्यास बुधवारी रात्री अटक केली. त्यास येथील न्यायालयासमोर उभे केले असता दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी हजारमाचीयेथील सौ. सुरेखा संजय पिसाळ यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की संबंधित दिलीप साळुंखे नामक इसमाने तुम्ही नारी वॉशिंग पावडर तयार करण्याचा व्यवसाय सुरु करा. मी तुम्हाला कच्चा माल पुरवितो. तुम्ही त्याचा पक्का माल तयार करुन मालाची पॅकिंग करुन माझ्याकडे द्या. तुमचा माल बाजारपेठेत खपवून तुम्हाला झटपट लक्षाधीश बनवतो, अशी बतावणी मारुन ऑगस्ट 08 महिन्यात 1 लाख रुपयांची रक्कम घेवून आपली फसवणूक केली असल्याची तर सौ. मनीषा श्रीरंग पाटील, रा. हजारमाची, ता. कराड यांनी आपणाकडून अशा प्रकारचा व्यवसाय सुरु करुन देतो, असे सांगून त्याने 50 हजाराची रक्कम घेवून फसवणूक केल्याची फिर्याद दाखल केली आहे. या दोन्ही गुन्ह्याचा तपास सहाय्यक फौजदार बनसोडे करत आहेत.
लखोबाबाबत अधिक माहिती घेतली असता त्याने कराड येथे फसवणूक करताना दिलीप शंकर साळुंखे, रा. सांगली असे नाव, गाव व पत्ता सांगितला होता तर सांगलीमध्ये फसवणूक करताना त्याने आपले नाव अशोक रामचंद्र जोशी असे असल्याचे सांगून लाखो रुपयांची फसवणूक केली होती. त्याला सांगली पोलिसांनी ताब्यात घेवून, गजाआड करुन सखोल चौकशी केली असता त्याचे दीपक शंकर मोरे (वय 46), रा. चांदणी चौक, खराडे कॉलनी, सांगली असे नाव असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. या लखोबाला कराड पोलिसांनी अटक केली असून त्याने आणखी किती लोकांची किती लाख रुपयांची फसवणूक केली हे लवकरच उघडकीस येणार असल्याचे बोलले जात आहे.