Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

गंधर्व युगाचा अस्त!
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 12:57 AM (IST)
Tags: lolak

नूतन गंधर्व विनायकराव उर्फ आप्पासाहेब देशपांडे यांच्या निधनाने अखेरचा गंधर्व काळाच्या पडद्याआड गेल्यामुळे, देशातल्या गंधर्व युगाचा अस्त झाला आहे. वयाची ऐंशी वर्षे उलटल्यावरही त्यांची संगीत आराधना मात्र नियमितपणे सुरुच होती. विद्यार्थी-विद्यार्थिनींना ते संगीताचा रियाझही देत असत. अलीकडे सहा महिने मात्र त्यांची प्रकृती खालावली. वयोमानानुसार गात्रे थकली, तरीही शास्त्रीय संगीताचे सूर त्यांना मोहिनी घालत. वयाच्या आठव्या वर्षापासून त्यांनी सुरु केलेली गानविद्येची उपासना अखेर वयाच्या 86 व्या वर्षी सात तपांनी संपली.
बालगंधर्वांनी देशाच्या शास्त्रीय संगीतात गंधर्व युग सुरु केले. सवाई गंधर्व, छोटा गंधर्व, कुमार गंधर्व आणि नूतन गंधर्व या चौघांनी गंधर्व युगाचा वारसा जपला आणि पुढेही नेला. बालगंधर्व, सवाई गंधर्व आणि छोटा गंधर्व, कुमार गंधर्वांना नावलौकिक आणि सामाजिक प्रतिष्ठा सन्मान मिळाले. पण नूतन गंधर्वांच्या वाट्याला मात्र जीवनभर उपेक्षाच आली.  जयपूर, आग्रा आणि किराणा या तीनही घराण्याची गायकी आत्मसात असलेल्या या गुणी गायकाचे शेवटपर्यंत स्वत:च्या मालकीचे घरही होऊ शकले नाही. राज्य सरकारनेही त्यांना सरकारी कोट्यातून सदनिका दिली नाही. लक्ष्मीने त्यांच्याकडे पाठ फिरवलीच होती. पण आप्पासाहेबांनी त्याची खंत कधीच बाळगली नाही. गान विद्येची उपासना आणि ती शिकवण्यात हा मानी कलावंत रमून गेला. गान रसिकांच्याकडून आपल्याला उदंड प्रतिसाद मिळाला, आयुष्यात जेवढे यश मिळायचे तेवढे मिळाले. रसिकांचे प्रेम हाच आपला खरा सन्मान, असे कृतज्ञतेने आप्पासाहेब सांगत असत. अवघ्या पाचच वर्षांपूर्वी बंगलोर मध्ये झालेल्या शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत आप्पासाहेबांनी तिन्ही घराण्याच्या गायकीची जादूगिरी रसिकांच्यासमोर उलगडून दाखवली आणि हजारो रसिक त्यांच्या या किमयेने थक्क झाले. रसिकांच्याकडून मिळालेली प्रशंसा आणि सन्मान हीच त्यांची अखेरपर्यंत शिदोरी राहिली.
बेळगाव जिल्ह्यातल्या संकेश्वरमध्ये 28 जानेवारी 1925 रोजी जन्मलेल्या आप्पासाहेबांना जन्मजात गोड गळ्याचे लेणे मिळाले होते. बालवयातच ग्रामोफोनवरची शास्त्रीय संगीताची गाणी ऐकून त्यांनी ती जशीच्या तशी आत्मसात केली होती. हुबळीत झालेल्या कॉंग्रेसच्या खादी ग्रामोद्योग प्रदर्शनात आठ वर्षे वयाच्या आप्पासाहेबांनी गायिलेले गाणे ऐकून महात्मा गांधी त्यांच्यावर बेहद खुश झाले. स्वत: कातलेल्या सुताचा हार घालून त्यांनी आप्पासाहेबांचा सत्कार केला होता. 1937 मध्ये पुण्याच्या केसरी मराठा संस्थेत साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी सुवर्ण पदक देवून त्यांचा सन्मान केला होता. 1958 मध्ये संकेश्वरच्या श्री शंकराचार्यांनी त्यांना "नूतन गंधर्व', ही उपाधी देवून गौरव केला आणि ते नूतन गंधर्व झाले.
हलाखीच्या परिस्थितीत आप्पासाहेबांनी संकेश्वरच्या शंकरराव पेंटर यांच्याकडे शास्त्रीय संगीताचे धडे घेतले. नंतर नागेंद्र बुवा पोतदार, निवृत्ती बुवा सरनाईक, आझमबाई संकेश्वरकर, पं. कागलकर बुवा, पं. जगन्नाथ बुवा पुरोहित, पं उमामहेश्वर, कुंदगोेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी तिन्ही घराण्याची गायकी आत्मसात केली. गानसम्राट अल्लादियॉं खॉंसाहेब यांचे चिरंजीव भूर्जीखॉं साहेब यांचे ते गंडाबंध शिष्य होते. कानडी आणि मराठी संतांच्या शेकडो अभंगांच्या गायकीने त्यांनी  लाखो श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले होते. संत वाङमयाचा  त्यांचा व्यासंग मोठा होता. देशातील अनेक संगीत संमेलनेही त्यांनी आपल्या गायकीने गाजवून गान रसिकांची प्रशंसा मिळवली होती.
सलग पंधरा वर्षे संशोधन करुन वेद कालातील शास्त्रीय संगीत या विषयावर संशोधन करुन त्यांनी प्रबंधही लिहिला होता. तो अप्रसिध्दच राहिला आहे.
कोल्हापूर महापालिकेने आप्पासाहेबांचा "कोल्हापूर भूषण', पुरस्काराने गौरवही केला होता. ते सर्वार्थाने कोल्हापूरचे भूषण होतेच. त्यांच्या निधनाने कलापूरच्या शास्त्रीय संगीताच्या वैभवी परंपरेचा वारसा जपणारा "अनमोल हिरा' हरपला आहे.
- वासुदेव कुलकर्णी

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: