दिलीप प्रभुणे यांना इंडियन ऍच्युअर्स ऍवॉर्ड प्रदान
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:28 AM (IST)
वाई, दि. 3 : इंडियन इंटरनॅशनल ऍच्युअर्स समितीतर्फे दिला जाणारा इंडियन ऍच्युअर्स ऍवॉर्ड प्रभुणे मॅनेजमेंट कन्सल्टन्सीचे दिलीप प्रभुणे यांना लालबहादूर शास्त्री फौंडेशनचे अध्यक्ष सुनील शास्त्री यांच्या हस्ते दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.
यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून माजी पोलीस महासंचालक किरण बेदी व केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे माजी संचालक जोगिंदर सिंग उपस्थित होते.
उद्योग व स्वयंरोजगारासाठी दिलेल्या सल्ला सेवेबद्दल दिलीप प्रभुणे यांना हा पुरस्कार देण्यात आला. प्रभुणे यांनी आतापर्यंत प्रभुणे मॅनेजमेंट कन्सल्टन्सीच्या माध्यमातून भारतभर दोन हजारांच्यावर उद्योगांना व्यवसाय निवड, बाजारपेठ पाहणी, व्यवसायाची माहिती, बॅंक व्यवसायातील डॉक्युमेंटेशन आदी प्रकारच्या सेवा दिल्या आहेत. या पैकी साधारण 1400 उद्योग आजमितीस व्यवस्थितपणे सुरु आहेत. तसेच सिध्दी विकास संस्था, इमकॉन-सातारा यांच्या माध्यमातून अंदाजे तीन हजार महिला व नव उद्योजकांना छोट्या व घरगुती उद्योगांचे व्यावसायिक प्रशिक्षण दिले आहे. या प्रशिक्षणार्थींना उद्योजकता विकास, बाजारपेठ पाहणी आदी विषयातील प्रशिक्षण देऊन त्यांचे उद्योग सुरु झाले आहेत. आतापर्यंत यापैकी 2200 च्या आसपास स्वयंरोजगार व छोटे उद्योग सुुरु झाले आहेत. या सर्व सेवांचा विचार व परीक्षण करुन नवी दिल्ली येथील इंडियन ऍच्युअर्स फोरमने दिलीप प्रभुणे यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे.
पुरस्कार निवड समितीत सुनील शास्त्री यांच्यासह कपार्ट, इंडो-जपान बिझनेस टुडे, जपान, ग्लोबल टॅलेन्ट, थायलंड, सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. या समितीमार्फत दरवर्षी विविध क्षेत्रात वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या कार्पोरेट व्यक्ती, टेक्नोक्रॅटस, प्रोफेशनल संस्थांच्या प्रमुखांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन पुरस्कार देण्यात येतो.
सुनील शास्त्री म्हणाले, लालबहादूर शास्त्रींचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून मिळालेल्या या यशातून आणखी उत्तुंग झेप घेण्याचे उद्दिष्ट ठेवावे. यावेळी जोगिंदर सिंग, किरण बेदी यांची भाषणे झाली. पुरस्कार मिळाल्याबद्दल दिलीप प्रभुणे यांचे विविध स्तरातील मान्यवरांनी अभिनंदन केले.