
कोल्हापूर, दि. 3 (प्रतिनिधी): जीवनभर संगीतावर निष्ठा, प्रेम ठेवून, शिष्यांच्या अनेक पिढ्या घडवणारे विनायक कृष्ण तथा नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे यांचे वृध्दापकाळाने वयाच्या 85 व्या वर्षी शुक्रवारी सकाळी 6.30 वाजता दु:खद निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर पंचगंगा मुक्तीधाम स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे चाहते, शिष्य, संगीतप्रेमी यांनी साश्रूनयनांनी त्यांना अखेरचा निरोप दिला.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, दोन विवाहित मुली, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
आप्पासाहेब देशपांडे : तपस्वी गायक, निष्ठावंत संगीतप्रेमी
कोल्हापूर, दि. 3 (प्रतिनिधी) : विनायक कृष्ण तथा आप्पासाहेब देशपांडे यांचा जन्म दि. 28 जानेवारी 1925 रोजी संकेश्वर येथे झाला. वयाच्या सहाव्या वर्षापासून ग्रामोफोनच्या तबकड्या ऐकून त्याप्रमाणे हुबेहूब गायनाच्या साधनेला त्यांनी प्रारंभ केला.
संकेश्वरमधील शंकरराव पेंटर यांचेकडून त्यांना प्राथमिक सुरावटीची ओळख झाली. गुरु उमा महेश्वर कुंदगोळकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. नागेंद्रबुवा पोतदार यांचेकडूनही त्यांनी संगीताचे धडे आत्मसात केले. 1936 साली कर्नाटकातील हुबळी येथे झालेल्या कॉंग्रेसच्या ग्रामोद्योग परिषदेमध्ये राष्ट्रपिता म. गांधी यांनी सुताचा हार व साप्ताहिक अभियानचा अंक भेट देवून त्यांचा सत्कार केला होता व त्यांना आशीर्वाद दिले होते. या दरम्यान, त्यांचे कुमार गंधर्व यांच्यासमवेत हुबळी, धारवाड, बंगलोर परिसरात गायनाचे कार्यक्रम होत होते.
1947 साली मुंबई आकाशवाणी केंद्रावरुन त्यांचा पहिला गायनाचा कार्यक्रम प्रसारित झाला. जुन्या जमान्यातील गायक व्ही. ए. कागलकर यांच्याकडून 4 वर्षे व जगन्नाथबुवा पुरोहित यांच्याकडून 2 वर्षे त्यांनी शिक्षण घेतले. ख्यातनाम गायक गुरु बुर्जी खॉंसाहेब यांची त्यांनी शागिर्दी स्वीकारली. जवळपास 22 वर्षे त्यांनी जयपूर, आग्रा, किराणासह सांगितिक क्षेत्रामधील चार घराण्यांची खासियत आत्मसात केली. नाट्यसंगीत बालगंधर्व यांची गायकी ऐकून ते शिकले. 1956 साली पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रमुख उपस्थितीत नवी दिल्ली येथे गायनाचा कार्यक्रम सादर करुन त्यांनी त्यांची वाहव्वा मिळवली होती. दि. 15/10/1958 रोजी श्रीमद जगदगुरु श्री शंकराचार्य यांनी त्यांचा "नूतन गंधर्व' ही उपाधी बहाल करुन त्यांचा सन्मान केला होता.
निगर्वी, निरपेक्ष, सालस, अजातशत्रू व अत्यंत साधेपणाने वागणारे, नम्र असे नूतन गंधर्व आप्पासाहेब देशपांडे यांचे व्यक्तिमत्त्व होते. देशभरात ठिकठिकाणी त्यांचे गायनाचे कार्यक्रम झाले तसेच गायन, संगीताच्या कार्य-क्रमाच्या सादरीकरणाचे प्रात्यक्षिकांचे कार्यक्रम झाले. गायन, संगीताची आवड असणाऱ्या अनेक शिष्यांना त्यांनी घडवले. जुन्या जमान्यामधील एक तपस्वी गायक, निष्ठावंत संगीतप्रेमी व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड गेले.