Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
तासगावच्या शिवनेरीने फोडली कराडची लाखाची दहीहंडी
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:09 AM (IST)
Tags: news


कराड, दि. 3 : कराडकरांसह तालुक्याचे लक्ष लागून राहिलेली युवा नेते डॉ. अतुल भोसले व ललित राजापुरे मित्रपरिवार यांच्यावतीने आयोजित 1 लाख 11 हजार 111 रुपयांची दहीहंडी रात्री उशिरा तासगावच्या शिवनेरी तरुण मंडळाने 7 थर रचत फोडली तर खास महिलांसाठी असलेली 11 हजार 111 रुपयांची दहीहंडी पार्वती महिला पथकाने फोडली.
पावसाने घेतलेली विश्रांती आणि सार्वजनिक सुट्टीचा माहोल अशा उत्कंठापूर्वक वातावरणा-मध्ये कराडमध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, इस्लाम-पूर आदी शहरातील गोविंदांनी दुपारपासून हजेरी लावली होती. येथील विठ्ठल चौकात ही दहीहंडी आयोजित केली होती. या स्पर्धेच्या प्रारंभावेळी कृष्णा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, ललित राजापुरे, रघुनाथराजे नाईक-निंबाळकर, सागरेश्वर सूतगिरणीचे चेअरमन शांताराम कदम, उपनगराध्यक्ष सुभाषराव डुबल, नगरसेवक राजेंद्रसिंह यादव, सिध्दार्थ थोरवडे, नंदकुमार बटाणे, जयवंत पाटील, विजय वाटेगावकर, मलकापूरचे नगरसेवक दादा शिंगण, सुनीता पाटील, सुभाष माने,  जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे, हणमंतराव पवार, दयानंद पाटील आदींसह विविध पदाधिकारी व मान्यवरांची उपस्थिती होती.
मच गया शोर सारी नगरी रे.... गणपती बाप्पा मोरया.... जय  शिवाजी जय भवानी.... डॉल्बीच्या तालावर नाचत फिल्मीस्टाईल गोविंदांनी रस्त्यावर तुडूंब गर्दी केली होती. कृष्णाच्या अवतारातील बाल गोपाळ, रंगीबेरंगी व भगव्या पट्या डोक्यास बांधलेल्या गोविंदांनी उंची थर देत दहीहंडी फोडण्यासाठी प्रयत्न केले. पाण्याच्या फवाऱ्याचा अनं डॉल्बीच्या तालावर तरुणांनी धमाल उडवून दिली होती. जिल्ह्यात एकमेव लाखाची दहीहंडी असल्याने या स्पर्धेत विजेता कोण होणार, याबाबत कमालीची उत्सुकता होती. सुमारे 35 फूट उंचीवरील दहीहंडी पाहून अनेकांच्या भुवया उंचावत होत्या. बक्षिसाची रक्कमही लाखाच्या घरात असल्याने दहीहंडी फोडण्याचा केलेला प्रयत्न अविस्मरणीय होता. गोविंदांनी  स्वत:चाबचाव करत सात-आठ थरापर्यंत मजल मारली होती. गोविंदांना शारीरिक इजा होऊ नये, यासाठी कृष्णा रुग्णालयातर्फे रुग्णवाहिका व खास डॉक्टरांचे पथक स्पर्धेच्या ठिकाणी तैनात होते. अनेक ठिकाणी विक्रमांचा बादशहा ठरलेल्या तासगावच्या शिवनेरी तरुण मंडळ पथकाने अखेर 8 थर लावत ही दहीहंडी फोडून 1 लाख 11 हजार 111 रुपयांचे रोख बक्षीस पटकावले. 100 ते 125 शिवनेरी तरुण गोविंदानी जोशात मुंबईच्या नावाजलेल्या पथकाला जे जमले नाही, ते यश मिळवत उपस्थितांची मने जिंकली.
मनसेच्यावतीने कमानी मारुती मंदिराजवळ आयोजित महिला राखीव दहीहंडीचा प्रारंभ पोलीस उपअधिक्षक भारत तांगडे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महेश जगताप, सागर देवकर, संदीप शिलवंत व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झाला. महिला गोविंद पथकांनी अत्यंत चांगला प्रतिसाद देत इंडियन स्पोर्टस, स्वामी विवेकानंद स्पोर्टस, पार्वती स्पोर्टस, बी. स्पोर्टस इत्यादी महिला पथकांनी जोरदार प्रयत्न केला. अखेर पार्वती महिला पथकाने महिला राखीव दहीहंडी फोडली.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: