उच्चतंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास केळी शेती फायदेशीर
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:30 AM (IST)
कोरेगाव, दि. 3 ः शेती उद्योगामध्ये केळी पिकांचे महत्व अनन्यसाधारण असून त्यामध्ये उच्चतंत्रज्ञान अवलंबल्यास केळी शेती फायदेशीर होईल, असे प्रतिपादन जिल्हा अधीक्षक
कृषी अधिकारी विकास पाटील यांनी एकसळ येथील केळी लागवडीप्रसंगी केले.
महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्यावतीने राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत केळी क्षेत्रविस्तारामध्ये एकसळ, ता. कोरेगाव येथील दीपक भोसले यांच्या 0.50 हे. क्षेत्रावर लागवड करण्यात आली. विकास पाटील यांच्या हस्ते केळी लागवडीचा शुभारंभ झाला. ग्रॅडनैन (जी-9) या जातीचे वैशिष्ट्ये म्हणजे मातृवृक्षाचे सर्व गुणधर्म रोपांमध्ये जसेच्या तसे आल्यामुळे सर्व रोपांपासून चांगले उत्पन्न मिळते. तसेच ही रोपे जिवाणू व विषाणूमुक्त असतात. खात्रीशीर बाजारपेठ व सततच्या मागणीमुळे केळी पिकाखालील क्षेत्र वाढत असून शेतकऱ्यांनी याचा फायदा घ्यावा, असे पाटील म्हणाले. उपविभागीय कृषी अधिकारी शशिकांत जाधव यांनी केळीतील आंतरपिके व ठिबकसिंचनाबाबत शेतकऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी भोसले यांच्या पडक्षेत्रावर एक व्यक्ती, एक झाड या संकल्पनेनुसार कृष्णराव धुमाळ, विठ्ठल भोसले यांच्या हस्ते आंबा, नारळ रोपांची लागवड करण्यात आली. मंडलाधिकारी आबासाहेब रुपनवर, शशिकांत घाडगे,
मुकुंद म्हेत्रे, ओंबासे, भालके, नेवसे, गावडे, रणदिवे यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपक भोसले, संजय भोसले, बलभीम भोसले यांनी परिश्रम घेतले.