Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

आपला सचिन बनला ग्रुप कॅप्टन
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:15 AM (IST)
Tags: news


नवी दिल्ली, दि. 3 (वृत्तसंस्था) : आपल्या सर्वांचा लाडका मास्टर ब्लास्टर फलंदाज सचिन तेंडुलकर शुक्रवारी भारतीय वायुसेनेचा सन्माननीय ग्रुप कॅप्टन बनला. वायुसेनेचे प्रमुख एअर चीफ मार्शल पी. व्ही. नाईक यांनी नवी दिल्लीत झालेल्या एका शानदार समारंभात सचिनला ही रॅंक बहाल केली.
सचिनला सन्माननीय ग्रुप कॅप्टन ही रॅंक देण्याची घोषणा राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांनी 23 जूनला केली होती.
देशासाठी सर्वोच्च योगदान देणाऱ्या माननीय व्यक्तींना तिन्ही सेनादलांमधील सन्माननीय पदे देण्याची तरतूद आहे. त्यानुसार सचिनला ग्रुप कॅप्टन हे पद देण्यात आले. सचिनला ग्रुप कॅप्टन बनवण्याचा प्रस्ताव भारतीय वायुसेनेने जानेवारीमध्ये राष्ट्रपतींकडे पाठवला होता. ही रॅंक मिळवणारा सचिन हा पहिला खेळाडू असून हवाई क्षेत्रातील कोणतीही पार्श्वभूमी नसताना असा सन्मान मिळवणाराही तो पहिलाच भारतीय आहे.
आता सचिन वायुसेनेचा ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून कार्य करणार आहे. देशातील युवकांना वायुसेनेत भरती होऊन देशसेवा करण्याची प्रेरणा सचिनने द्यावी, ही त्याला हा सन्माननीय रॅंक देण्यामागील वायुसेनेचा उद्देश आहे.
सचिनला सन्मानित करण्यात आल्यानंतर त्याने भारतीय वायुसेनेला सलाम ठोकत या कुटुंबामध्ये सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.
तो म्हणाला, भारतीय वायुसेनेने मला ग्रुप कॅप्टन ही रॅंक दिल्याने माझा गौरव झाला आहे. या शक्तिशाली दलाशी निगडित झाल्याचा एक भारतीय म्हणून मला अभिमान आहे. वायुसेनेचा ब्रॅंड ऍम्बेसिडर म्हणून मी सर्वोत्तम प्रयत्न करेन.
मात्र या रॅंकने सन्मानित केले जाण्यापूर्वी सचिनने भारतीय वायुसेनेची जवळून ओळख करुन घेतली आणि मूलभूत लष्करी कवायतींचा सराव केला होता. आतापर्यंत 21 ख्यातनाम व्यक्तींना भारतीय वायुसेनेत सन्माननीय पदे देण्यात आली आहेत. सर्वप्रथम जवाहरचे महाराज राजे यशवंतराव यांना 1944 साली वायुसेनेत फ्लाईट लेफ्टनंट या रॅंकने सन्मानित करण्यात आले होते. 1974 साली प्रसिध्द उद्योगपती भारतरत्न जे. आर. डी. टाटा यांना सन्माननीय एअर व्हाईस मार्शल हे पद देण्यात आले होते. 1990 साली उद्योगपती विजयपथ सिंघानिया यांना सन्माननीय एअर कमोडोर हे पद देण्यात आले होते. मात्र या सर्वांना हवाई क्षेत्राची पार्श्वभूमी होती.
भारताला 1983 साली एकदिवसीय विश्वचषक मिळवून देणारे माजी कर्णधार कपिलदेव यांना लष्कराने 2008 साली लेफ्टनंट कर्नल ही सन्माननीय पदवी बहाल केली होती.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: