Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकविरुध्द कट कारस्थान नाही : हरुन लॉरगॅट
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:11 AM (IST)
Tags: news

लंडन, दि. 3 (वृत्तसंस्था) : स्पॉट फिक्सिंग प्रकरणी पाकच्या तीन क्रिकेटपटूंना निलंबित करण्यामागे आयसीसीचे कट कारस्थान आहे. त्यामध्ये अध्यक्ष शरद पवारांचा हात आहे, असा आरोप पाकचे लंडनमधील उच्चायुक्त वाजिद हसन यांनी केला असला तरी आयसीसीचे मुख्य कार्यकारी हरुन लॉरगॅट यांनी या आरोपाचा इन्कार केला आहे.
आयसीसीची अकार्यक्षमता लपवण्यासाठी पाकला बळीचा बकरा बनवण्यात येत असून पाकला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून अलग करण्याचे हे कारस्थान आहे, असा आरोप हसन यांनी केला होता. त्याबद्दल आयसीसी व शरद पवार यांच्याविरुध्द कायदेशीर कारवाई करू, अशी धमकीही त्यांनी दिली.
मात्र लॉरगॅट यांनी या आरोपांचा इन्कार केला. ते म्हणाले, हसन यांना भेटून खेळाडूंवर निलंबनाची कारवाई करणार असल्याचा स्पष्ट संकेत मी दिला होता. खेळाडूंवर पूर्ण विचाराअंती आरोप ठेवण्यात आले असून त्यांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचेही त्यांना सांगितले होते. मात्र हसन यांनी या भेटीचा गैरअर्थ काढून विधाने केली आहेत.
दिवंगत हॅन्सी क्रोनिएने केलेल्या भानगडीनंतर जागतिक क्रिकेटमधील ही सर्वात वाईट भानगड आहे. आयसीसी या खेळाडूंवर निर्णायक कारवाई करेल, पण त्यांच्यावरील आरोप सिध्द झाल्यानंतरच, असे त्यांनी स्पष्ट केले. मात्र हे प्रकरण म्हणजे हिमनगाचे फक्त टोक आहे, या पत्रकारांच्या सूचनेचा त्यांनी स्पष्ट शब्दात इन्कार केला. स्पॉट फिक्सिंगने हातपाय पसरले असल्याचे म्हणणेही त्यांनी खोडून काढले. स्पॉट फिक्सिंगची एकच घटना घडली असली तरी त्यातून आम्हाला धडा मिळाला आहे, असे ते म्हणाले.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: