खंडाळ्यात शेतकऱ्यांचा रास्तारोको
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 01:51 AM (IST)
पारगाव, दि. 3 : खंडाळा तालुक्यातील औद्योगिक वसाहतीसाठी स्थानिक भूमि-पुत्रांच्या जमिनीच्या सात-बारावर हस्तांतरण बंदीचे शिक्के मारण्यात आल्याने भू-संपादन होणार आहे. याला विरोध म्हणून संबंधित शेतकऱ्यांनी आज खंडाळा येथील पुणे-बंगलोर महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केले.
मात्र राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी सामिल झाल्याने शिवसेनेचा धसका घेतल्याचे चित्र दिसून आले तर राष्ट्रवादी कॉंग्रेसने हा मोर्चा हायजॅक केल्याचे शेतकऱ्यांमधून बोलले जात होते. दरम्यान महामार्गावरील रास्ता रोको अल्पकालावधीत निवेदन देवून संपविण्यात आला.
खंडाळा तालक्यातील शिवाजीनगर-मावशी मोर्वे-अहिरे आदी गावामधील सुमारे 5 हजार एकर जमीन ओद्योगिक वसाहतीसाठी संपादन केली जाणार असून या शेती जमिनीवर हस्तांतरण बंदीचे शिक्के मारण्यात आले आहेत. ही जमीन संपादित होऊ नये, सात-बारा वरील शिक्के रद्द करावेत. या मागणीसाठी शिवाजीनगर म्हावशी-मोर्वे गावासह निवेदन देऊन महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर आज शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम जाधव व ग्रामस्थांनी या मोर्चाचे आायेजन केले होते. यावेळी या मोर्चामध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे व कॉंग्रेसचे पदाधिकारी सामिल झाले होते. यामध्ये खंडाळा पंचायत समितीचे सभापती विनोद क्षीरसागर, समन्वय समितीचे अध्यक्ष शामराव गाढवे, जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य रमेश धायगुडे, खंडाळा तालुका राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष मनोज पवार, पंचायत समितीचे सदस्य लताताई नरुटे, अनिरुध्द गाढवे, अनुस पवार यासह पदाधिकारी मोर्चामध्ये सहभागी झाले होते.
आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास खंडाळा येथील शिवाजी चौकापासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष शेतकरी या मोर्चामध्ये पदाधिकाऱ्यांसह सहभागी झाले होते. दरम्यान हा मोर्चा शिवाजी चौकामधून पुणे-बंगलोर महामार्गावर आला. यावेळी सर्व पदाधिकारी महामार्गावर रास्ता रोको आंदोलनासाठी बसले. यावेळी शेतकरी बचाव समितीचे अध्यक्ष यांनी नायब तहसीलदार यांचेकडे निवेदन दिले. यावेळी बोलताना ते म्हणाले, की खंडाळा तालुक्यामधील शेतजमीन येणाऱ्या कालव्यामुळे बागायत होत आहे. परंतु शासनाने बागायत जमीन संपादन करण्याचा घाला घातला आहे. या शेतजमिनी संपादन करण्यासाठी शेतकऱ्यांचा विरोध असून जोपर्यंत जमिनीवरील हस्तांतरण बंदी आदेश उठत नाही व सात-बारावरील शिक्के रद्द होत नाहीत तोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच राहील, असे सांगून शिवसेनेचे जिल्हाप्रमुख जाधव यांनी मला बोलायचे आहे, असे सांगितले परंतु सर्व राष्ट्रवादी कॉंग्रेेसच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांना महामार्गावरुन बाजूला काढले व शिवसेनेचे जाधव यांना न बोलताच मार्गस्थ होण्यास भाग पाडले. यामुळे शिवसैनिक व संबंधित शेतकऱ्यांच्या मध्ये संतापाची भावना निर्माण झाली होती तर काही शेतकरी राष्ट्रवादीने मुद्दामहूनच हा मोर्चा हायजॅक केला असे बोलत होते. दरम्यान, मोर्चा शिवाजी चौकामधून येताना पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आला असता मोर्चाचे नेतृत्व करीत असलेल्या पुरुषोत्तम जाधव यांच्यामध्ये व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये व पदाधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. शिवसेनेचे माध्यम न करता मोर्चात सामील व्हावे, असे म्हणत काही मोर्चामधील लोकांनी जाहीर केले. परंतु पुरुषोत्तम जाधव यांनी तालुक्यातील जनतेच्या प्रश्नासाठी माघार घेतली व नियोजित शिवसेनेच्या नेतृत्वाखाली मोर्चा असूनसुध्दा आपल्या गळ्यातील शिवसेनेची पट्टी काढली व झालेला वाद मिटला. यानंतर पोलीस बंदोबस्तामध्ये मोर्चा आंदोलन स्थळी नेण्यात आला होता. या मोर्चामध्ये तालुक्यातील ग्रामस्थ, अबालवृध्द, महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आला होता. मोर्चानंतर प्रतिक्रिया देताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले, की भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांचा आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिल्यामुळे सत्ताधारी नेत्यांच्या पायाखालची भुई सरकली असल्यामुळेच नेत्यांनी सूचना करुन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी या मोर्चामध्ये उतरले होते. सत्ताधारी मंडळांनी यामध्ये भाग घेतला हाच शेतकरी बचाव कृती समितीचा व शिवसेनेचा विजय असून आंदोलन यापुढील काळामध्ये अधिक तीव्र करण्यात येईल.
आ. मकरंद पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, की ज्या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा भूसंपादनाला विरोध आहे त्या शेतकऱ्यांच्या जमिनी वाचविण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न करणार आहे. जमिनी विकण्यास माझा पूर्णपणे विरोध असून त्यांच्यावर अन्याय न होण्यासाठी आपण प्रयत्न करु व शेतकरी हितासाठीच आपण प्रयत्न करु असेही ते म्हणाले. शिवसेनेने शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राजकीय वळण लावले असून ही चुकीची प्रक्रिया असल्याचे त्यांनी सांगितले.