
सौरव गांगुलीचे मत
कोलकाता, दि. 3 (वृत्तसंस्था) : भारताचे युवा क्रिकेटपटू अपेक्षापूर्ती करायला कमी पडत आहेत. त्यामुळे सचिन तेंडुलकरसारख्या बड्या खेळाडूंच्या निवृत्तीनंतरच टीम इंडियाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीपुढे खरे आव्हान उभे राहील, असे मत भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने व्यक्त केले.
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत गांगुली म्हणाला, दोन किंवा तीन वर्षांनंतर सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे रथी-महारथी निवृत्त होण्याची शक्यता आहे. पुढील वर्षी आपण परदेशात पाच कसोटी मालिका खेळणार आहोत. त्यावेळी धोनीच्या नेतृत्वाची आणि त्याच्या खेळाडूंची खरी कसोटी लागेल. त्याचवेळी भारताचा कर्णधार म्हणून त्याचे भवितव्य निश्चित होईल.
धोनी हा एकदिवसीय क्रिकेटमधील खूप परिपक्व फलंदाज आहे. त्यामुळे त्याने 5 किंवा 6 व्या क्रमांकावर खेळण्याऐवजी वरच्या क्रमांकावर फलंदाजी करावी. त्याशिवाय त्याने उगाचच वक्तव्ये करण्याचे टाळून संघाकडून सर्वोत्तम कामगिरी करवून घेण्याकडे लक्ष द्यावे.
ट्वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेतील अपयशाचे खापर धोनीने अतिक्रिकेटवर फोडले होते. त्याबद्दल गांगुली म्हणाला, धोनी हा परिपक्व क्रिकेटपटू व कर्णधार आहे. मात्र काहीवेळा तो बालिश विधाने करतो. क्रिकेटचा अतिरेक होत आहे, असे म्हणणारे खेळाडू खेळू इच्छित नसतील तर त्यांची जागा अन्य खेळाडू घेतील. त्यामुळे बोलण्याऐवजी खेळाडूंनी खेळत रहावे.
भारताची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी चांगली होत आहे; परंतु मर्यादित षटकांच्या क्रिकेटचा प्रश्न येतो तेव्हा युवा खेळाडूंमधील सातत्याच्या अभावामुळे ती गटांगळ्या खाते.
बरीच वर्षे खेळूनही युवराजची कामगिरी वर-खाली होत आहे. वनडे क्रिकेटमध्ये वीरेंद्र सेहवागच्या फलंदाजीतही सातत्याचा अभाव आहे. मात्र रवींद्र जडेजा, युसूफ पठाण, रोहित शर्मा, विराट कोहली असे युवा खेळाडू अपेक्षांच्या कसोटीवर कमी पडत आहेत.
या खेळाडूंना भारतीय क्रिकेटचे भवितव्य म्हणून संबोधले जात आहे. मात्र उच्च पातळीवर कामगिरी करण्यात ते अपयशी ठरत आहेत. ते अजून पुरेसे बहरलेले नाहीत. आपल्याकडे योग्य मिश्रण नसल्याने बरीच पोकळी आहे, असे त्याने चॅम्पियन्स चषक व ट्वेंटी-20 चषक स्पर्धेतील भारताच्या अपयशाबद्दल बोलताना सांगितले.
आपल्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पाकिस्तान, इंग्लंड व वेस्ट इंडिजमध्ये मिळवलेल्या संस्मरणीय विजयांबद्दल बोलताना तो म्हणाला, ती कामगिरी आमच्यासाठी खूप मोलाची आहे. कामगिरी म्हणजे 40 टक्के कर्णधाराचे योगदान आणि 60 टक्के खेळाडूंचे योगदान असते.
निवड समितीने संघाची निवड कामगिरीच्या आधारे करावी, वयाच्या आधारे नव्हे, असेही त्याचे मत आहे. सचिनच्या वयाकडे पाहिले तरी तो तुमचा सर्वोत्तम खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियासाठीही रिकी पॉंटिंग हाच संघाला तारुन नेतो. श्रीलंकेतील मालिका वाचवण्यामधील लक्ष्मणचे योगदानही लक्षात घ्या, असे त्याने सांगितले.