आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांसाठी वाईमध्ये उद्या निवड चाचणी स्पर्धा
ऐक्य समूह
Saturday, September 04, 2010 AT 02:12 AM (IST)
वाई, दि. 3 : राज्य शरीरसौष्ठव असोसिएशनच्यावतीने रविवार, दि. 5 रोजी वाईमध्ये प्रथमच "मिस्टर एशिया' व "मिस्टर युनिव्हर्स' साठी निवड चाचणी स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेची जय्यत तयारी सुरू आहे. सेनादल व रेल्वे संघांसह देशातील 35 राज्यांचे दीडशे निमंत्रित शरीरसौष्ठवपटू स्पर्धेत सहभागी होणार आहेत. या खेळाडूंचे कौशल्य पाहण्याची संधी जिल्ह्यातील क्रीडा रसिकांना मिळणार असल्याची माहिती असोसिएशनचे सरचिटणीस संजय मोरे यांनी दिली.
पावसाची शक्यता लक्षात घेऊन द्रविड हायस्कूलऐवजी न्यू चित्रा टॉकिजमध्ये सायंकाळी सहा वाजता ही स्पर्धा होणार आहे. "मिस्टर एशिया', "ज्युनिअर मिस्टर एशिया' आणि "मिस्टर युनिव्हर्स' या स्पर्धेसाठी प्रत्येकी दहा वजनी गटांमध्ये व तीन "मास्टर्स' वजनी गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे.
दि. 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान बहारिन येथे होणारी "मिस्टर एशिया' आणि 3 ते 8 नोव्हेंबर दरम्यान अझरबैजान येथे होणाऱ्या "मिस्टर युनिव्हर्स' स्पर्धेसाठी या स्पर्धेतून भारतीय संघाची निवड करण्यात येणार आहे.
यावेळी आंतरराष्ट्रीय पंच व राज्य संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असून खेळाडू व पदाधिकाऱ्यांची निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.
सर्व स्पर्धक उद्या, दि. 4 रोजी वाईत येणार असून सकाळी 9 वाजता वजन व उत्तेजक द्रव्य तपासणी करण्यात येणार आहे. या निमित्ताने शरीरसौष्ठव संघटनेच्या कार्यकारी मंडळाची बैठक सकाळी 9.30 वाजता अन्नपूर्णा सभागृहात होणार आहे.
अखिल भारतीय शरीरसौष्ठव संघटनेचे अध्यक्ष रणजितसिंह मोहिते-पाटील व आशियाई शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली होणाऱ्या या स्पर्धेचे निमंत्रक आ. मकरंद पाटील आहेत.
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी तालुका संघटनेचे पदाधिकारी दीपक ओसवाल, अनिल सावंत, नगरसेवक भारत खामकर, दत्तात्रय उर्फ बुवा खरात, बाजीराव मोरे, बाळासाहेब माने, संजय वखारकर, राहुल लकेरी, चरण गायकवाड, शैलेश गोखले, पप्पू हगीर, रुपेश जाधव व कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.