
नीरा, दि. 2 : पुणे जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा भरत असलेली ग्राम-पंचायतीच्या मालकीची इमारत आणि शाळेच्या परिसरातील स्वच्छतागृहाच्या दुरुस्ती व डागडुजीचे लाखो रुपये खर्चाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र सध्या नीरा ग्रामपंचायतीची तिजोरी रिकामी असल्याने लोकवर्गणीतून प्राथमिक शाळा इमारत दुरुस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी नीरा शहरातील प्रतिष्ठित नागरिक, पालक आणि व्यापारी वर्गाने सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन सरपंच राजेश काकडे यांनी केले आहे.
नीरा-शिवतक्रार ग्रामपंचायत मालकीच्या इमारतीत पुणे जिल्हा परिषदेची पहिली ते चौथी पर्यंतची मुलांची व मुलींची अशी स्वतंत्र प्राथमिक शाळेची इमारत आहे. या दोन्ही शाळांमध्ये शेकडो मुले-मुली शिक्षण घेत आहेत. प्राथमिक शाळेच्या इमारतीची आणि शाळेतील स्वच्छतागृहाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पावसाळ्यात अत्यंत कठीण परिस्थितीत लहान मुलांना स्वच्छतागृहाच्या दुर्गंधीच्या साम्राज्यात गेल्या काही वर्षांपासून शिक्षण घ्यावे लागत आहे. प्राथमिक शाळेच्या इमारतीमधील काही वर्गखोल्यांमध्ये पावसाचेे पाणी गळत असून इमारतीमधील भिंतींना अनेक ठिकाणी तडे गेले असल्याचे सरपंच राजेश काकडे यांनी सांगितले.
प्राथमिक शाळेतील स्वच्छतागृहाची अत्यंत दुरवस्था झालेली असून या स्वच्छतागृहाचे काम व्यवस्थित करण्यात आले नसल्याने शाळा परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. दुर्गंधीच्या साम्राज्यात असलेल्या शालेय विद्यार्थ्यांना वर्गात बसून शिक्षण घेणे जिकिरीचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून दुर्गंधीच्या विळख्यात शिक्षण घेणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असल्याचे काकडे यांनी सांगितले.
नीरा ग्रामपंचायतीने शाळा इमारत व स्वच्छतागृहाच्या दुरुस्ती व डागडुजीचे लाखो रुपये खर्चाचे काम हाती घेतले असून त्यासाठी स्व. राजाराम कृष्णाजी ननवरे उर्फ बापू यांच्या स्मरणार्थ ऍड. मुकुंद ननवरे आणि त्यांच्या बंधूंनी एक लाख रुपयांची रोख आर्थिक मदत केली आहे. त्याचबरोबर नीरा शहरातील आणखी दानशूर व्यक्तींनीही याकामी सहकार्य केले आहे. एक लाख तीस हजार रुपयांची लोकवर्गणी गोळा झाली असून आणखी लोकवर्गणीची गरज असल्याने नीरा शहर व परिसरातील शिक्षणप्रेमी नागरिक, उद्योजक, व्यापारी आणि पालक तसेच दानशूर व्यक्ती, संस्था, संघटनांनी सढळ हाताने आर्थिक मदत करावी, असे आवाहन सरपंच काकडे यांनी केले आहे.
ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा कर भरावा
नीरा ग्रामपंचायतीचा दि. 2 ऑक्टोबरपर्यंत 60 टक्के कर वसूल झाला तर शासनाचे एक वर्षासाठी मिळणाऱ्या 10 लाख रुपये अनुदानास नीरा ग्रामपंचायत पात्र होईल. त्यासाठी ग्रामस्थांनी आपला थकीत कर वेळेत ग्रामपंचायतीकडे भरावा. त्यामुळे शासनाच्या मिळणाऱ्या अनुदानातून विकासकामांना चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करुन विकासकामे करण्यासाठी विकास आघाडीतील सर्व ग्रामपंचायत सदस्यांचे सहकार्य मिळत आहे. प्राथमिक शाळा सुधारण्यासाठी नीरेतील बुवासाहेब तरुण मंडळाने 50 हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली असल्याचेही सरपंच राजेश काकडे यांनी सांगितले.
प्राथमिक शाळा इमारतीची दुरवस्था
नीरेतील प्राथमिक शाळा इमारतीच्या छतामधून गळती होत असून कार्यालयातील राष्ट्रपुरुषांचे फोटो भिजतात तर काही वर्गखोल्यां-मध्ये घुशींचा वावर असल्याने फरशा उखडून वर्गात खड्डे निर्माण झाले आहेत. इमारतीच्या बऱ्याच भागातील भिंतींना तडे गेले आहेत. शाळा इमारतीच्या भाड्यापोटी पुणे जिल्हा परिषदेकडून ग्रामपंचायतीला भाडे मिळत असले तरी दुरवस्थेतील शाळा इमारतीची तातडीने दुरुस्ती करणे गरजेचे असल्याचे काकडे यांनी सांगितले.