स्कॅंडलनंतरही चांगले नेतृत्व करणार : आफ्रिदी
ऐक्य समूह
Friday, September 03, 2010 AT 01:05 AM (IST)
लंडन, दि. 2 (वृत्तसंस्था) : "स्पॉट फिक्सिंग'चे स्कॅंडल उघड झाल्याने पाक संघ कठीण परिस्थितीतून जात असला तरी हे स्कॅंडल बाजूला ठेवून संघाचे नेतृत्व चांगल्या पध्दतीने करण्याचा विश्वास पाकच्या वनडे संघाचा कर्णधार शाहिद आफ्रिदीने व्यक्त केला.
तो म्हणाला, काही खेळाडूंवर स्पॉट फिक्सिंगचा आरोप झाल्याने संघ कठीण परिस्थितीतून जात आहे. त्यात संशय नाही. त्यामुळे आम्हाला दु:ख झाले आहे. मात्र हा वाद लवकरच संपुष्टात येईल.
सलमान, असिफ व आमेर हे आमचे महत्त्वाचे खेळाडू आहेत. इंग्लंडचा संघ बलाढ्य असल्याने त्यांना सामोरे जाणे ही आधीच अवघड कामगिरी होती. मात्र आता आम्हाला या तिघांशिवाय खेळावे लागणार असल्याने परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. मात्र आमचे खेळाडू लढवय्ये आहेत. गेले काही दिवस ते प्रचंड दडपणाखाली आहेत. मात्र आम्ही वेगाने संघटित होत असून प्रतिकुल परिस्थितीतही चमकदार खेळ करण्याचे आमचे ध्येय आहे. वनडे मालिकेवर संपूर्ण लक्ष केंद्रीत करण्याचे पहिले काम करावे लागेल. आम्ही ते करत असून या मालिकेसाठी सज्ज असल्याचा विश्वास खेळाडूंना आहे. संघ आणि क्रिकेट योग्य स्थानी आणण्याचे आमचे ध्येय आहे.
चांगले क्रिकेट खेळून ते आम्ही साध्य करू शकतो. देशवासियांसाठी, सामने पाहण्यासाठी येणाऱ्या लोकांसाठी आणि संघासाठी चांगले क्रिकेट खेळले पाहिजे, असे त्याने सांगितले. वनडे मालिकेत पाकला चाहत्यांच्या रोषाला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. मात्र या चाहत्यांना चांगले काही देण्याची क्षमता पाक संघात असल्याचा आफ्रिदीचा विश्वास आहे.