Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महावितरणच्या बारामती परिमंडलात वडूज विभाग प्रथम
ऐक्य समूह
Friday, September 03, 2010 AT 01:24 AM (IST)
Tags: news
मांडवे, दि. 2 ः महावितरणच्या वडूज विभागाने 2009-2010 या आर्थिक वर्षात सर्वच क्षेत्रात उत्कृष्ट काम करुन बारामती परिमंडलात प्रथम क्रमांक पटकावला. प्रलंबित शेतीपंप, वीज कनेक्शन देणे, वीज वितरण हानी कमी करणे, वीजबील वसुली वाढवणे, प्रलंबित वीज कनेक्शनचा अनुशेष त्वरित भरून काढणे इ. निकषांवर सर्वच पातळींवर उत्कृष्ट काम करणाऱ्या विभागास पुरस्कार देण्यात आला.
महावितरणच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. रोख रुपये 10 हजार, मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
वडूज विभागाने 2009-10 या आर्थिक वर्षात सर्व पातळींवर उच्चांकी कामे केली आहेत. त्यामध्ये शेतीपंपासाठी 10 ते 12 वर्षांपासून डिपॉझीट भरून प्रलंबित असलेल्या 31 मार्च अखेरच्या खटाव व माण तालुक्यातील 3506 शेतीपंपांना वीज पुरवठा 31 मार्चपूर्वी करण्यात आला आहे. कृषीपंपांना वीज पुरवठा करण्यासाठी व वीज ग्राहकांना पुरेशा दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी 511 नवीन रोहित्र (ट्रॉन्सफॉर्मर्स) कार्यान्वित करण्यात आले आहेत.
गावठाण फीडर सेपरेशन योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या एकूण 36 फीडरपैकी 24 फीडर कार्यान्वित करण्यात आले असून त्यामुळे पाणीपुरवठा योजना व वीज ग्राहकांना जादा वेळ उपलब्ध झाल्याने भारनियमनापासून दिलासा मिळाला आहे. उर्वरित 12 फीडरपैकी 5 फिडरची कामे पूर्ण झाली असून 7 फिडरची कामे सुरू आहेत. जिल्हा नियोजन विकास योजनेतून (डीपीडीसी) 109 वाड्या-वस्त्या, 258 स्ट्रीट लाईट, 3 जादा  ट्रान्सफॉर्मर्स, 6 नळपाणी पुरवठा योजनांना वीज पुरवठा करण्यात आला आहे. तसेच प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांना 24 तास वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी 2 एक्सप्रेस फीडरची कामे केली असून त्यासाठी रुपये 1 कोटी 37 लाख एवढा निधी खर्च करण्यात आला. राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेंतर्गत खटाव-माण तालुक्यातील अनुक्रमे 1365 व 3236 दारिद्रयरेषेखालील कुटुंबांच्या घरांना वीजपुरवठा करण्याचे उद्दीष्ट असून मार्च 2010 अखेर खटाव व माण तालुक्यातील अनुक्रमे 1221 व 1656 घरांना वीज पुरवठा करण्यात आला आहे.  पायाभूत आराखडा योजनेमध्ये माण-खटाव तालुक्यांत अनुक्रमे 26.51 कोटी व 31.74 कोटी एवढ्या रकमेची कामे मंजूर असून त्यामध्ये गोंदवले, औंध, पुसेगाव, पुसेसावळी येथे नवीन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. आंधळी, शेनवडी, म्हसवड व वडजल या उपकेंद्रांची क्षमता वाढवण्यात येणार आहे. वडूज उपकेंद्रामध्ये 5 एमव्हीए क्षमतेचे दोन नवीन ट्रॉन्सफॉर्मर्स कार्यान्वित केले आहेत. तसेच वीज ग्राहकांना अखंडित व योग्य दाबाने वीज पुरवठा मिळण्यासाठी 494 नवीन रोहित्र (ट्रान्सफॉर्मर्स) उभारण्यात येणार आहेत. बारामती परिमंडलाचे मुख्य अभियंता वामनराव जगताप, सातारा मंडलाचे अधीक्षक अभियंता गोरख चव्हाण यांच्या मार्गदर्शनामुळे, खटाव-माण तालुक्यांतील लोकप्रतिनिधी, वीजग्राहक यांच्या सहकार्यामुळे व वडूज विभागातील अभियंते, कर्मचाऱ्यांच्या परिश्रमामुळे प्रथम पुरस्कार प्राप्त झाला असल्याचे वडूज विभागाचे कार्यकारी अभियंता  आनंदराव शिंदे यांनी सांगितले.
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: