
वॉशिंग्टन, दि. 2 (वृत्तसंस्था) : पाकिस्तानव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान क्षेत्रात चिनी ड्रॅगनने पाकिस्तानच्या संमतीने हात-पाय पसरले असून तेथे चिनी सैनिकांनी पक्के रस्ते बांधण्याचे आणि मोठ्या प्रमाणावर विविध बांधकामे सुरू केली आहेत. चिनी सैनिकांच्या या कृतीमुळे भारताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरवरील भारताचा हक्क त्यामुळे कमजोर होवू शकतो. या पार्श्वभूमीवर अमेरिकेच्या एका प्रतिष्ठित विशेष तज्ज्ञाने ओबामा प्रशासन आणि भारताने हातात हात मिळवून या घुसखोर चिनी ड्रॅगनला वेळीच आवर घातला पाहिजे असे म्हटले आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये आमचे सैनिक नाहीत,
अशी तबकडी चीन सातत्याने वाजवित असला तरी यासंदर्भात पाकिस्तान आणि चीन खोटे बोलत आहे. पाकिस्तानव्याप्तकाश्मीरमध्ये हजारो सैनिक नवनिर्माणाच्या कामात गुंतले आहेत आणि आपल्याकडील लष्करी रसद या क्षेत्रात अत्यंत कमी वेळेत कशी दाखल होईल, अशी उभारणी करत आहेत. गिलगिट -बाल्टिस्तान क्षेत्रात चिनी ड्रेगनचे अकरा हजार सैनिक कार्यरत आहेत, अशी पॅंटॉगॉनकडे ठाम माहिती आहे.