गणेशोत्सव एकात्मतेच्या भावनेतून साजरा करावा
ऐक्य समूह
Friday, September 03, 2010 AT 01:23 AM (IST)
कराड, दि. 2 : राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेतूनच सार्वजनिक गणशोत्सव साजरा करुन समाजामध्ये शांततेचे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. मात्र आज गणशोत्सवादरम्यान शांततेला तडा जात असून या उत्सवाला गालबोट लागत असल्याची खंत जिल्हाधिकारी संभाजीराव कडू-पाटील यांनी व्यक्त केली.
येथील स्व. वेणूताई चव्हाण स्मारक सदनात गणेशोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा पोलीस प्रमुख विठ्ठल जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी भरत तगडे, प्रांताधिकारी डॉ. सौ. स्वाती देशमुख, माजी खा. श्रीनिवास पाटील, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पाटील, तहसीलदार सुनील जोशी, गटविकास अधिकारी अनिल सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
कडू-पाटील म्हणाले, राष्ट्रीय भावना व एकात्मतेच्या भावनेतून सार्वजनिक गणेशोत्सव हा शांततेच्या दृष्टीने साजरा झाला पाहिजे. हे काम सर्वसामान्य जनतेचे असून या मंगलदायी उत्सवास प्रशासनाची साथ आहे. उत्सवाच्यादृष्टीने नोंदणी कक्ष स्थापण्यात येवून गणेश मंडळाच्या अडचणी सोडविल्या जातील. तसेच शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याबाबत प्रशासन कार्यरत राहील.
विठ्ठल जाधव म्हणाले, शांतताप्रिय नागरिक असल्याने हा उत्सव चांगल्या पद्धतीने साजरा होवून जिल्ह्याची आदर्श परंपरा जोपासली जाईल. प्रशासनाने कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने सर्वांगीण तयारी केली असून वेळप्रसंगी त्यादृष्टीने कार्यवाही केली जाईल. जिल्ह्यात प्रमुख ठिकाणी घातपात विरोधी पथक व बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
आनंदराव पाटील म्हणाले, कराड शहराची संवेदनशील शहर म्हणून असलेली ओळख आता दूर होत आहे. शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यास सर्व गणेश मंडळे सहकार्य करतील.
श्रीनिवास पाटील म्हणाले, गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक ऐक्य व राष्ट्रीय एकात्मता वाढीस लागणे गरजेचे आहे. उत्सवादरम्यान गणेश मंडळांनी विविध सामाजिक उपक्रम राबवावेत. उद्योगपती गुणवंतराव जाधव यांनी मंडळाच्या परवानगीसंबंधी एकत्रित पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगून गणेश मंडळांना शांततेत मिरवणुकीची शहराची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन केले. मराठा महासंघाचे अध्यक्ष बाळासाहेब पवार यांनी गणेशोत्सव काळात महिलांची छेडछाड करणाऱ्यांच्या विरोधात पथक निर्माण करण्याची मागणी केली. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संजय मोहिते, मनसेचे ऍड. विकास पवार, फारुक पटवेकर यांनी मनोगत व्यक्त करताना मौलिक सूचना केल्या. ऍड. संभाजीराव मोहिते यांनी गणेश मंडळांना पर्यावरणाचा संदेश सर्वत्र पोहचवण्याचे आवाहन केले. मुख्याधिकारी के. एन. कुंभार, राज्य वीज मंडळाचे कार्यकारी अभियंता ए. पी. यादव यांनी अनेकविध सूचनांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. उपविभागीय पोलीस अधिकारी भारत तगडे यांनी स्वागत केले. तहसीलदार सुनील जोशी यांनी प्रास्ताविकात "विनापोलीस मिरवणूक' ही संकल्पना गतवर्षी राबवून या नगरीने आदर्श घालून दिला. यावर्षीही ही संकल्पना राबवण्यात येईल, असे सांगितले.
रत्नाकर शानभाग यांनी सूत्रसंचलन केले. शहर पोलीस प्रमुख मुरलीधर मुळूक यांनी आभार मानले. यावेळी कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बरकत मुजावर, विविध खात्याचे अधिकारी, गणेश मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा परवाना कराडातच मिळणार
गणेश उत्सव मंडळांकडे सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचा कायमस्वरुपी अथवा तात्पुरता परवाना आवश्यक असतो. हा परवाना मिळवण्यासाठी सातारा येथे सहाय्यक धर्मादाय आयुक्त कार्यालयात जावे लागते. कराड शहरासह तालुक्यातील गणेश मंडळांना तात्पुरते परवाने मिळण्याची सुविधा कराड नगरपालिकेमध्ये दि. 6 व 7 सप्टेंबरला उपलब्ध करण्यात आली आहे. या सुविधेचा लाभ घेवून गणेश मंडळांनी परवाने काढावेत, असे आवाहन कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुरलीधर मुळूक यांनी केले आहे.