Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

मॅच फिक्सरवर आजन्म बंदी घाला : शेन वॉर्न
ऐक्य समूह
Thursday, September 02, 2010 AT 11:08 PM (IST)
Tags: news


मेलबर्न, 2 (वृत्तसंस्था) : ऑस्ट्रेलियाचा माजी लेगस्पिनर शेन वॉर्न व इंग्लंडचे माजी प्रशिक्षक डंकन फ्लेचर यांनी स्पॉट फिक्सिंगप्रकरणी सलमान बट्ट, मोहम्मद असिफ व मोहम्मद आमेर हे दोषी आढळल्यास यांच्यावर आजन्म बंदी घालण्याची मागणी केली आहे.
1994 साली बुकीला माहिती दिल्याबद्दल दंडाची शिक्षा झालेला वॉर्न म्हणाला,हे खरे असेल आणि हे तिघे स्पॉट फिक्सिंग, सामना गमावणे व नोबॉल टाकणे यामध्ये दोषी आढळले तर त्यांना बाहेर फेकलेले चांगले. इतकी ही साधी गोष्ट आहे. मला वाटते याशिवाय दुसरा योग्य मार्ग नाही. या प्रकरणात कोणाचाही सहभाग आढळला तरी त्याला सोडता कामा नये. त्याच्यावर आजन्म बंदी घालावी.
ऑस्ट्रेलिया-पाक यांच्यात झालेल्या सिडनी कसोटीत समालोचकाची भूमिका बजावलेल्या वॉर्नला ती कसोटीही निश्चित केल्याचा संशय आहे. ऑस्ट्रेलियाने 36 धावांनी आश्चर्यकारकरित्या विजय मिळवलेली ती कसोटी "फिक्स' असल्याचे स्पष्ट झाल्यास आपल्याला अजिबात नवल वाटणार नाही, असे तो म्हणाला. आता तरी त्याबद्दल केवळ आरोप होत आहेत. ते दोषी आढळत नाहीत तोपर्यंत मी त्यांना निष्पाप समजतो. पण त्या कसोटीकडे पाहिल्यास ती "फिक्स' असल्याचे वाटते. त्यामध्ये संघाची नेतृत्वाची पध्दत, त्यांचे डावपेच या गोष्टींकडे पाहिल्यास ते सत्य असावे असे वाटते, असे तो म्हणाला.
फ्लेचर म्हणाले, पाकिस्तानी खेळाडूंवर यापूर्वी झालेले आरोप सिध्द झाले नव्हते. मात्र हे आरोप खरे असतील तर पाकिस्तानी खेळाडूंना खेळाबद्दल व इंग्लिश क्रिकेटबद्दल आदर नाही, असे खेदाने म्हणावे लागेल.
पाक क्रिकेटच्या पडत्या काळात इंग्लंडने त्यांना नेहमीच सहकार्य केले आहे. पाक क्रिकेटसमोर असलेल्या प्रचंड समस्या आणि ते मायदेशात क्रिकेट मालिका आयोजित करू शकत नाहीत, हे इंग्लंडने समजून घेतले व त्याप्रमाणे मदत केली. मात्र अशा आरोपांमुळे इंग्लंडच्या क्रिकेटचा त्यांनी अपमान केला आहे. क्रिकेटचा अनादर करणे ही साधी बाब नाही. संपूर्ण सामना निश्चित करणारे खेळाडू व मुद्दाम नोबॉल टाकणारे खेळाडू यामध्ये फरक करता कामा नये. त्यामुळे स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळणाऱ्या खेळाडूंना दयामाया न दाखवता त्यांच्यावर बंदीच घालावी.
फोटो गॅलरी

© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: