
नवी दिल्ली, दि. 2 (वृत्तसंस्था) : मॅच फिक्सिंगच्या आरोपांमुळे बीसीसीआयने आजन्म बंदी लादलेला भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीनने पाक खेळाडूंवर झालेल्या "स्पॉट फिक्सिंग'च्या आरोपांमुळे उठलेल्या गदारोळात नाक खुपसले आहे. पाक खेळाडूंवर हे आरोप अजून सिध्द झालेले नाहीत. त्यामुळे त्यांना दोषी धरता येणार नाही, असे मत त्याने व्यक्त केले.
तो म्हणाला, सध्या हे प्रकरण फक्त आरोपांच्या टप्प्यात आहे. या प्रकरणाचा तपास सुरू असून पाक खेळाडूंविरुध्द अजून काहीही सिध्द झालेले नाही. कोणीही कोणाविरुध्द काहीही बोलू शकतो. मात्र त्यातील तथ्य शोधण्यासाठी वेळ लागेल. हे खेळाडू दोषी आढळल्यास त्यांच्यावर आजन्म बंदी घालावी का? असे विचारले असता याबाबतचा निर्णय पीसीबी व आयसीसीने घ्यायचा आहे, असे तो म्हणाला. मात्र या फिक्सिंग प्रकरणात पाक खेळाडूंना एकटे गाठणे अन्यायकारक असल्याचे मत त्याने व्यक्त केले. फक्त पाक खेळाडूंबाबत अन्यायकारक भूमिका नको. आता अनेक खेळाडू पुढे येऊन त्यांना बुकींनी गाठल्याचे सांगत आहेत. हे योग्य नाही, कारण त्यांनी त्यावेळीच पुढे येऊन ते सांगायला हवे होते आणि कारवाई व्हायला हवी होती, असेही तो म्हणाला.