Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  स्तंभ लेख  >>  बातम्या

खेळाची ऐशी तैशी
ऐक्य समूह
Thursday, September 02, 2010 AT 10:45 PM (IST)
Tags: stambha lekh

 क्रिकेटमधील सर्वात मोठा भ्रष्टाचार ठरेल एवढे मोठे मॅच फिक्सिंगचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर सच्चा क्रिकेटप्रेमीही या खेळापासून दूर जाईल. समोर आलेली माहिती किरकोळ वाटावी एवढी माहिती रोज बाहेर येत आहे. पैशासाठी काही खेळाडू देश आणि खेळाची विक्री करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. खेळ वाचवायचा असेल तर स्वार्थाने लडबडलेली ही पिल्लावळ वेळीच ठेचून काढायला हवी.
पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंनी इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्‌स येथे झालेल्या कसोटी सामन्यात मजहर माजिद या पाकिस्तानी सट्टेबाजाकडून मोठी रक्कम घेऊन स्पॉट फिक्सिंग केले हे उघडकीस आल्यावर संपूर्ण क्रिकेट जगतात खळबळ उडाली. ही कसोटी पाकिस्तान मोठ्या फरकाने हरल्यामुळे पाकिस्तानी चाहते आधीच नाराज होते. त्यात मॅच फिक्सिंग उघडकीस आल्यावर त्यांच्या संतापाचा उद्रेक झाला. पाकिस्तानचे माजी कर्णधार इम्रान खान, रमीझ राजा आणि जावेद मियॉंदाद यांनी या घटनेबाबत तीव्र संताप व्यक्त करताना क्रिकेटपटूंवरील आरोप सिद्ध झाल्यास त्यांच्यावर आयुष्यभराची बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली. इंग्लंडमधील क्रिकेटप्रेमींनी तर पाकिस्तान क्रिकेटवरच आंतरराष्ट्रीय बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली.  यावरून वातावरण किती तापले आहे याची कल्पना यावी.
मॅच फिक्सिंगचे हे प्रकरण केवळ या कसोटीपुरते किंवा या मालिकेपुरतेच मर्यादित नाही. स्कॉटलंड यार्डने यासंदर्भात अटक करून पुन्हा जामिनावर सोडलेल्या मजहर माजिदने बरीच माहिती उघड केली आहे. पाकिस्तानी क्रिकेटपटू आपल्या शब्दाबाहेर नसून गेली तीन वर्षे ते पैसे घेऊन मॅच फिक्सिंग करत आहेत असे त्याने स्कॉटलंड यार्ड पोलिसांना दिलेल्या जबानीत सांगितले. गेल्या तीन वर्षांमध्ये पाकिस्तानी संघाने एकूण 82 आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामने खेळले असून या सर्वच सामन्यांवर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) भ्रष्टाचारविरोधी पथकाचे बारीक लक्ष आहे. या प्रत्येक सामन्याचा सूक्ष्म अभ्यास करून त्यात मॅच फिक्सिंग झाले असावे काय, हे आता शोधले जाणार आहे. गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या मालिकेतही मॅच फिक्सिंग झाल्याचे माजिदने सांगितले आहे. त्यावेळी सिडनी येथे झालेल्या कसोटी सामन्यात पाकिस्तानने ऑस्ट्रेलियावर वर्चस्व राखले होते; परंतु शेवटच्या सत्रात अतिशय खराब कामगिरी केल्याने पाकिस्तानचा पराभव झाला होता. तसेच वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या ट्‌वेंटी-20 विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकले होते. त्यावेळीही पाकिस्तानने सामन्यावर वर्चस्व मिळवल्यानंतर अचानक हाराकिरी केली आणि तो सामना स्वत:हून ऑस्ट्रेलियाच्या खिशात घातला. यावरून पाकिस्तानी क्रिकेटपटू पैशासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात हे स्पष्ट होते.
लाचेची रक्कम सापडली
दरम्यान, माजिदची चौकशी करतानाच स्कॉटलंड यार्ड पोलिसांनी काही पाकिस्तानी क्रिकेटपटू आणि संघव्यवस्थापक यांचीही चौकशी केली. मॅच फिक्सिंगचा आरोप असलेल्या क्रिकेटपटूंच्या हॉटेल रूममध्ये पोलिसांना मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम आढळली. कोणताही क्रिकेट संघ आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर असताना त्यांना भत्ता म्हणून ठराविक रक्कम दिली जाते. पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या रूममध्ये या रकमेच्या तुलनेत बरीच मोठी रक्कम सापडल्याने पोलिसांनी ती ताब्यात घेतली. पोलिसांना गरज भासल्यास पाकिस्तानी क्रिकेटपटूंना अटक होऊ शकते अशा परिस्थितीत पाकिस्तानचा उर्वरित इंग्लंड दौरा धोक्यात येऊ शकतो. यात पाकिस्तानी क्रिकेटपटू दोषी असल्याचे सिद्ध झाल्यास इंग्लंडमधील कायद्यानुसार त्यांना 10 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. हे प्रकरण उघडकीस येऊनही कर्णधार सलमान बट्ट कर्णधारपदाचा राजीनामा देण्यास तयार नाही हे विशेष.
पाकिस्तान क्रिकेटला आधीच लागलेल्या आगीत मोहम्मद आसिफची पूर्वीची प्रेयसी वीणा मलिक हिने तेल ओतले. वीणा मलिक ही पाकिस्तानी अभिनेत्री असून तिने आसिफ आधीपासूनच बुकीजच्या संपर्कात होता आणि त्याने अनेक वेळा स्पॉट फिक्सिंग केले असल्याचे सांगितले. धीरज दीक्षित या भारतीय बुकीशी आसिफचे चांगले संबंध होते आणि त्याच्याकडून आसिफला बरीच रक्कम मिळाल्याचेही तिने सांगितले. मध्यंतरी अमली पदार्थांच्या सेवनामुळे आसिफवर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली होती. त्या वेळी ही बंदी कमी करण्यासाठी आसिफने एका व्यक्तीला 30 लाख डॉलर्स दिले. ही रक्कम त्याने वीणा मलिककडून उधार घेतली आणि तिला परत केली नाही. त्यामुळे त्यांचे संबंध बिघडले. त्यापूर्वी स्पॉट किंवा मॅच फिक्सिंग करू नये असे तिने आसिफला वारंवार समजावले
होते; परंतु विनासायास भरपूर पैसा
मिळत असल्याने त्याने तिचा सल्ला धुडकावला होता.
पाकिस्तानी क्रिकेट बोर्डही लाचखोर
या सर्व प्रकरणात पाकिस्तानी क्रिकेटपटूंबरोबरच क्रिकेट बोर्डाकडेही संशयाची सुई वळते. अर्थात, मॅच फिक्सिंगमध्ये क्रिकेट बोर्डातील अधिकाऱ्यांचा थेट संबंध नसेलही पण  त्यांच्यात खेळाडूंवर कडक कारवाई करण्याची धमक नसल्याचे बोलले जाते. त्यामुळेच पाकिस्तानमध्ये खेळाडूंचे बेशिस्त वर्तन खपवून घेतले जाते. मॅच फिक्सिंगचा हा प्रकार एकूणच उद्वेगजनक असल्याने पाकिस्तानवर बंदी घालावी असे काहींचे म्हणणे असले तरी असे केल्याने चांगल्या खेळाडूंवर अन्याय होईल असे पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंचे म्हणणे आहे. भारतीय उपखंडात तरी क्रिकेट हा श्रीमंत खेळ झाला आहे. या खेळाचे तिकीट दर, बक्षिसे आणि प्रायोजकत्वाचे शुल्क वाढले आहे पण, त्याचबरोबर मॅच फिक्सिंगचे दरही वाढले आहेत.तीन नो बॉल टाकायला एवढे पैसे मिळत असतील आणि त्यातून अनेकांचा लाखोंचा फायदा होत असेल तर असे पैशाला हपापलेले खेळाडू पैसा आणि देश या पेक्षा एजंटांवरच जास्त प्रेम करतील यात काय शंका ?
पैशाचा प्रचंड हव्यास
माजिदने पाकिस्तानी खेळाडू अशा जाळ्यात का अडकतात, याचे कारण सांगताना पैसा, चैन आणि बायका यांच्यासाठी किती हपापलेले असतात हे सांगितले. काही खेळाडू तर  देशापेक्षा एजंट आणि बुकीसाठीच सतत काम करत असतात असे त्याने सांगितले. या घटनेने पाकिस्तानी क्रिकेटच्या भवितव्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. गेल्या काही वर्षात पाकिस्तान क्रिकेट संघाची वासलात लागली आहे. आता तर एका संघातले तब्बल सात खेळाडू आणि स्वत: कर्णधार संशयाच्या जाळ्यात सापडला आहे.
मॅच फिक्सिंग किंवा स्पॉट फिक्सिंग हा प्रकार मुळात सुरू होतो तो या खेळात शिरलेल्या सट्टेबाजीमुळे. हा खेळ आहे आणि तो खेळ म्हणूनच झाला पाहिजे पण तसे होत नाही कारण लोक या सामन्यात कोण जिंकेल आणि कोण हरेल, यावर पैजा लावायला लागतात. आजकाल क्रिकेटपटूंना भरपूर पैसे मिळायला लागले आहेत पण त्यापेक्षा अशा प्रकारच्या सट्ट्यावर जास्त पैसा लावला जायला लागला आहे. सट्टा म्हटल्यावर एखाद्या सामन्याच्या एखाद्या निर्णयावर दबाव येणे साहजिक होते. रतन खत्रीच्या मटक्यात असे होते. एखाद्या दिवशी एखाद्या आकड्यावर दबाव आला की,  तो आकडा काढणे परवडत नाही आणि शेवटी मटकाकिंगला नंबर फिरवावा लागतो. क्रिकेटच्या सामन्यात असा प्रकार घडायला लागला की क्रिकेट हा निव्वळ जुगार होतो आणि पैसे गुंतवणाऱ्या सटोडियांना दबाव वाढताच त्यापासून स्वत:चा बचावही करता येत नाही. त्यासाठी मॅच फिक्स करावी लागते. हे दुष्टचक्र थांबवणे खेळाडूंच्याच हातात आहे. त्यासाठी त्यांनी खेळाशी आणि स्वत:शी प्रामाणिक राहायला हवे. इंग्लंडमधल्या कसोटी सामन्यात मॅच फिक्सिंगचे प्रकरण चव्हाट्यावर आले, पण गेली पंधरा वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लाच घेणाऱ्या क्रिकेट पटूंची संख्या सतत वाढतच गेल्याचेही स्पष्ट झाले आहे. अगदी आयपीएलच्या सामन्यातही मॅच फिक्सिंग झाल्याचे आरोप रोज होत आहेत. ऑस्ट्रेलिया, भारत, दक्षिण आफ्रिका या देशांचे काही खेळाडू पैशासाठी विकले गेल्याची प्रकरणे यापूर्वीही गाजलेली होतीच. हे प्रकरण क्रिकेटला बदनाम करणारे आणि हा खेळ संपवणारे आहे, हे मात्र निश्चित.
- मनोज मनोहर
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: