देबू देवधर
ऐक्य समूह
Thursday, September 02, 2010 AT 10:44 PM (IST)
देबू देवधर हे मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतले फक्त चलत्चित्र छायाचित्रकार नव्हते. चित्रपटाची कथा, सामाजिक परिस्थिती, चित्रपटातील भूमिका, निसर्ग, काळ, या साऱ्यांचा प्रचंड अभ्यास करूनच, ते छायाचित्रण करीत असत. त्यामुळेच त्यांनी छाया-चित्रित केलेल्या सर्व चित्रपटांची, प्रचंड प्रशंसा झाली. ते अत्यंत निर्दोषपणे चित्रपटाचे छायाचित्रण करीत असत. छायाचित्रण हा त्यांचा श्वास होता. बालपणा-पासूनच छायाचित्रणाची आवड असलेल्या देबूंनी, सहाय्यक छायाचित्रकार म्हणून चित्रपट-सृष्टीत प्रवेश केला. सतत प्रयोग करायची वृत्ती आणि कलात्मकता जपायसाठी धडपड या गुणामुळे, त्यांनी चित्रपटांच्या छायाचित्रणाचे तंत्र अवघ्या पाच वर्षातच आत्मसात केले. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी अमोल पालेकर यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि गाजलेल्या "आक्रित', या चित्रपटाचे छायाचित्रण स्वतंत्रपणे देबूंनी केले होते.
दिग्दर्शक असलेल्या श्रावणी देवधर या त्यांच्या पत्नी. देबू आपल्या पत्नीलाही दिग्दर्शनाचे धडे देत असत. आपण स्वीकारलेला चित्रपट हा पूर्णपणे परिपूर्ण आणि तांत्रिकदृष्ट्या निर्दोष असावा, असा त्यांचा आग्रह असे. चित्रपटाचे चित्रीकरण करताना प्रत्येक प्रसंगाचा ते अभ्यास करीत, त्यामुळेच त्यांनी छायाचित्रीत केलेल्या चित्रपटांच्या छाया-चित्रणाची देश-विदेशातही प्रशंसा झाली.
शंकर देवधर हे त्यांचे मूळ नाव. त्यांचे बालपण पुण्यातच गेले. शिक्षणही याच महानगरीत झाले. पुण्याच्या ऐतिहासिक परिसराचा त्यांना खूप अभिमान होता. मराठी, हिंदी आणि इंग्रजी पुस्तकांचे त्यांचे वाचनही प्रचंड होते. निसर्ग वाचनाचा छंदही त्यांना होता. त्यामुळेच चित्रपटांचे स्टुडिओतील आणि स्टुडिओ-बाहेरील चित्रीकरण ते झपाट्याने करीत असत. एकाच दृश्यासाठी वारंवार चित्रीकरण करणे त्यांना आवडत नसे. त्यामुळेच चित्रीकरण सुरु होण्यापूर्वीच देबू, संपूर्ण प्रसंगातील संवाद अभिनेता आणि अभिनेत्रींना, पात्रांना पूर्णपणे समजले आहेत की नाहीत, असे नम्रपणे विचारीत असत. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांच्या छाया-चित्रणाच्या कलेची प्रशंसा झाली. त्यांनी छायाचित्रीत केलेले काही हिंदी-मराठी चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही गाजले. काहींना पुरस्कारही मिळाले. पण, त्याचे श्रेय देबू चित्रपटाच्या सर्व सहाय्यक आणि त्यात काम करणाऱ्या कलाकार-तंत्रज्ञांना देत असत.
थोडासा रुमानी हो जाए, प्रहार, बनगरवाडी, लंपडाव, दायरा, सरकारनामा, सिलसिला हैं प्यार का, लेकरू, कैरी, ध्यासपर्व, लाल सलाम पेहचान, शान, मातीमाय या चित्रपटांचे छायाचित्रण देबूंनीच केले आहे. छायाचित्रणासाठी किती पैसा मिळतो, याचा विचार त्यांनी कधीच केला नाही. कलात्मक आणि चाकोरीबाह्य चित्रपटांची निर्मिती करणाऱ्या कलाकार आणि दिग्दर्शकांच्या पाठीशी ते सदैव उभे राहिले. कमी पैशात वेगळा चित्रपट निर्माण करायचे धाडस करणाऱ्या, तरुण निर्माते आणि दिग्दर्शकांनाही त्यांचे सतत प्रोत्साहन असे. रात्रंदिवस सतत उत्साही असलेल्या निर्मळ मनाच्या देबूंना फुफ्फुसाच्या कर्करोगाने ग्रासले आणि शेवटी वयाच्या 62 व्या वर्षी या कला-काराचा कर्करोगानेच बळी घेतला.