देह हेच खरे स्वरुप
ऐक्य समूह
Thursday, September 02, 2010 AT 10:50 PM (IST)
तुम्ही ईश्वराला जाणता म्हणजे काय? ईश्वर तुमच्यामध्ये आहे, तुमच्या शरीरात वसत आहे असेच ना? "राम' म्हणतो की, "शरीर आणि हे जग ईश्वरामध्ये आहे' आणि "मी ईश्वर आहे' या दोन कल्पनांत फार अंतर आहे. त्याने "आत्म्याचा' त्याग केला म्हणजे देह हेच काय ते त्याचे सर्वस्व, खरे स्वरुप आहे आणि आत्मा ही त्यावर लादलेली बाह्य वस्तू आहे, असे होते. हिंदू लोक म्हणतात की, आत्मा मी आहे. जीर्ण वस्त्राप्रमाणे हे शरीर टाकून देऊन मी दुसरे धारण करतो.
सर्वत्र जर ईश्वरच आहे तर जगात दु:ख, कष्ट व क्लेष का दृष्टीस पडतात? तुम्हाला माहीत आहे की, वेदांताप्रमाणे ईश्वर सर्व काही आहे. सर्वत्र ईश्वर आहे, तुम्ही ईश्वराचे अंश आहा, मी ईश्वर आहे. यावर लोक विचारतात की, तुम्ही ईश्वराचे अंश आहा काय? छे, छे, ईश्वर अखंड आहे, त्याचे खंड किंवा विभाग पाडता येत नाहीत. तुम्ही ईश्वराचे अंश नव्हे. ईश्वर जर अनंत आहे तर तुम्हीही अनंत असले पाहिजे, अंश असू शकणार नाही. अशी जर स्थिती आहे, तर ईश्वराने एका देहात दु:ख भोगावे, दुसऱ्या देहात दरिद्री व्हावे असा हा प्रकार का असावा? हिंदुस्थानात ग्रंथिक सन्निपात, दारिद्र्य ही का असावी? आणि अमेरिकेत राजकीय स्वातंत्र्य का असावे? एक लक्षाधीश, दुसरा भिकारी का असावा? अशी विषमता ईश्वराने का करावी? तो किती अन्यायी आहे! या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देण्याचे प्रयत्न येथे आणि हिंदुस्थानात होत आहेत. "मनुष्य आपल्या नशीबाचा नियंता आहे, आपली परिस्थिती आपण घडवितो' या कर्मतत्वाचा आधार घेऊन पुष्कळ लोक या प्रश्नाचे उत्तर देऊ पाहतात आणि ईश्वराला दोष देणे वाजवी नाही, तो न्यायी आहे असे म्हणतात. वेदांत प्रतिपादित कर्मतत्त्वाचा अधिक विचार करण्याची येथे आवश्यकता नाही. या कर्मतत्त्वाचा संबंध दृश्य नामरुपात्मक जगाशी आहे, तो प्रश्नाच्या मुळाशी जाऊ शकत नाही.