Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

आता आंब्यांचीही वाईन
ऐक्य समूह
Thursday, September 02, 2010 AT 10:43 PM (IST)
Tags: lolak

आंब्यापासून "वाईन' तयार करायचे तंत्र लखनौच्या केंद्रीय कृषी संशोधन संस्थेतील संशोधकांनी शोधून काढले, ही बातमी मद्य रसिकांसाठी आनंदाची ठरावी. द्राक्ष आणि इतर धान्यापासून भारतात तयार होणाऱ्या वाईन प्रमाणेच आंब्याच्या वाईनलाही चांगलीच मागणी राहील. "वाईन' म्हणजे दारु नव्हे, असे केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी यापूर्वीच सांगून टाकल्यामुळे नियमितपणे वाईन पिणाऱ्यांचा "दारुडे', असा लौकिक होणार नाही, असा दिलासा मद्य रसिकांना  मिळाला. परिणामी गेल्या दहा वर्षात दारुच्या निर्मितीत देशाने आघाडी मिळवली. महाराष्ट्रात तर ज्वारी, बाजरी आणि अन्य धान्यापासून दारु निर्मितीचे कारखाने सुरु करायसाठी राज्य सरकारनेच कोट्यवधी रुपयांच्या अनुदानाची खैरात "दारु सम्राटां'वर केली. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, रशिया हे पाश्चात्त्य देश परंपरेने वाईन आणि व्हिस्की, व्होडका, ब्रॅंडीच्या निर्मितीत गेली अनेक शतके प्रसिध्द आहेत. जागतिकीकरणाच्या धोरणाच्या अंमलबजावणीमुळे, सर्व क्षेत्रातली आव्हाने स्वीकारायची मोठी जबाबदारी देशातल्या उद्योजकांवर आली. औद्योगिक क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. निर्यात वाढली. पण, परदेशातून उंची दारु आयात करणे हा भारतीय तंत्रज्ञानाचा अपमान असल्यामुळेच, आमच्या तंत्रज्ञांनी, विदेशी दारुच्या दर्जाचे वेगवेगळे दारुच्या प्रकारांची निर्मिती सुरु केली. या नव्या स्वदेशी (विदेशी) दारुला मद्य रसिकांनीही प्रतिसाद दिला. दारु कारखानदारांना आणि दारु तंत्रज्ञांना प्रोत्साहन मिळाल्यामुळेच वेगवेगळ्या फळापासून वाईन आणि दारुनिर्मिती करायच्या संशोधनावर शास्त्रज्ञ, तंत्रज्ञांनी लक्ष केंद्रित केले. कृषी संशोधन संस्थातल्या वैज्ञानिकांनी मद्य रसिकांना वेगवेगळ्या चवीची वाईन तयार करायला प्रारंभ करून, पाश्चात्त्य देशातल्या तंत्रज्ञांना आव्हान देण्यात असे यश मिळवले आहे. उत्तर प्रदेशात होणाऱ्या दशहरी, लंगडा आणि चौसा या जातीच्या आंब्यापासून सध्या नव्या वाईनची निर्मिती सुरु होईल. आंब्याच्या वाईनचे तंत्र आपल्या शास्त्रज्ञांनी विकसित केल्यामुळे  महाराष्ट्रातल्या मद्यसम्राटांना आणखी काही वर्षांनी हापूस, पायरी आणि अन्य आंब्यापासून वाईन निर्मिती करणारे प्रकल्प सुरु करता येतील. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यात या नव्या आंबा वाईनच्या निर्मितीच्या प्रकल्पांना सरकारने भरीव अनुदान दिल्यास, उपेक्षित कोकणातल्या उद्योजकांना भरभराटीचा नवा व्यवसाय उपलब्ध होईल. कोकणचा कॅलिफोर्निया झाला पाहिजे, अशी राज्य सरकारची महत्वाकांक्षा असली तरी, हे स्वप्न काही पूर्ण झालेले नाही. आंब्यापासून वाईन  निर्मितीचे प्रकल्प कोकणात सुरु होतील तेव्हा, तिथल्या आंबा उत्पादक शेतकऱ्यांना अधिक पैसे मिळतील. (कुजलेले आंबेही या वाईनला चालतील की नाही, हे माहिती नाही. चालत नसल्यास कुजलेल्या आंब्यांची दारु तयार करायचे तंत्र वैज्ञानिक नक्कीच विकसित करतील.) खूपच गवगवा झालेल्या गोव्यातल्या काजू फेणीला, कोकणी आंब्याची वाईन बाजारात नक्कीच टक्कर देवू शकेल. महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे आणि कृषी संशोधन केंद्रांनी, लखनौच्या कृषी वैज्ञानिकांचा आदर्श घेवून, या भूमीत पिकणाऱ्या पपई, पेरू, डाळिंब, फणस आणि अन्य फळांपासून वाईन-दारुनिर्मितीचे तंत्र विकसित करायला हवे. वास्तविक यापूर्वीच विद्यापीठांनी या क्षेत्रात मजल मारायला हवी होती. पण, महाराष्ट्रातले काही बुरसटलेले विचारवंत आणि गांधीवादी "दारु निर्मिती', हा शब्द उच्चारला तरी, प्रचंड आकांडतांडव करतात. महाराष्ट्रात धान्यापासून दारुनिर्मितीचे कारखाने सुरु झाल्यावर याच मूठभर विचारवंतांनी, महाराष्ट्राचे "मद्यराष्ट्रात', रुपांतर करू नका, अशी आवाहने वारंवार केलेली होती. आदिवासी कल्याणमंत्री हरि भक्त परायण बबनराव पाचपुते बुवांनी, आदिवासींना जोडधंदा उपलब्ध व्हावा, यासाठीच जंगलात मिळणाऱ्या "मोहाच्या' फुलापासून दारुनिर्मितीचा कुटीरोद्योग सुरु करता येईल, अशी नुसती कल्पना मांडताच हे दारुबंदीवाले त्यांच्यावर एकजुटीने तुटून पडले. आकाशाला भिडलेल्या महागाईमुळे दरिद्री लोकांना दोन वेळचे अन्न मिळत नाही, असे हेच विचारवंत गळे काढून सांगतात. पण, दारुचा एक घुटका घेतल्यावर, याच गरीबांची तहान भूक हरपते, हे वास्तव मात्र ही मंडळी लक्षात घेत नाहीत. राज्य सरकारने लवकरात लवकर आंबा आणि अन्य फळांपासून वाईन-दारु निर्मितीचे प्रकल्प राज्याच्या
सर्व भागात सुरु करायचे धोरण
स्विकारायला हवे!
- वासुदेव कुलकर्णी

 
© Copyrights 2010 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: