बिहार
ऐक्य समूह
Wednesday, September 01, 2010 AT 12:23 AM (IST)
गेले दोन महिने पोलिसांच्या नियंत्रणात आलेला नक्षलवाद्यांचा हिंसाचार बिहार राज्यात पुन्हा नव्याने सुरु झाल्यामुळे, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारची कोंडी झाली आहे. विधानसभेच्या निवडणुका उंबरठ्यावर आल्या असतानाच, राज्याला दुष्काळाने ग्रासले. आता नक्षलवाद्यांच्या वाढत्या हालचालीमुळे, दहशतीचे निर्माण झालेले वातावरण, राज्य सरकारला महागात पडेल. गेल्या रविवारी लखीसराय जिल्ह्यातल्या कजरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शितलकोरानी जंगलात गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला नक्षलवाद्यांच्या टोळीने अचानक घेरल्यामुळे, उडालेल्या चकमकीत आठ जवान शहीद झाले. चार जवानांना नक्षलवाद्यांनी पळवून नेऊन ओलीस ठेवले आहे. आपल्या आठ सहकाऱ्यांना तातडीने तुरुंगातून सोडले नाही तर, ओलीस ठेवलेल्या चार जवानांचे खून पाडायची धमकी नक्षलवाद्यांनी दिल्यामुळे, सरकारसमोर पेचप्रसंग निर्माण झाला आहे.
जंगलात गस्त घालणाऱ्या वीस जवानांच्या पथकाला तीनशे नक्षलवाद्यांच्या टोळीने अचानक घेरून गोळीबार सुरु केला. जवानांनी पाच तास त्यांच्याशी एकाकीपणे झुंज दिली. आपल्याला नक्षलवाद्यांनी घेरल्याची माहिती, जिल्हा पोलीस ठाण्याला बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे या जवानांनी दिली, पण शेवटपर्यंत त्यांना पोलिसांची अतिरिक्त मदत मिळाली नाही. ज्येष्ठ अधिकारी या जवानांना नक्षलवाद्यांना शरण जाण्याचा सल्ला देत होते. नंतर मुख्यालयातील बिनतारी संदेश यंत्रणेद्वारे उत्तर मिळण्याचेही बंद झाले. सलग पाच तास ही चकमक सुरु होती. दारुगोळा संपल्यामुळे उरलेल्या जवानांनी शेवटी शरणागती पत्करली. जखमी जवानांवर नक्षलवाद्यांनीच औषधोपचार केले. त्यातल्या चार जणांना उचलूनही नेते. आपल्या पथकाला तातडीने पोलीस पथकांची मदत मिळाली असती तर, या नक्षलवादी पथकाला चोख प्रत्युत्तर देता आले असते, असे जखमी जवानांनी सांगितल्यामुळे, नक्षलवाद विरोधी मोहीम राबवणाऱ्या ज्येष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संशयास्पद वर्तनाचीच चौकशी करण्याची गरज निर्माण झाली आहे.
मुघलसराय आणि लखीसराय भागातल्या नक्षलवाद्यांचा बंदोबस्त करण्यासाठी गेले दोन महिने, पोलिसांनी जंगलात छापे घालायचे सत्र सुरु केले. काही नक्षलवाद्यांना पोलिसांनी पकडले परंतु नक्षलवाद्यांच्या खबऱ्यांनी पोलिसांच्या हालचालींची माहिती मिळवून, पोलिसांना जोरदार प्रतिकार करण्याचा कट रचला होता. तो शितलकोरानीच्या जंगलात यशस्वीही झाला.
पोलिसांची गस्ती पथके वीस-पन्नासच्या तुकड्यांनी जंगलात गस्त घालतात. तर गस्त पथके येताच, नक्षलवादी पळून जातात. त्यांची संपर्क यंत्रणा चोख असल्यामुळे अवघ्या आठ तासात 300 ते 400 नक्षलवादी एकत्र येतात आणि पोलिसांच्या पथकांना घेरतात. अशा घटना गेल्या पाच वर्षात वारंवार घडूनही नक्षलवाद विरोधी मोहीम राबवताना सुरक्षा पथके आणि पोलिसांना अधिक जवानांची मदत मात्र मिळत नाही. त्यामुळेच जवान घेरले जातात आणि नक्षलवाद्यांच्या हल्ल्यांचे बळी ठरतात, हेच या नव्या हल्ल्याने निष्पन्न झाले आहे.